'तुम लढो, में बुके देकर घर जाता हूँ'; एकनाथ शिंदेंचे ठाकरेंना चिमटे

    21-Dec-2024
Total Views |
Shinde And Thackeray

मुंबई : विधान परिषदेत अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना ( Uddhav Thackeray ) जोरदार चिमटे काढले. अंबादास दानवे यांच्याकडे पाहून बोलताना शिंदे म्हणाले, "अंबादास, ‘पूर्वी तुम लढों मै कपडे सांभालता हूँ’ अशी स्थिती होती. आता ‘तुम लढो में बुके देकर घर जाता हूँ…’ अशी स्थिती आहे".

सत्तापदांवर असताना, जे लोक घरी बसत होते, त्यांना जनतेने घरी बसवले. त्यांनी विकास कामांना स्पीड ब्रेकर लावले होते. आधीच्या सरकारने सुरू केलेल्या अनेक योजना बंद केल्या. आम्ही पुन्हा सत्तेवर येताच सर्व योजना सुरु केल्या. आमचे सरकार गतिमान सरकार असल्याचे पुन्हा सिद्ध केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे महापरिनिर्वाण झाल्यानंतर त्यांच्या चिरस्मारकासाठी गिरगाव चौपाटीच्या जागेची मागणी करण्यात आली होती. मात्र ती जागा तत्कालिन काँग्रेस सरकारने दिली नाही. अखेर दादर चौपाटीजवळील बाँबे पोर्ट ट्रस्टच्या जागेवर हे स्मारक उभे राहिले. काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकराना सातत्याने अपमानित केलेच पण मृत्यूनंतरही त्यांची अवहेलना करण्याची संधी सोडली नाही असा घणाघात त्यांनी केली.

गुंडगिरी खपवून घेणार नाही!

येत्या काळात सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी, त्यांच्या आयुष्यात आनंद समाधान निर्माण करण्यासाठी नव्या कल्याणासाठी योजनाही आम्ही सुरु करणार आहोत. हे कायद्याचे राज्य आहे इथे कायदा हातात घेणाऱ्यांची गुंडगिरी मुळीच खपवून घेतली जाणार नाही. आमच्या आया-बहिणींकडं वाकड्या नजरेने बघणाऱ्या गुन्हेगारांना कदापिही माफी नाही हेच आमच्या सरकारचे धोरण आहे.

राज्यातील औद्योगिक विकासाबाबत माहिती देतांना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले महाराष्ट्राला आम्ही उद्योगस्नेही राज्य बनवलं आहे. महाराष्ट्राला औद्योगिक क्षेत्रात पुन्हा क्रमांक एकवर आणले आहे. देशातील एकूण एफडीआयपैकी ५२ टक्के गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात आली आहे. राज्यात २०२२ ते २०२४ या दोन वर्षात राज्यात २ लाख ४४ हजार कोटींची परकीय गुंतवणूक झाली आहे. सामूहिक प्रोत्साहन योजनेअंतर्गत उच्च तंत्रज्ञानांवर आधारित २२१ विशाल, अतिविशाल प्रकल्प उभारतोय. ३ लाख ४८ हजार कोटी गुंतवणूक त्यात होणार आहे तर २ लाख १३ हजार रोजगार निर्मिती येत्या काही वर्षात होईल, असेही त्यांनी सांगितले.