शिक्षणासाठी व्यवस्था बाधक नव्हे तर साधक असावी!

21 Dec 2024 11:44:51

Mohanji Bhagwat on Education System

पुणे : (Dr.Mohanji Bhagwat on Education System)
"शिक्षणासाठी व्यवस्था बाधक नाही तर साधक असायला पाहिजे. शैक्षणिक व्यवस्थेचे स्वरूप केवळ नियमन करणारे असू नये, तर ते शिक्षणासाठी पोषक ठरायला हवे.", असे स्पष्ट मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी व्यक्त केले. शुक्रवार, दि. २० डिसेंबर रोजी पाषाण येथे आयोजित लोकसेवा ई स्कुलच्या नवीन इमारतीच्या अनावरण कार्यक्रमात ते बोलत होते.

कार्यक्रमाला माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी, शास्त्रीय संगीत गायक महेश काळे, भारतीय जैन संघटनेचे संस्थापक शांतीलाल मुथ्था, कॉसमॉस बॅंकेचे अध्यक्ष मिलिंद काळे, उद्योजक पुनीत बालन, लोकसेवा प्रतिष्ठानचे संचालक अॅड. वैदिक पायगुडे, माजी संचालक निवेदिता मडकीकर आदी उपस्थित होते.

हे वाचलंत का? वृक्षमातेला वनवासी कल्याण आश्रमने वाहिली श्रद्धांजली

शिक्षणाचा विषय चौकटीत अडकू नये म्हणून तो समाजाधारित असावा, यावर भर देत सरसंघचालक पुढे म्हणाले, "साक्षरता आणि शिक्षण यात फरक आहे. पोट भरणे म्हणजे शिक्षण नाही. तर माणूस होण्यासाठी शिक्षणाची गरज आहे. माणूस घडविण्याची प्रक्रिया म्हणजे शिक्षण होय. त्यामुळे शिक्षण हा व्यवसाय नसून एक व्रत आहे, एक सेवा आहे." नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीतून राष्ट्राला पाहिजे तसे व्यक्ती निर्माण होईल, अशी आशा देखील सरसंघचालकांनी व्यक्त केली.

शांतीलाल मुथा म्हणाले, "स्वातंत्र्यानंतर प्रथमच सर्वोत्कृष्ट शैक्षणिक धोरण निर्माण झाले आहे. ज्यातून नवभारत निर्माण होईल. धोरण जरी चांगले असले तरी त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याची गरज आहे. कारण पाश्चिमात्य संस्कृतीच्या आक्रमनामुळे मूल्य शिक्षण आणि कुटुंब व्यवस्थेसमोर आता अनेक आव्हाने उभी राहत आहेत." कार्यक्रमाच्या सुरूवातीला नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेच्या विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध पथसंचलन करत मान्यवरांना अभिवादन केले.

पाठ्यपुस्तकांवर अजूनही वसाहतवादाची छाप : अविनाश धर्माधिकारी
स्वातंत्र्यानंतर आजही आपल्या पाठ्यपुस्तकांवर वसाहतवादी मानसिकता असल्याची खंत अविनाश धर्माधिकारी यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, "पाठ्यपुस्तकातून आजही आपल्या देशाचा आणि संस्कृतीचा अशास्त्रीय आणि सत्याला धरून नसलेला इतिहास शिकविला जात आहे. भारत आणि भारतीय संस्कृतीला विरोध करणाऱ्या शक्तींचा वैचारिक व व्यावहारिक ठसा आजही पाठ्यपुस्तकांद्वारे पुढील पिढ्यांपर्यंत जात आहे. सरकार नावाची व्यवस्था काय करेल यावर न थांबता आपण आपल्या शुद्ध बुद्धीला जाणवेल असे विचार मांडले पाहीजेत." भविष्याला दिशा देणारी आपली सनातन संस्कृती आणि आधुनिक शास्त्र यांचा मेळ घालायला हवा, असेही धर्माधिकारी म्हणाले.

Powered By Sangraha 9.0