पाठ्यपुस्तकांवर अजूनही वसाहतवादाची छाप : अविनाश धर्माधिकारी

    21-Dec-2024
Total Views |

Avinash Dharmadhikari

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Avinash Dharmadhikari on Education)
स्वातंत्र्यानंतर आजही आपल्या पाठ्यपुस्तकांवर वसाहतवादी मानसिकता असल्याची खंत माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी व्यक्त केली. शुक्रवार, दि. २० डिसेंबर रोजी पुण्याच्या पाषाण येथे संपन्न झालेल्या लोकसेवा ई स्कुलच्या नवीन इमारतीच्या अनावरण कार्यक्रमात ते बोलत होते.

उपस्थितांना संबोधत पुढे ते म्हणाले, "पाठ्यपुस्तकातून आजही आपल्या देशाचा आणि संस्कृतीचा अशास्त्रीय आणि सत्याला धरून नसलेला इतिहास शिकविला जात आहे. भारत आणि भारतीय संस्कृतीला विरोध करणाऱ्या शक्तींचा वैचारिक व व्यावहारिक ठसा आजही पाठ्यपुस्तकांद्वारे पुढील पिढ्यांपर्यंत जात आहे. सरकार नावाची व्यवस्था काय करेल यावर न थांबता आपण आपल्या शुद्ध बुद्धीला जाणवेल असे विचार मांडले पाहीजेत." भविष्याला दिशा देणारी आपली सनातन संस्कृती आणि आधुनिक शास्त्र यांचा मेळ घालायला हवा."

यावेळी व्यासपीठावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत, शास्त्रीय संगीत गायक महेश काळे, भारतीय जैन संघटनेचे संस्थापक शांतीलाल मुथ्था, कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष मिलिंद काळे, उद्योजक पुनीत बालन, लोकसेवा प्रतिष्ठानचे संचालक अॅड. वैदिक पायगुडे, माजी संचालक निवेदिता मडकीकर आदी मान्यवर उपस्थित होते.