मुंबई (विशेष प्रतिनिधी) - यवतमाळमधील टिपेश्वर वन्यजीव अभयारण्यामध्ये जन्मलेल्या नर वाघाने स्थलांतर करत सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला आहे (tipeshwar tiger). सद्यपरिस्थितीत हा वाघ सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात आहे (tipeshwar tiger). हद्दीच्या शोधात या उमद्या वाघाने यवतमाळमधून आपल्या प्रवासाची सुरुवात केल्याची शक्यता असून आजवर त्याने ५०० किमीहून अधिक प्रवास केल्याचा अंदाज आहे. (tipeshwar tiger)
गेल्या काही दिवसांपासून धाराशिव जिल्ह्यातील भूम, परंडा, वाशी तालुक्यात तसेच येडशी भागात बिबट्याचा संचार वाढल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या होत्या. हा बिबट्या गुरांवर हल्ले करुन त्यांना ठार करत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. मात्र, वन विभागाने कॅमेरा ट्रॅप लावल्यानंतर वेगळेच चित्र समोर आले. येडशी विभागात लावलेल्या कॅमेऱ्यामध्ये वाघाचे छायाचित्र कैद झाले. त्यामुळे वन विभागाने सर्तक होऊन या वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवले. शुक्रवारी या वाघाने येडशी परिसरामधून सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात प्रवेश केला. हा वाघ दिवसाला ४० ते ५० किलोमीटर अंतर कापत असल्याची माहिती वन विभागातील सूत्रांनी दिली आहे. सध्या या वाघाचा वावर बार्शी तालुक्यात असून त्याने पुढचा प्रवास सुरू ठेवला आहे.
भारतीय वन्यजीव संस्थान (डब्लूआयआय) हे देशातील वाघांच्या गणनेचे काम करते. संस्थेकडे देशात सद्यपरिस्थितीत असलेल्या सर्व वाघांची छायाचित्र आहे. त्यामुळे येडशी वनक्षेत्रात कॅमेरा ट्रॅपमध्ये टिपलेले या वाघाचे छायाचित्र हे डब्लूआयआयला तपासण्यासाठी पाठविण्यात आले होते. हे छायाचित्र टिपेश्वर वन्यजीव अभयारण्यात २०२२ साली जन्मलेला नर वाघाचे असल्याचे समोर आले आहे. अभयारण्यातील T22 असा सांकेतिक क्रमांक असलेल्या वाघिणीच्या पोटी २०२२ साली या वाघाचा जन्म झाला होता. त्यामुळे आता दोन वर्षांनंतर या वाघाने आईपासून विलग होत, आपल्या नव्या हद्दीसाठी प्रवास केल्याची शक्यता आहे. नर वाघ हे आपली हद्द निर्माण करण्यासाठी किंवा मादीच्या शोधात लांबवरचा प्रवास करत असल्याची नोंद यापूर्वी देखील महाराष्ट्रामधून करण्यात आली आहे.