याग्रोरियन वर्षाची लवकरच सांगता होणार आहे. सरत्या वर्षाबरोबर अनेक गोष्टी संपतात. या संपणार्या गोष्टींपैकी काही गोष्टी अशाही असतात की, काळ त्यांना गिळंकृत करतोय हे सहसा कुणाच्या लक्षातही येत नाही. अशाच गोष्टींपैकी एक म्हणजे भाषा! दरवर्षी अनेक भाषा सरत्या वर्षासोबत या जगाचा निरोप घेतात. 2024 सुद्धा तांडिया, मावेस आणि लुहू यांसारख्या काही भाषांसाठी, निरोपाचे वर्ष ठरणार असल्याची शक्यता गूगलवर उपलब्ध असणार्या काही ऑनलाईन संशोधनांमध्ये वर्तवली गेली आहे.
भाषा संपते किंवा नामशेष होते म्हणजे काय होते, तर ती भाषा बोलणारी शेवटची व्यक्ती मृत पावते किंवा मग त्या भाषेचा भाषिक समूह, ती भाषा बोलणेच बंद करतो. भाषा ही माणसाशी त्याच्या जन्मापासूनच जोडली गेलेली असते. ‘मानवी भावना व्यक्त करण्यासाठी अस्तित्वात आलेली ध्वनिचिन्हांनीयुक्त यादृच्छिक संकेतव्यवस्था म्हणजे भाषा’, अशी ढोबळमानाने आपण तिची व्याख्या करतो. त्यामुळे जोपर्यंत माणूस आपल्या भावना त्याच्या भाषेत व्यक्त करत असतो, तोपर्यंतच त्या भाषेला अस्तित्व असते. यामना, सेर आणि इयाक या भाषांची या संदर्भातील उदाहरणे महत्त्वाची ठरतात. ‘यामना’ ही चिली देशातील एका लहान समूहामार्फत बोलली जाणारी स्थानिक भाषा होती. 2022 साली क्रिस्टीना कॅल्डेरॉन या यामना भाषा ज्ञात असणार्या, शेवटच्या व्यक्तीचे निधन झाले. त्यांच्या निधनासोबत या भाषेनेही जगाचा निरोप घेतला. ‘सेर’ या अंदमान बेटावर बोलल्या जाणार्या भाषेच्या बाबतीतही हेच झाले. ‘लिको’ ही ‘सेर’ भाषा बोलणारी शेवटची व्यक्ती होती. 2020 साली या व्यक्तीचे निधन झाले आणि ‘सेर’ भाषेचे अस्तित्व संपुष्टात आले. ‘इयाक’ ही अलास्कामध्ये बोलली जाणारी एक स्थानिक भाषा होती. मारी स्मिथ जोन्स यांना ‘इयाक’ भाषा बोलणारी शेवटची व्यक्ती म्हणून ओळखले जायचे. 2008 साली त्यांच्या निधनानंतर ‘इयाक’ या भाषेचे अस्तित्व धोक्यात आले. पण, मारी स्मिथ जोन्स यांनी त्यांच्या हयातीत तयार करून ठेवलेल्या ‘इयाक’ शब्दकोशामुळे, या भाषेला काहीसे जीवनदान मिळाले. या झाल्या दखल घेतल्या गेलेल्या नामशेष भाषा. यांच्या व्यतिरिक्त जगभरातील कितीतरी भाषा अशाही असतील, ज्या अस्तित्वात होत्या हेच मुळात कुणाला माहिती नसेल. 2024 साली ज्या भाषांसाठी धोक्याची घंटा वाजवली आहे, त्या भाषाही अशाच स्थानिक भाषा आहेत. ‘तांडिया’, ‘मावेस’ आणि ‘लुहू’ या तीनही भाषा इंडोनेशियामध्ये बोलल्या जातात. ‘तांडिया’ ही भाषा ‘ऑस्ट्रोनेशियन’ भाषा समूहातील एक भाषा आहे. 1991 साली झालेल्या सर्वेक्षणात ही भाषा बोलणार्या दोनच व्यक्ती शिल्लक आहेत, असे आढळून आले होते. 2009 साली झालेल्या सर्वेक्षणातही ही भाषा अस्तित्वात असल्याचे आढळून आले होते. पण, 2024 साली मात्र ही भाषा नामशेष झाल्याचे सांगितले जात आहे. ‘मावेस’ ही क्वार्बिक भाषा समूहाशी संबंधित असलेली भाषा. 2006 साली झालेल्या सर्वेक्षणात ही भाषा बोलणारे जवळपास फक्त 850 लोक शिल्लक असल्याचे, आढळून आले होते. पण, 2024 पर्यंत ही भाषा नष्ट होण्याची शक्यता नोंदविण्यात आली होती. ‘लुहू’ ही सुद्धा तंडिया सारखीच ‘ऑस्ट्रोनेशियन’ भाषा समूहातील भाषा. 1989 साली जवळपास 3 हजार, 500 लुहू भाषिक अस्तित्वात होते. पण, इतर भाषांच्या आक्रमणामुळे आणि ही भाषा बोलणार्या भाषिकांची संख्या कमी झाल्यामुळे, 2024 सालापर्यंत मूळ लुहू भाषा नामशेष झाली.
दरवर्षी अशा अनेक भाषा नामशेष होतात. सुदैवाने त्यातल्या काहींची नोंद घेऊन, त्या पुनरुज्जीवित करण्यासाठी प्रयत्न केले जातात. पण, काहींना मात्र इतिहासजमा व्हावेच लागते. या नामशेष झालेल्या किंवा त्या मार्गावर असलेल्या भाषा, साधारण दोन प्रकारच्या असतात. एकतर त्या दुर्गम भागात बोलल्या जाणार्या छोट्या समूहांच्या भाषा असतात किंवा मग काळाच्या ओघात आधुनिक भाषांच्या आक्रमणामुळे, व्यवहारातून नष्ट झालेल्या प्राचीन भाषा असतात. आपल्या देशातही काळाच्या ओघात नष्ट झालेल्या अनेक बोलीभाषा आहेत.या भाषा नष्ट होताना, आपल्यासोबत जोडलेला इतिहास, संस्कृती, भूगोल आणि इतर सगळ्याच घेऊनच नष्ट होतात. भाषा अभ्यासक आणि समीक्षक यांनी एका ठिकाणी म्हटले होते की, ‘जेव्हा कोणतीही भाषा नष्ट होते, तेव्हा जगाकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोनच नष्ट होत असतो.’ त्यामुळे कुठल्याही सरणार्या वर्षासोबत आपली भाषा कधीही संपणार नाही, याची दक्षता प्रत्येकाने घेणे खूप गरजेचे आहे.
दिपाली कानसे