कल्याण मारहाण प्रकरण : अखिलेश शुक्ला यांची पत्नी गीता शुक्लासह सहा आरोपी अटकेत

आरोपींना सहा दिवसांची पोलीस कोठडी

    21-Dec-2024
Total Views |
Kalyan Case

कल्याण : कल्याणमध्ये ( Kalyan Case ) मराठी कुटुंबाला केलेल्या मारहाण प्रकरणी प्रमुख आरोपी अखिलेश शुक्ला, त्याची पत्नी गीता शुक्ला आणि इतर चार आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने या सहा आरोपींना सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सुनावणी दरम्यान आरोपींच्या वकिलांनी प्रांतवादाचा रंग देऊन परिस्थिती अधिक चिघळविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा युक्तिवाद केला. तर दुसरीकडे, फिर्यादींच्या वकिलांनी या घटनेवर कठोर भूमिका घेत न्यायाची मागणी केली आहे.

कल्याणमधील मराठी कुटुंबाला मारहाण प्रकरणात मुख्य आरोपी अखिलेश शुक्ला याच्या पत्नी गीता शुक्ला तसेच विवेक जाधव, पार्थ जाधव या दोन तरुणांसह सुमित जाधव, दर्शन बोराडे या सहा जणांना खडकपाडा पोलिसांनी अटक केली. या सर्व जणांना कल्याण न्यायालयाने सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सहायक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे यांनी सांगितले की, या प्रकरणात एकूण सहा आरोपींना अटक करण्यात आली असून तपास अजूनही सुरू आहे. यातील काही आरोपींनी केलेल्या कृत्यांबाबत पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाली आहे. आरोपींवर कठोर कायदेशीर कारवाई होणार असून, संबंधित घटनांमध्ये दोषी आढळलेल्या कोणालाही सुटता येणार नाही, असे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.