मुंबई : मुंबई आणि ठाणे शहरात शनिवारी धुक्यांची झालर पसरली होती. येत्या २४ डिसेंबर २०२४ पर्यंत पहाटे पाचचे किमान तापमान हे सरासरीपेक्षा १ ते ४ अंशाने अधिक असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. यामुळे येत्या काही दिवसांत मुंबई आणि ठाणे येथे काही अंशी थंडीत वाढ होणार असल्याची शक्यता आहे. तर कोकण आणि मुंबईमध्ये १ ते २ अंशाने तापमान खालावेल. यामुळे मुंबई, कोकणासह इतर उर्वरित महाराष्ट्रात थंडीत वाढ होणार असल्याची शक्यता आहे.
२५ ते २९ डिसेंबर २०२४ दरम्यान भाग बदलत ढगाळ वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. तर काही भागात विरळ पावसाची शक्यता आहे. या पावसामुळे काही भागांमध्ये थंडी ही अनुभवता येणार नाही. ३० डिसेंबर २०२४ नंतर थंडीत वाढ होणार असल्याचे हवामान अभ्यासक माणिकराव खुळे यांनी सांगितले आहे.
तसेच रायगड येथे ही काही अंशी धुके दाटल्याने वाहतूक सेवा मंदावली होती. मुंबई-गोवा महामार्गावर सुरू असलेल्या वाहतुकीचा वेग मंदावल्याचे चित्र दिसून आले होते. वाहने चालवत असताना त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
तसेच बदलापूर येथील काही ग्रामीण पट्ट्यात थंडीचा जोर वाढल्याचे दिसून येते. यामुळे वांगणी येथे धुक्याचे अधिक प्रमाण वाढले असल्याचे दृश्यमानतेत मोठ्या लक्षणीय घट झाल्याचे चित्र आहे. अशातच मुंबई शहरालगत असलेला नवी मुंबईच्या भागातही सकाळी पहाटे धुरांप्रमाणे धुके पाहायला मिळतात. एवढेच नाहीतर नवी मुंबई ही औद्योगिकीकरणाच्या सानिध्यात असल्याने काही भागांमध्ये मोठ्या कारखान्यांचा, कंपन्यांचा धूर येत असल्याचे चित्र आहे. याचा विपरित परिणाम हा नवी मुंबईकरांच्या आरोग्यावर होताना दिसत आहे.