महाराष्ट्राच्या वन आच्छादनात दोन वर्षात केवळ १६ चौ.किमीने वाढ; वन वणव्यांमध्ये देशात पाचव्या स्थानी

21 Dec 2024 22:33:41
maharashtra forest cover




मुंबई (विशेष प्रतिनिधी) -
२०२३ सालचा 'भारतीय वन सर्वेक्षण अहवाल' शनिवार दि. २१ डिसेंबर रोजी नवी दिल्लीमध्ये प्रकाशित करण्यात आला (maharashtra forest cover). या अहवालानुसार गेल्या दोन वर्षांमध्ये भारताच्या वन आच्छादनामध्ये १ हजार ४४५ चौ.किमीने वाढ झाली असून महाराष्ट्रातील वन आच्छादनामध्ये केवळ १६.५३ चौ.किमीने वाढ झाली आहे (maharashtra forest cover). तर राज्यातील कांदळवन आच्छादनामध्ये १२ चौ.किमीने वाढ झाली आहे. (maharashtra forest cover)
 
 
शनिवारी केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांच्या हस्ते 'भारतीय वन सर्वेक्षण अहवाल-२०२३'चे प्रकाशन झाले. गेल्या ३७ वर्षांपासून भारतीय वनांच्या सर्वेक्षण करण्याचे काम सुरू आहे. केंद्र सरकारच्या 'भारतीय वन सर्वेक्षण' विभागाकडून या संदर्भातील काम करण्यात येते. हा विभाग दर दोन वर्षांनी भारतातील वनांचे राज्यानुरुप सर्वेक्षण करुन त्याबाबतचा अहवाल प्रकाशित करतो. २०२१ च्या अहवालानुसार राज्यातील वनक्षेत्रात २० चौ.किमी क्षेत्राची वाढ झाली होती. यामध्ये चार चौ.किमीची घट होऊन गेल्या दोन वर्षांमध्ये राज्यातील वन आच्छादन केवळ १६ चौ.किमीने वाढले आहे. महाराष्ट्राचे अधिसूचित केलेले भौगोलिक क्षेत्र हे ३ लाख ०७ हजार ७१३ चौ.किमी आहे. त्यामधील हरित क्षेत्र हे ६१ हजार ९५२ चौ.किमी असून एकूण भौगोलिक क्षेत्राच्या ते २०.१३ टक्के आहे. २०२१ साली राज्याचे वन आच्छादित क्षेत्र हे ५० हजार ७९८ होते. २०२३ साली त्यामध्ये १६.५३ चौ.किमीने वाढ होऊन ते ५० हजार ८५८ चौ.किमी झाले आहे.
 
 
 
२०२३ सालच्या अहवालानुसार राज्यातील सर्वाधिक वन आच्छादित क्षेत्र हे गडचिरोली जिल्ह्यात आहे. या जिल्ह्यात १० हजार ०१५ चौ.किमी वन आच्छादित क्षेत्र असून त्यामध्ये गेल्या दोन वर्षात ६९.४९ चौ.किमीने वाढ झाली आहे, जी राज्यात सर्वाधिक आहे. तर मुंबई शहरात ४.४२ चौ.किमी असे सर्वाधिक कमी वन आच्छादित क्षेत्र असून त्यामध्ये ०.२२ किमीने वाढ झाली आहे. वण वणव्यांमध्ये २०२१ साली महाराष्ट्र हा देशात तिसऱ्या स्थानावर होता. २०२३ साली तो पाचव्या स्थानावर आला आहे. २०२२-२३ या सालात राज्यात वण वणव्याच्या १६ हजार ११९ घटनांची नोंद झाली, तर २०२३-२४ सालात १६,००८ घटनांची नोंद झाली आहे. राज्यातील सर्वाधिक वन वणव्याच्या नोंदी गडचिरोली जिल्ह्यामधूनच झाल्या आहेत.
 
 
Powered By Sangraha 9.0