ठाणे जिल्ह्यातील ४०४ महसूल गावांमध्ये 'पेसा दिन' साजरा होणार

21 Dec 2024 19:22:25
PESA Day

ठाणे : केंद्र शासनाने दि. २४ डिसेंबर, १९९६ रोजी पंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रांवर विस्तारित करणे) अधिनियम,१९९६ अर्थात पेसा कायदा पारित केला आहे. पेसा कायद्याच्या निर्मितीला दि. २४ डिसेंबर, रोजी २८ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने पंचायती राज मंत्रालयाच्या निर्देशाने हा दिवस "पेसा दिन" ( PESA Day ) म्हणून मुरबाड, भिवंडी, शहापूर तालुक्यातील महसूली गावांमध्ये साजरा करण्यात येणार आहे.

ठाणे जिल्ह्यातील अनुसूचित क्षेत्रातील, मुरबाड पंचायत समिती क्षेत्रातील ५५ ग्रामपंचायतींमधील १०१ महसूली गावे, भिवंडी पंचायत समिती क्षेत्रातील ४० ग्रामपंचायतींमधील ७३ तर शहापूर पंचायत समितीतील ११० ग्रामंपचायतींमधील २३० महसूल गावे अशा एकूण ४०४ गावांमध्ये पेसा दिन साजरा करण्यात येणार आहे. पेसा कायद्याचे उत्तम ज्ञान असलेल्या व शक्यतो स्थानिक बोली भाषेचे जाणकार व्यक्ती, संस्था, अधिकारी यांनी उपस्थित सर्वांना पेसा कायद्याविषयी माहिती देणार आहेत. पेसा कायद्याशी संबधित घोष वाक्य व बॅनर यांचा वापर करून पेसा कायद्याची जनजागृती करण्यात येणार असून अनुसूचित क्षेत्रांतील ग्रामस्थांनी पेसा दिनाच्या निमित्ताने कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या वतीने करण्यात येत आहे.अशी माहिती उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) प्रमोद काळे यांनी दिली.

पेसा दिनाच्या निमित्ताने ग्रामसभा सदस्य, पंचायत सदस्य तसेच शासकीय अधिकारी व कर्मचारी यांची क्षमताबांधणी व्हावी व त्यांच्यामध्ये जनजागृती वाढावी तसेच, या कायद्याच्या अंमलबजावणीत त्यांचा सहभाग वाढवून, ग्रामसभांचे सक्षमीकरण आणि अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतींच्या कामकाजात सुधारणा ही विशेष उद्दिष्टे साध्य करण्यासाठी पेसा दिन साजरा करण्यात येत आहे. तरी, त्या त्या गावातील संबंधीत घटकांनी सहभाग नोंदवावा तसेच ग्रामसभा सदस्यांनी जास्तीतजास्त उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी केले आहे.

Powered By Sangraha 9.0