मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Saffron Flag on Mandir) उत्तर प्रदेशच्या बरेली जिल्ह्यात गैर हिंदूंच्या ताब्यात असलेले आणखी एक घर मंदिर असल्याचा दावा नुकताच हिंदू संघटणांकडून करण्यात आला. त्याठिकाणी पहारेकरी म्हणून आलेल्या वाजिद अली नावाच्या व्यक्तीने त्या घरावर इस्लामी ध्वज फडकववला होता. मात्र ते घर मंदिर असल्याचा दाव्यानंतर प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी करून घर रिकामे करण्याची नोटीस सदर घराच्या भिंतीवर चिकटवली आहे. त्यामुळे हिंदू संघटनेच्या सदस्यांनी सक्रिय होऊन घरातून इस्लामी झेंडा काढत त्याठिकाणी भगवा ध्वज फडकवल्याचे पाहायला मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हे घर साधारण १५० ते २०० वर्ष जूने मंदिर असल्याचे सांगितले जात आहे. ५० वर्षांपूर्वी वाजिद अली नावाचा एक माणूस येथे पहारेकरी म्हणून आला होता आणि त्याने हळूहळू संपूर्ण मंदिर ताब्यात घेतले. यानंतर त्याने मूर्ती गायब केल्या आणि पूजाही बंद केली. नंतर मंदिराचे घरामध्ये रूपांतर करून त्यावर इस्लामी ध्वज फडकवण्यात आला. येथील कटघर परिसरात राहणारे राकेश सिंह यांनी हा दावा केला आहे.
राकेश सिंह यांच्या दाव्यानुसार, त्यांच्या पूर्वजांनी महाराणी गंगेचे मंदिर याठिकाणी बांधले होते. त्यानंतर या मंदिरात अनेक देवी-देवतांच्या मूर्ती विधीनुसार बसवण्यात आल्या. अल्पावधीतच हे मंदिर आसपासच्या हिंदूंच्या श्रद्धेचे केंद्र बनले होते. येथे नियमित पूजा होऊ लागली. मात्र सुमारे ५० वर्षांपूर्वी या मंदिरात बांधलेली खोली सहकारी संस्थेला भाड्याने देण्यात आली होती. कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या लोकांनी वाजिद अली नावाच्या चौकीदाराची येथे देखभालीसाठी नेमणूक केली. त्याने येथे स्थापित केलेल्या मूर्ती हळूहळू गायब करत संपूर्ण मंदिराचा हळूहळू ताबा घेतला असा आरोप वाजिदवर करण्यात आला आहे.
हिंदू संघटनेच्या सदस्यांनी जेव्हा घरावरील इस्लामी ध्वज काढून तेथे भगवा ध्वज फडकावला तेव्हा गच्चीवरून ‘जय श्री राम’च्या घोषणा देण्यात आल्या होत्या. दरम्यान पोलीस प्रशासनही तातडीने सक्रिय झाले होते. मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. प्रशासनाच्या तपासात वाजिद अली किंवा त्यांच्या मुलांनी या घरावर बेकायदा कब्जा केल्याचे समोर आले आहे. या आधारे प्रशासनाने वाजिदच्या कुटुंबीयांना घर रिकामे करण्याचे निर्देश दिले आहेत. घरावर नोटीसही चिकटवण्यात आली आहे. सध्या घर सील करण्यात आले असून राकेश सिंह यांच्या दाव्याची चौकशी सुरू आहे.