संजय राऊतांच्या घराच्या रेकीचे आरोप फोल! दोघे दुचाकीस्वार मोबाईल टॉवरची रेंज तपासणारे

    21-Dec-2024
Total Views |

sanjay raut
 
ठाणे : (Sanjay Raut) उबाठाचे खासदार संजय राऊत यांच्या घराजवळ रेकी केल्याचा आरोप फोल ठरला असुन 'ते' दोघे मोबाईल टॉवर रेंज चाचणी करीत असल्याचे पोलिस तपासात उघड झाले. ठाण्यातील कापूरबावडी परिसरातून ताब्यात घेतलेल्या या व्यक्तींनी आपल्या कामाबाबत सर्व पुरावे पोलिसांना दिले असल्याने उबाठाच्या आरोपांची हवाच निघाली आहे.
 
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि आमदार सुनिल राऊत यांच्या मुंबईतील भांडूप येथील मैत्री बंगल्यासमोर दोन संशयित व्यक्तींनी रेकी केल्याचा आरोप करण्यात आला होता, ज्यामुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात खळबळ उडाली होती. मात्र, मुंबई पोलिसांच्या सखोल तपासात हे प्रकरण वेगळेच असल्याचे उघड झाले. सकाळी साडेनऊच्या सुमारास मोटारसायकलवर आलेल्या या दोन व्यक्तींनी रेकी केली नसून, ते मोबाईल टॉवरची रेंज तपासण्याच्या उद्देशाने तिथे उपस्थित असल्याचे स्पष्ट झाले आहे.
 
तक्रारीनंतर या प्रकरणासाठी पोलिसांची आठ पथके तयार करण्यात आली आणि सीसीटीव्ही फुटेज तसेच इतर पुरावे गोळा करण्यात आले. तपासादरम्यान, संबंधित दोघे आणि आणखी दोन व्यक्ती सेल प्लॅन आणि इन्स्टा आयसीटी सोल्युशन या कंपन्यांसाठी काम करणारे कर्मचारी असल्याचे आढळले. हे कर्मचारी ईरिक्सन कंपनीच्या वतीने जीओ मोबाईल नेटवर्कचे नेट टेस्ट ड्रायव्ह करत होते. घटनास्थळी त्यांची उपस्थिती केवळ तांत्रिक चाचणीसाठी होती, असा खुलासा त्यांनी पोलिसांसमोर केला. ठाणे कापूरबावडी परिसरातून ताब्यात घेतलेल्या या व्यक्तींनी आपल्या कामाबाबत सर्व पुरावे पोलिसांना दिले, ज्यामुळे त्यांचे आरोप खोटे असल्याचे सिद्ध झाले. संबंधित कंपन्यांकडून या तपासाला पुष्टी मिळाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.