‘भारत जोडो’ अभियानातला शहरी नक्षलवाद!

21 Dec 2024 22:23:52
 
Bharat Jodo
 
 
राहुल गांधींच्या ‘भारत जोडो’ अभियानामध्ये सहभागी असलेल्या 180 संस्थापैकी 40 संस्था या शहरी नक्षल संघटना होत्या, असे हिवाळी अधिवेशनात राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. यावर काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी त्या संघटनांची आणि त्यांच्या अध्यक्षांची नावे मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावी, असे पत्र फडणवीसांना लिहिले आहे. त्यानिमित्ताने राहुल गांधींच्या ‘भारत जोडो’ अभियानाचा आणि शहरी नक्षलवादाचे षड्यंत्र उलगडणारा हा लेख...
 
‘भारत जोडो’ यात्रेच्या अगदी प्रारंभी राहुल गांधींनी अगदी अगत्याने पादरी जॉर्ज पोनय्याशी संवाद साधला. विचारले काय तर, “येशू कोण आहे?” मग पोनय्याने उत्तर दिले की, “तो इतर शक्तींसारखा नाही, तर येशू हाच खरा ईश्वर आहे.” या संवादामधला संदेश काय तर, ‘येशू हाच खरा ईश्वर, बाकी कोणी नाही.’ हा तोच पोनय्या पादरी म्हणजे ख्रिस्ती धर्मगुरू, ज्याने कन्याकुमारीतल्या हिंदूंना म्हटले होते की, “तुम्ही आम्हाला (ख्रिस्ती समाजाला) अल्पसंख्याक समजता का? आम्ही आता 42 टक्के नाही, तर 62 टक्के आहोत. आमची लोकसंख्या कुणीही अडवू शकत नाही.” याच पोनय्याने खुलेआम म्हटले होते की, “जर आम्ही मानत असलेला देव अस्तित्वात असेल, तर नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना कुत्रे आणि किडे खातील, हे आम्हाला बघायला मिळेल.” तर कन्याकुमारीतील हिंदूंना धमकावणार्‍या तसेच संविधानिकरित्या देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान झालेल्या नरेंद्र मोदींबाबत असे हिंसक घृणास्पद विचार असणार्‍या, पोनय्याचा राहुल गांधींच्या ‘भारत जोडो’ यात्रेला आशीर्वाद होता. हे सगळे आठवण्याचे कारण की, नुकतेच राज्यपालाच्या अभिभाषणावरील चर्चेत देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले उत्तर. ते म्हणाले, “राहुल गांधींच्या ‘भारत जोडो’ यात्रेमध्ये शहरी नक्षलवादी संघटना सामील होत्या.” या 40 संघटना कोणत्या याबाबत त्यांनी संदर्भही दिला आहे. ते असेही म्हणाले की, “विरोधी पक्षाच्या देशनिष्ठेविषयी शंका नाही. मात्र, त्यांचा खांदा वापरून अशी कृत्य केली जातात का?”
 
मुख्यमंत्र्यांच्या विधानाचा संदर्भ घेताना राहुल गांधींच्या ‘भारत जोडो’ अभियानातले काही विशेषही आठवत राहते. जसे राहुल गांधीच्या या यात्रेत ‘भारत तेरे तुकडे होंगे हजार’ची इच्छा असणारा कन्हैयाकुमार काँग्रेसचा ‘स्टार नेता’ म्हणून राहुल गांधी यांच्यासोबत होता. भारतीय संसदेवर हल्ला केलेल्या अफजल गुरूच्या फाशीविरोधात भारताचे तुकडे व्हावेत, असे म्हणत, जेएनयूमध्ये कम्युनिस्ट विचारांच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. त्याचे नेतृत्व याच कन्हैयाकुमारने केले होते. तो दिल्लीत शिकायला गेला होता की, ‘भारताचे तुकडे व्हावे’ ही मोहीम राबवण्यासाठी गेला होता? पण, हा कन्हैयाकुमार सध्या काँग्रेसचा नेता आहे आणि तो या ‘भारत जोडो’ यात्रेत होता. या यात्रेत स्वरा भास्कर पण होती. स्वरा भास्करची आजपर्यंतची कारकीर्द पाहा. बाकी पर्यावरणवादी, मानवतावादी लेखक वगैरे सहभागी झाले होते. पण, त्यातील काही लोकांचा मागोवा घेतला, तर एकच जाणवते की, त्यांनी आयुष्यभर एकच काम केले. ते म्हणजे भारतातील कोणत्याही विकास प्रकल्पाविरोधात जनमत कलुषित करणे, साहित्य किंवा कलेच्या माध्यमातून हिंदू धर्म, हिंदू संस्कृती यावर गरळ ओकणे, लोकांना धर्म संस्कृती आणि भारत देश या संकल्पनांपासून दूर ठेवणे. तसेच, भाजपचे केंद्र सरकार त्यातही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रा. स्व. संघ यांच्याविरोधात खोट्यानाट्या अफवा किंवा विधान करून त्यांची प्रतिमा मलिन करणे, या व्यतिरिक्त या लोकांनी काहीच केले नाही.
 
तर सप्टेंबर 2022 साली राहुल गांधींची ‘भारत जोडो’ यात्रा केरळमध्ये होती. पण, ही यात्रा दि. 23 सप्टेंबर 2023 रोजी थांबली. त्या दिवशी राहुल गांधी आणि त्यांच्यासोबत असलेले 119 जण कुणालाही भेटले नाहीत की, एकही कार्यक्रम केला नाही. हा तोच दिवस होता, ज्या दिवशी ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ या इस्लामिक दहशतवादी संघटनेने ‘केरळ बंद’चे आवाहन केले होते. दहशतवादी कृत्यासंदर्भात ‘एनआयए’ने केरळमध्ये ‘पॉप्युलर फ्रंट’वर मोठ्या प्रमाणात कारवाई केली होती. या कारवाई विरोधात दि. 23 सप्टेंबर रोजी ‘पॉप्युलर फ्रंट’ने केरळ बंद राहणार, असे जाहीर केले. दहशतवादी संघटनेच्या हाकेला सज्जनशक्तीने साथ दिली नाही. केरळ सुरू राहिला. पण, राहुल गांधी आणि त्यांची ‘भारत जोडो’ यात्रा थांबली होती. राहुल गांधीनी यात्रा बंद ठेवून दहशतवादी संघटना ‘पॉप्युलर फ्रंट’ला समर्थन केले का, असा प्रश्न उपस्थित झाला. तेव्हा मग ‘भारत जोडो’ यात्रेच्या आयोजकांनी सारवासारव करत सांगितले की, “दि.23 सप्टेंबर रोजी आराम करायचा हे आधीच ठरले होते.” पण, यातून काय समजायचे ते सज्जनशक्ती समजून जाईलच.
 
ही यात्रा जेव्हा मागासवर्गीय समाजाच्या वस्त्यांमधून गेली, तेव्हा ‘संविधान खतरे मे’ वगैरेचा गैरसमज लोकांमध्ये पसरवला गेला. संविधान हटवणार अशी भीती लोकांमध्ये घालण्यात आली. “आम्हीच मूळ निवासी, जलजंगल जमीन आमचीच आहे, त्यावर विकास प्रकल्प उभारणारे भारत सरकार कोण? आम्ही स्वतंत्र आहोत आम्ही देश मानत नाही” असे विचार नक्षली आणि त्यांचे शहरी समर्थक एनकेन प्रकारे दुर्गम भागातील आदिवासींच्या मनात पेरत असल्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. हा संदर्भ यासाठी की, दुर्गम भागातल्या जंगल परिसरात ‘भारत जोडो’यात्रा गेली. तेव्हा तिथे जल, जंगल, जमीनबाबत प्रश्न उपस्थित केला गेला. ‘आदिवासी हेच मूळनिवासी आहेत’ असे या यात्रेच्या माध्यमातून राहुल गांधी बोलत असत. आदिवासी हेच देशाचे खरे निवासी मग इतर भारतीय कोण? मग आदिवासी आणि इतर जातीतील लोक हे एका वंशाचे, एका देशाचे नाहीत, हा विचार समाजात पसरला गेला की नाही? तर याचे उत्तर हो असेच आहे.
 
या अनुषंगाने ‘भारत जोडो’ यात्रेत कोणत्या शहरी नक्षलवादी संघटना सामील झाल्या, त्यांची नावे द्या, असे पत्र नाना पटोले यांनी देवेंद्र फडणवीसांना लिहिले. पण, त्या संघटना कोणत्या हे आधीच आर. आर. पाटील आणि काँग्रेसच्या तत्कालीन केंद्र सरकारने सांगितले होते. पुण्यात झालेल्या नक्षलवादी प्रशिक्षण शिबिराविषयी तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांना विचारले असता, त्यांनी राज्यातील 48 नक्षलवादी संघटनांची यादी दिली होती. तसेच, काँग्रेस केंद्रामध्ये सत्तेत असताना मनमोहन सिंग हे पंतप्रधान होते, त्यावेळी केंद्र सरकारने देशभरातील 72 संघटना या नक्षल्याचे समर्थक म्हणजे ‘फ्रंटल संघटना’ म्हणून काम करतात असे म्हटले होते. आर. आर. पाटलांनी आणि मनमोहन सिंग पंतप्रधान असताना काँग्रेसच्या केंद्र सरकारने ज्या संस्थांना नक्षल्यांच्या मुखवटाधारी अर्थात फ्रंटल संघटना म्हणजेच शहरी नक्षलवादी संघटना म्हटले, त्यापैकी काही संघटना राहुल गांधींच्या ‘भारत जोडो’ अभियानात सहभागी झाले होते, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. पटोल्यांच्या मागणीप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी या संघटनांची नावे जाहीर केली, तर त्यांनी आधीच सांगितल्याप्रमाणे, त्या संघटनांना आर. आर. पाटील आणि काँगेसच्या केंद्र सरकारनेच नक्षली फ्रंटल संघटना म्हणून घोषित केले आहे. दुसरे असे की, या संघटनांची नावे सांगितली आणि त्या संघटना या ‘भारत जोडो’ यात्रेत सामील असतील, तर त्याचे गंभीर परिणाम राहुल गांधी आणि काँग्रेस यांच्यावर होणारच. पण, आपल्याला काय नाना पटोलेंना त्या संघटनांची नाव हवी आहेत.
 
असो. नक्षलवादी म्हणजे जंगलात राहणारा, दुर्गम भागात लोकांवर दहशत माजवणारा, गोळीबार, बॉम्बस्फोट हिंसा करणारा असेच बहुतेकांना वाटते. पण, जंगलात राहणार्‍या आणि आधुनिकतेचा वाराही न लागलेल्या किंवा शहरी भागातील गरीब वस्त्यांमध्ये सोईसुविधांपासून वंचित असलेल्या लोकांपर्यंत देशातले सगळे विषय वेगळा चुकीचा अर्थ घेऊन कोण पोहोचवते? अज्ञानी, अशिक्षित, वंचित, शोषित लोकांना देशाच्या सत्तेबद्दल कोण भडकवते? डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे समस्त भारतीयांचेच नव्हे, तर अन्याय, विषमता या विरोधात उभे ठाकणार्‍या प्रत्येकाचे आदर्श आहेत. ते कोण्या एका जातीचे नाहीत. पण, शहरातल्या उपेक्षित समाजाच्या वस्तीमध्ये जाऊन ‘जय भीम’ बोलण्याआधी, ‘तुमचे रक्त तपासा’ म्हणत तिथल्या जनतेला चिथावले जाते की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ एका जातीचे आहेत. दुसर्‍या जातीतल्या माणसांनी ‘जय भीम’ बोलले, तर त्यांची जीभ हासडा त्याचे रक्त काढा. हे चिथावणारे कोण आहेत? कोरेगाव-भिमा दंगल घडली तेव्हा ‘आपल्या समाजाच्या आयाबायांना बामन मराठे उघड नागड करून मारत आहेत’ अशी धांदात खोटी अफवा पसरवणारे आणि भोळ्या समाजाला काही तरूणांना कोरेगाव-भिमाच्या दंगलीत लोटणारे कोण होते? जंगलातले नक्षली जंगलात हिंसा करतात. पण, हे शहरी नक्षली वस्त्यांतल्या तरूणांचे भविष्य गिळतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेऊन नेमके त्यांच्या विचारांच्या विरोधात वागतात. आंदोलन, हिंसक मोर्चे यामध्ये तरूण कसे सहभागी होतील, याचे नियोजन करतात. पण, केवळ मागासवर्गीयांच्या वस्त्याच बळी आहेत का? तर नाही उच्चशिक्षण देणार्‍या संस्था, कॉपोरेट क्षेत्र, साहित्य यामध्ये देव, देश, धर्म याबाबत संभ्रम निर्माण करून समाजातल्या उच्चशिक्षित आणि सर्वच बाबतीत संपन्न असलेल्या तरूणाईलाही स्वातंत्र्याच्या, क्रांतीच्या खोट्या कल्पनांनी भ्रमित केले जाते. नक्षली जंगलात दुर्गम भागांत हिंसाचार करतात. मात्र, त्यांना त्यासाठी आर्थिक रसद पुरवणे, लोक चिथावली जातील, असे साहित्य पुरवणे, सरकार आणि लोकांना जेरीस आणण्यासाठी नवनवीन हिंसात्मक योजना बनवणे, हे सगळे कोण करते? तर उत्तर आहे ‘शहरी नक्षलवादी.’ या अशा शहरी नक्षलवाद्यांचा सहभाग जर राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ अभियान यात्रेत असेल, तर हे देश आणि समाजाच्या दृष्टीने खूपच घातक आहे. या यात्रेत सामील असलेल्या 40 संघटनांनी यात्रेदरम्यान त्यांचा देशसमाजविरोधी अजेंडा राबवला का, हीसुद्धा भीती आहे. या परिक्षेपात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे धन्यवाद, त्यांनी शहरी नक्षलवादाबाबतची चर्चा जनमानसांपर्यंत पोहोचविली. त्यामुळे आंदोलन उपोषण मोर्चे यामध्ये घुसून अराजक पसरवणार्‍या शहरी नक्षलवाद्यांचे खरे रूप उघड पडले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संविधान, भगवान बिरसा मुंडा आणि शाहू, फुले अगदी संत कबीरांचे आणि संत तुकोबारायांचेही नाव वापरत नेमके या संतमहात्म्यांच्या, थोर व्यक्तींच्या विचारांच्या कृतीच्या विरोधात देशद्रोही कृत्य करणार्‍या आणि देशाला समाजाला तोडू पाहणार्‍या या संघटना आज कार्यरत आहेत, असे दिसते. या संघटनांना आणि त्यांच्या छुप्या हस्तकांना ओळखणे हे देशावर प्रेम करणार्‍या प्रत्येक भारतीयांचे आज प्रथम कर्तव्य आहे, नव्हे धर्म आहे. ‘भारत जोडो’ अभियान आणि शहरी नक्षलवादाबाबत तुर्तास इतकेच!
Powered By Sangraha 9.0