कौशल्याची राजधानी

22 Dec 2024 23:31:29
 
Narendra Modi
 
भारताकडे जगाची कौशल्याची राजधानी बनण्याची क्षमता असल्याचा विश्वास, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. भारतीय मनुष्यबळाकडे असलेले कौशल्य आणि त्यांच्या क्षमता या वेळोवेळी सिद्ध झाल्या आहेत. हे युवा मनुष्यबळ हीच भारताची ताकद असून, ती भारताच्या वृद्धीत मोलाची भूमिका बजावत आहे.
 
भारताकडे जगाची कौशल्याची राजधानी बनण्याची क्षमता असल्याचा आत्मविश्वास, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुवेत येथील भारतीय समुदायाला संबोधित करताना व्यक्त केला. कुवेतच्या उभारणीत भारताचे असलेले योगदान पंतप्रधान मोदी यांनी अधोरेखित केले. भारतीय मनुष्यबळ, त्यांचे असलेले कौशल्य आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान कुवेतच्या आधुनिकीकरणात मोलाची भूमिका बजावत आहे. तसेच, कुवेतमध्ये जे नवनवीन प्रकल्प उभे राहत आहेत, त्यामध्ये सक्रिय योगदान देण्याची भारताची इच्छा आहे. भारतीय युवा मनुष्यबळ हीच भारताची ताकद असून, भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीमध्ये हा युवा वर्ग मोलाची भूमिका बजावत आहे. तंत्रज्ञानात भारतीय अव्वल आहेतच, ते जगभरातील दिग्गज कंपन्यांमध्ये महत्त्वाच्या पदावर आहेत. त्याशिवाय, या अत्याधुनिक तंत्रज्ञानाला गरजेचे असे कुशल मनुष्यबळ देशात उपलब्ध होण्यासाठी केंद्र सरकारने ज्या योजना राबवल्या आहेत, त्याचे परिणाम आता दृश्यरुपाने दिसू लागले आहेत.
 
भारताची कौशल्य विकास क्षेत्रातील भूमिका खूप महत्त्वाची आहे. देशातील बहुसंख्य लोकसंख्या युवा असून, त्यांना कौशल्य विकास क्षेत्रामध्ये अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत. मोदी सरकारने जो ‘स्किल इंडिया’ उपक्रम सुरू केला, तो देशातील युवकांना विविध कौशल्ये शिकवण्यावर भर देणारा आहे. त्यामुळे देशातील युवकांना रोजगाराची संधी मिळाली आहे. कौशल्य विकासामध्ये वाढती भौगोलिक आणि औद्योगिक विविधता असल्यामुळे, लहान-मोठ्या व्यवसायांपासून विविध क्षेत्रांमध्ये जसे की तंत्रज्ञान, उत्पादन, सेवा क्षेत्र आदी क्षेत्रांमध्ये कौशल्ये विकसित करण्यासाठी, वेगवेगळ्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. भारताच्या कुशल मनुष्यबळाला आंतरराष्ट्रीय बाजारात मान्यता मिळाली आहे. भारतीय मनुष्यबळाचे कौशल्य आणि तांत्रिक ज्ञान जागतिक स्तरावर उच्च मूल्यांकित असून, त्यामुळेच त्यांना बाहेरच्या देशांमध्ये रोजगार मिळवण्यासाठी अधिकाधिक संधी प्राप्त होत आहेत.
 
जागतिक पातळीवर भारतीय मनुष्यबळाला वाढती मागणी आहे आणि यामागे अनेक कारणेही आहेत. भारतीयांची कौशल्ये, त्यांची मेहनती वृत्ती तसेच विविध क्षेत्रांमध्ये त्यांनी प्राप्त केलेले प्रगत तांत्रिक ज्ञान यामुळे, त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी मागणी आहे. विशेषतः आयटी, अभियांत्रिकी, आरोग्य सेवा आणि उत्पादन क्षेत्रात भारताने आपले वेगळेपण जोपासले आहे. भारताने जी तांत्रिक कौशल्ये विकसित केली आहेत, त्यामुळे अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्या भारतीयांकडून सेवा घेण्यास प्राधान्य देत आहेत. भारताने जागतिक स्तरावर अनेक व्यापार सहकार्य करार केले आहेत. त्यामुळे भारतीय मनुष्यबळाच्या मागणीत वाढ झाली आहे. भारतीय नवोद्योग तसेच, टेक कंपन्यांचा डंका जगभरात यापूर्वीच आहे. म्हणूनच त्यांचे कार्यक्षेत्र विस्तारलेले दिसून येते.
 
युरोपीय, अमेरिकी, आणि मध्य-पूर्व देश भारतीय मनुष्यबळावरच अवलंबून आहेत. तसेच, हे भारतीय मनुष्यबळ त्यांच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत. सौदी अरब, युएई आणि अन्य आखाती देशांमध्ये, भारतीय मनुष्यबळ मोठ्या संख्येने कार्यरत आहे. त्या त्या देशांच्या वाढीमध्ये ते योगदान देतातच, त्याशिवाय बाहेरील देशांमधून ते विदेशी चलन मायदेशात पाठवत, विदेशी गंगाजळीतही मोठ्या प्रमाणात भर घालतात. भारताची विदेशी गंगाजळी म्हणूनच वाढीचे नवनवे विक्रम प्रस्थापित करत आहे. अनेक पाश्चात्य देशांमधून भारतीयांना प्राधान्यक्रम दिला जातो. कौशल्य विकासामुळे युवा पिढी आजच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाला सक्षमपणे तोंड देण्यास सज्ज असल्यानेच, त्यांना वाढती मागणी आहे. जागतिक स्तरावरील अनेक संधी आज त्यांच्यासाठी उपलब्ध आहेत.
 
भारतातील युवा लोकसंख्येच्या कौशल्यविकासाची आवश्यकता अत्यंत महत्त्वाची आहे, हे लक्षात घेऊनच केंद्र सरकारने कौशल्य विकासावर भर दिला. कौशल्या अभावी बेरोजगारीचा सामना करावा लागण्याची शक्यता असते. तथापि, कौशल्य विकास रोजगाराच्या संधी प्रदान करणार्‍या ठरतात. त्यांच्यामुळे, उत्पादन वाढते. हे वाढलेले उत्पादन आर्थिक विकासाला हातभार लावते. उच्च कौशल्ये असलेल्या कामकारांमध्ये नावीन्य आणण्याची क्षमता असते, त्यामुळे औद्योगिक आणि आर्थिक प्रगती होत असते. जागतिकीकरणामुळे देशांमध्ये स्पर्धा वाढलेली आहे. भारतीयांनी स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आवश्यक ती कौशल्ये विकसित केली आहेत, असे नक्कीच म्हणता येते. म्हणूनच, 2015 साली कौशल्य विकास अभियान केंद्र सरकारने हाती घेतले. त्याचे मुख्य उद्दिष्ट युवकांना रोजगारासाठी योग्य कौशल्ये आणि प्रशिक्षण प्रदान करणे हा होता. युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याबरोबरच, त्यांच्यात आत्मविश्वास वाढवणे आणि आर्थिक प्रगतीस चालना देण्याचे काम या योजनेने केले. त्याचवेळी नवीनतम तंत्रज्ञान, एआय अर्थातच कृत्रिम बुद्धिमत्ता आणि रोबोटिक्स यासारख्या प्रगत तंत्रज्ञान भारतीयांसाठी उपलब्ध करण्यात आले.
 
काँग्रेसने आपल्या कार्यकाळात देशातील युवा पिढीसाठी, बदलत्या तंत्रज्ञानासाठी कोणतेही ठोस असे धोरण राबवलेच नाही. त्यानुसार, अभ्यासक्रमात कोणताही बदल केला नाही. परिणामी, देशातील शैक्षणिक संस्था या दरवर्षी पदवीधर निर्माण करणार्‍या कारखान्याप्रमाणे काम करत राहिल्या. विनाअनुदानित अभियांत्रिकी महाविद्यालय, वैद्यकीय महाविद्यालय यासारख्या संस्थांनी तर, लाखो अभियंते देशाला दिले. तथापि, त्यांच्यासाठी सुयोग्य संधी देशात उपलब्ध झाल्या नाहीत. केंद्र सरकारने काळाची गरज ओळखत, अभ्यासक्रमात आवश्यक ते बदल केले. त्याशिवाय, नवनवीन तंत्रज्ञान देशातील युवा लोकसंख्येला कसे उपलब्ध होईल, याची पुरेपूर काळजी घेतली. म्हणूनच, आज ‘एआय’सारखे क्षेत्रही, रोजगाराच्या संधी देणारे बनले आहे. मनुष्यबळाचा अभाव असेल, तर त्याचा विपरित परिणाम कंपनीच्या उत्पादकतेवर तर होतोच, त्याशिवाय सामाजिक रचनेलाही त्याचा फटका बसतो. त्यासाठीच, स्किल इंडियाची भूमिका महत्त्वाची ठरली.
 
युवा पिढीने जागतिक स्पर्धेला सामोरे जाण्यात महत्वपूर्ण प्रगती साधली असून, अन्य कौशल्यांनी या पिढीली परिपूर्ण केले आहे.
देशातील नवोद्योग, तरुणांना आपले व्यवसाय स्थापित करण्याची आणि उद्यमशीलतेचा अनुभव घेण्याची प्रेरणा देणारे ठरत आहेत. उद्यमशीलतेने त्यांचा आत्मविश्वास वाढवला असून, त्यामुळे ते नवनवीन विचार पुढे आणत आहेत. हेल्थकेअर, टूरिझम, माहिती तंत्रज्ञान आणि कृषी यांसारख्या क्षेत्रांमध्ये, त्यांना काम करण्याची संधी मिळत आहे. तसेच, जागतिक स्पर्धेसाठी ते तयार होत आहेत. तरुण पिढीचा आत्मविश्वास आणि जागतिक स्पर्धेत उभे राहण्याची क्षमता हे त्यांच्या शिक्षण, प्रशिक्षण, तंत्रज्ञानाच्या वापर यामुळे सिद्ध झाली आहे. आवश्यक कौशल्ये आणि चांगल्या संधींच्या आधारे, ते नवीन युगात स्पर्धात्मक यश मिळवण्यास सज्ज झाले आहेत. आपल्या क्षमतांचा वापर करून, तरुण पिढी जागतिक स्तरावर आपली ओळख प्रस्थापित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावण्यास सज्ज झाली आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0