मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Surgical Strike on Bangladesh) "हिंदूंवर ज्याप्रकारे हल्ले होत आहेत, त्यामुळे मानवतेला काळीमा फासला जात आहे. बांगलादेशात इस्लामिक जिहादी हिंदू, बौद्ध आणि ख्रिश्चन अनुयायांचा छळ करत आहेत. अशा स्थितीत तेथील हिंदूंच्या रक्षणासाठी केंद्र सरकारने लष्करी कारवाई करावी. नुसते आंदोलन करून काहीही होणार नाही. बांगलादेशवर सर्जिकल स्ट्राईकचे आदेश द्यावेत.", असे म्हणत जुना आखाड्याचे ज्येष्ठ महामंडलेश्वर स्वामी यतिंद्रानंद गिरी यांनी शुक्रवारी बांगलादेशी हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराबाबत तीव्र चिंता व्यक्त केली.
बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मुहम्मद युनूस यांच्याकडून नोबेल पारितोषिक काढून घेण्याच्या मागणीवर भर देत ते म्हणाले, शांततेचा नोबेल पुरस्कार मानवतेची हत्या करणाऱ्यांना द्यायचा का? मुहम्मद युनूस आणि बांगलादेशी इस्लामिक जिहादींकडून ज्या प्रकारे मानवतेची हत्या केली जात आहे आणि संयुक्त राष्ट्र, मानवाधिकार आयोग यांसारख्या संघटना मूकपणे या गोष्टी पाहत आहेत, ते सहन करता येणार नाही. बेकायदेशीरपणे भारतात घुसलेल्या बांगलादेशी आणि रोहिंग्यांना हद्दपार करण्याची गरज आहे.