मायरा वायकुळ चमकणार 'मुक्काम पोस्ट देवाचं घर' चित्रपटात

    21-Dec-2024
Total Views |

myra 
 
 
मुंबई : टीव्ही मालिका आणि सोशल मीडियातून लोकप्रिय असलेली मायरा वायकुळ आगामी 'मुक्काम पोस्ट देवाचं घर' या चित्रपटात झळकणार आहे. ३१ जानेवारीला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार असून नावामुळे आणि सोशल मीडियावर सुरु असलेल्या अनोख्या प्रमोशनमुळे चित्रपटाच्या कथेविषयी प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. सहकुटुंब पाहता येणाऱ्या या चित्रपटाचे पहिले पोस्टर चित्रपटाच्या नावाप्रमाणेच श्री सिद्धिविनायकाच्या चरणी अर्थात देवाच्या घरी प्रदर्शित करण्यात आले. याप्रसंगी मायरा वायकुळ, चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माते उपस्थित होते.
 
ए सी डी कैटचे मनीष कुमार जायसवाल आणि साहील मोशन आर्ट्सचे मंगेश देसाई यांनी 'मुक्काम पोस्ट देवाचं घर' या चित्रपटाची प्रस्तुती केली असून या चित्रपटाच्या निमित्ताने मंगेश देसाई यांनी चित्रपटाच्या प्रस्तुती क्षेत्रात पदार्पण केले आहे. किमाया प्रॉडक्शन्स आणि स्वरुप स्टुडिओज यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. महेश कुमार जायसवाल, किर्ती जायसवाल हे या चित्रपटाचे निर्माते आहेत तर वैशाली संजू राठोड, सचिन नारकर, विकास पवार हे सहनिर्माते आहेत. चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन संकेत माने यांचे असून संकेत माने, सुमित गिरी यांनी पटकथालेखन, सुमित गिरी यांनी संवादलेखन तर चिनार - महेश यांचे श्रवणीय संगीत दिग्दर्शन या चित्रपटाला लाभले आहे.
 
अल्पावधीतच जगभरात पोहचलेल्या मायरा वायकुळची या चित्रपटात मध्यवर्ती भूमिका आहे. त्याचबरोबर अभिनेत्री कल्याणी मुळ्ये, ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी, अभिनेता मंगेश देसाई, कमलेश सावंत,सविता मालपेकर, प्रथमेश परब, सचिन नारकर, रेशम श्रीवर्धनकर आदी कलाकारांच्या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका आहेत. 'मुक्काम पोस्ट देवाचं घर' या चित्रपटात मायराच्या वाट्याला आलेली भूमिका काय आहे? सोशल मीडियावर सुरु असलेल्या पोस्टकार्डच्या प्रमोशनचा चित्रपटाशी नक्की कसला संबंध आहे? हे जाणुन घेण्यासाठी ३१ जानेवारीपर्यंत आपल्याला अजून थोडी वाट पहावी लागणार आहे.