ठाणे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निवासस्थान असलेल्या वागळे प्रभाग समितीतील किसन नगर ( Kisan Nagar ) परिसरात ठाणे महापालिकेतर्फे शनिवारी सकाळी सर्वंकष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत झोपडपट्टी परिसर, अंतर्गत रस्ते यांचीही स्वच्छता करण्यात आली.
ठाणे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभाग, अतिक्रमण आणि वागळे इस्टेट प्रभाग समिती यांच्या समन्वयाने किसननगर परिसरातील गटारे, अंतर्गत रस्ते, छोट्या गल्ल्या, पाईपलाइन लगतचा रस्ता, सार्वजनिक शौचालय यांची सर्वंकष स्वच्छता करण्यात आली. ठामपा आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्या मार्गदर्शनात, राबवण्यात आलेल्या या स्वच्छता मोहिमेत सुमारे १०० स्वच्छता कर्मचाऱ्यांसोबत उपायुक्त मनीष जोशी आणि आरोग्य अधिकारी डॉ. राणी शिंदे यांनीही सहभाग घेतला. माजी ज्येष्ठ नगरसेवक राम रेपाळे तसेच शिवशांती प्रतिष्ठानचे स्वयंसेवकही या स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले.
सर्वकष स्वच्छता मोहिमेत झोपडपट्टी परिसरातील अंतर्गत रस्ते, गटारे, आणि सार्वजनिक शौचालय यांची स्वच्छता करण्यात येत आहे. सिद्धेश्वर तलाव परिसरानंतर आज किसननगर येथील परिसरात सर्वंकष स्वच्छता करण्यात आली. गटारे साफ करण्यापासून ते सार्वजनिक शौचालयांच्या स्वच्छतेपर्यंत काम करण्यात आले. या भागात पडलेला राडारोडाही उचलण्यात आल्याचे उपायुक्त मनीष जोशी यांनी सांगितले.