प्रसिद्ध गीतकार मजरूह सुलतानपुरी यांना यावर्षीचा ‘मोहम्मद रफी जीवनगौरव’ जाहीर

21 Dec 2024 16:58:50

image
 
मुंबई : प्रसिद्ध गीतकार मजरूह सुलतानपुरी यांना यावर्षीचा ‘मोहम्मद रफी जीवनगौरव’ आणि ख्यातनाम गायक जावेद अली यांना ‘मोहम्मद रफी पुरस्कार २०२४’ जाहीर झाल्याची घोषणा मुंबई भाजपा अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे मंत्री आशिष शेलार यांनी केली आहे. २४ डिसेंबर रोजी वांद्रे येथील रंगशारदा येथे ६ वाजता होणाऱ्या पुरस्कार प्रदान सोहळ्यात महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात येणार आहेत. मजरूह सुलतानपुरी यांना मरणोत्तर जीवनगौरव पुरस्कार देण्यात येणार असून त्यांच्या वतीने त्यांचे चिरंजीव अंदलिब मजरूह सुलतानपुरी हे पुरस्कार स्वीकारतील.
 
आशिष शेलार यांच्या ‘स्पंदन’ या संस्थेतर्फे मोहम्मद रफी यांच्या वाढदिवसादिवशी त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी एका संगीत क्षेत्रातील ज्येष्ठ कलावंताला जीवन गौरव मोहम्मद रफी पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. या पुरस्काराचे हे १८ वे वर्ष आहे. एक लाखाचा धनादेश, स्मृतीचिन्ह आणि शाल श्रीफळ असे जीवनगौरव पुरस्काराचे स्वरूप असून, ५१ हजार रू. रोख आणि मानचिन्ह असे रफी पुरस्काराचे स्वरूप आहे.
 
यापूर्वी संगीतकार आनंदजी, गायक अमीत कुमार यांच्यासह ज्येष्ठ गायिका आशा भोसले, सुरेश वाडकर, शमशाद बेगम, सोनू निगम, संगितकार रवी, शैलेंद्र सिंग, नौशाद अली, पॅरेलाल, सुमन कल्याणपूर, अनुराधा पौडवाल, खय्याम, संगीतकार उषा खन्ना, गायक उदित नारायण या मान्यवर कलावंतासह ख्यातनाम निवेदक अमिन सयानी यांनांही या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
 
या कार्यक्रमात प्रसाद महाडकर यांच्या जीवनगाणीतर्फे "फिर रफी" या बहारदार मैफिलीत ख्यातनाम गायक श्रीकांत नारायण हे मोहम्मद रफी यांची अजरामर गाणी सादर करणार आहेत. कार्यक्रमाचे निवेदन रेडियो जॉकी असलेले आर. जे गौरव करणार आहेत. हा कार्यक्रम विनामूल्य असणार आहे.
Powered By Sangraha 9.0