‘लव्ह जिहाद’च्या वास्तवाचा ‘हिरवा व्हायरस’

21 Dec 2024 23:35:08



love jihad


सर्वधर्मसमभाव’ आणि ‘हिंदू-मुस्लीम भाई भाई’ असे विचार हल्लीच्या मुलांच्या मनावर जाणूनबुजून बिंबवल्याचे बरेचदा आढळून येते. अशी मुलेमुली सर्वांकडे माणुसकीच्याच दृष्टिकोनातून बघतात. आधुनिकतेच्या नावाखाली या मुली ‘मेरा अब्दुल वैसा नहीं हैं’ असे समजतात आणि तिथेच फसतात. त्या म्हणतात की, “हिंदू मुलगा आणि मुस्लीम मुलगी असेही विवाह होतातच की! मग मुस्लीम मुलगा आणि हिंदू मुलगी अशाच विवाहाला विरोध का?” याच प्रश्नाचे समाधानकारक उत्तर देणारे पुस्तक म्हणजे ‘व्हायरस.’ आजूबाजूला ‘लव्ह जिहाद’ची अनेक उदाहरणे पाहायला आणि ऐकायला मिळत असल्यामुळे अजय जगताप यांनी मांडलेला हा विषय आजच्या काळात महत्त्वाचा ठरावा.
 
काही मुस्लीम मुलं हिंदू मुलींना मारतात, ओरडतात, शिव्या देतात, तर काही मुलं मात्र गोड बोलून तिचे हात दगडाखाली असल्याची खात्री करून तिला धमक्या देतात. जणू एखाद्या ‘व्हायरस’सारखे हळूहळू आपले रंग दाखवत, तिला आपल्या अमलाखाली आणतात. या दोन्ही प्रकारची उदाहरणे आपल्याला ‘व्हायरस’ या पुस्तकात वाचायला मिळतात. पुस्तकात एकूण पाच कथा असून, त्या अत्यंत प्रभावी आणि वास्तवदर्शी शैलीत मांडल्या आहेत.
 
आपल्या दैनंदिन जीवनात अगदीच सामान्य वाटावी, अशी आपली त्यांच्याशी भेट होते. बरेचदा महाविद्यालयात किंवा टेलिकॉलिंगचे काम करताना किंवा अगदी हिंदूंच्या नवरात्रोत्सवातील गरब्यामध्ये देखील या मुलांची घुसखोरी अलीकडे निदर्शनास आली आहे. काही वेळेस ही मुले आपले नाव सांगतात, तर कधी आपली ओळख लपवतात. मग एखादी कॉफी किंवा रात्री एखादवेळेस मुलीला ‘लिफ्ट’ देण्यापासून सुरुवात होते आणि शेवट मात्र केवळ पश्चातापानेच होतो. अगदी हेच पुस्तकाच्या मुखपृष्ठातूनदेखील व्यक्त होते. हा ‘हिरवा व्हायरस’ एकदा का मुलीच्या मनात शिरला की, ती त्या मुलाला वश झाल्यासारखी वागू लागते. त्याचे ते गोरपान दिसणे, टापटीप राहणे, स्टाईलने बाईक पळवणे, बिनधास्त आणि हक्काने बोलणे यावर 16-17 वर्षांच्या नुकत्याच कॉलेजची हवा लागलेल्या कोवळ्या मुली हरखून जातात.
 
‘लव्ह जिहाद’ची केस कुठेतरी घडली म्हणून, आपण गाफील राहून चालणार नाही. कारण, आता आपली सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यनगरीत एका रस्त्यावर ‘मॉडर्न फॅशन’ आणि उन्हापासून संरक्षण म्हणून येणार्‍या-जाणार्‍या मुलींना निशुल्क हिजाब बांधून देणारी सीमा ऊर्फ शबाना आपल्याही मुलीला भेटू शकते. आपल्या संस्कारी, धार्मिक घरातील पारंपरिक वेशात राहणार्‍या मुलीने कधीतरी जीन्स-टॉप घालताच ‘अल्ला कसम, क्याऽ दिखती रे तू’ हे वाक्य तिला स्तुती वाटली तर? तो मुलगा तिला आपलासा वाटला तर?
 
अशाच प्रकारे मैत्री होऊन कधी तिच्या कलांनी तर कधी ‘ब्लॅकमेल’ करून विवाहास बळी पाडले जाते. लेखकाने ‘लव्ह जिहाद’च्या अशा पाच कथा सांगून, याविषयीच्या भयाण वास्तवाला वाचा फोडली आहे. ‘अब्दुल’वरील प्रेमाचा अंत केवळ दुःखदच होतो. पण, त्यापासून वाचण्यासाठी आईवडिलांशी संवाद आणि त्यांच्यावरील विश्वास हाच एकमेव मार्ग असू शकतो. दुर्दैवाने जर आपण त्यात अडकलो, तर काही सामाजिक कार्यकर्ते असतात, त्यांची मदत घेता येते, हेदेखील ‘व्हायरस’ पुस्तक वाचकाच्या मनावर ठसवते. पुस्तकातील शब्दरचना आणि संवादशैली त्या प्रसंगाला जीवंत करते. वाचकांच्या मनात घुमत राहणारी कथावस्तू असलेले ‘व्हायरस’ प्रत्येकाने वाचावे असेच!

ओवी लेले
 
पुस्तकाचे नाव : व्हायरस, लेखक : अजय जगताप, संपादन : जयेश मेस्त्री, प्रकाशन : विवेक, मूल्य : 150/- रु., नोंदणीसाठी संपर्क : 
Powered By Sangraha 9.0