पुणे : लोहगाव येथून रायगड जिल्ह्यात महाड येथे लग्नासाठी जाणार्या खासगी बसला ताम्हिणी घाटात ( Tamhini Ghat ) भीषण अपघात झाला. या अपघातात पाचजण ठार झाले, तर २७ जण जखमी झाले आहेत. शुक्रवार, दि. २० डिसेंबर रोजी सकाळी ९.४५ वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. मृतांमध्ये तीन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. सर्व २७ जखमींना माणगाव येथील स्थानिक रुग्णालयात दाखल केले आहे.
माणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निवृत्ती बोर्हाडे यांनी दिलेल्या माहिती नुसार, पुण्याहून (एम एच १४, जी यू ३४०५) ही खासगी बस महाड येथे लग्नासाठी जात होती. ताम्हिणी घाटात एका वळणावर बसचालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस कठड्याला धडकून उलटली. यात बसखाली दबून ५ जणांचा जागीच मृत्यू झाला. संगिता धनंजय जाधव, गौरव अशोक दराडे, शिल्पा प्रदिप पवार, वंदना जाधव आणि अन्य एक अशी मृतांची नावे आहेत.
अपघातानंतर घाटातून ये-जा करणार्या प्रवाशांनी घटनेची माहिती दिल्यानंतर पोलीस, रुग्णवाहिका आणि रेस्क्यू पथक घटनास्थळी तातडीने रवाना झाले. त्यांनी बसमधील २७ जखमींना माणगाव येथील रुग्णालयात दाखल केले आहे.लोहगाव येथील जाधव कुटंबीय महाडच्या बिरवाडी येथे लग्न समारंभाला जात होते. त्यावेळी ताम्हिणी घाटातील धोकादायक वळणावर चालकाचे नियंत्रण सुटून बस पटली झाली, असे रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घरगे यांनी सांगितले.