मुंबई : 'पुष्पा २: द रुल' हा अल्लू अर्जूनचा चित्रपट सध्या जगभरात धुमाकूळ घालत आहे. बॉक्स ऑफिसवर अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड मोडत ‘पुष्पा २’ चित्रपटाने १४०० कोटींच्या पुढे बॉक्स ऑफिसवर कमाई केली आहे. या चित्रपटाच्या हैदराबादमधील प्रिमिअरला झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये एका महिलेला जीव गमवावा लागला होता. आणि त्या महिलेचा मुलगा गंभीर जखमी झाला होता. श्रीतेज असं त्या मुलाचं नाव असून या प्रकरणी अभिनेता अल्लू अर्जुनला अटक करण्यात आली होती. परंतु तेलंगणा उच्च न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केल्यानंतर एका दिवसानंतर त्याची सुटका करण्यात आली होती. दरम्यान, अल्लू अर्जुनचे वडील अल्लू अरविंद यांनी रुग्णालयात जाऊन त्याची भेट घेतली. त्यानंतर आता 'पुष्पा २' चे दिग्दर्शक सुकुमार यांनी देखील श्रीतेजची भेट घेतल्याचं सांगितले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिग्दर्शक सुकुमार यांनी रुग्णालयात जाऊन जखमी मुलाच्या तब्येतीची विचारपूस केली असून त्याच्या कुटुंबीयांसोबत संवाद साधला. त्याचबरोबर या पीडित कुटुंबासाठी मदतीचा हात त्यांनी पुढे केला असून या कुटुंबाला जवळपास ५ लाखांची आर्थिक मदत करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं आहे. सोशल मीडियावर सुकुमार यांच्या पीआरओ मार्फत पोस्ट शेअर करण्यात आली असून यात लिहिले आहे की, "दिग्दर्शक सुकुमार यांनी रुग्णालयात जाऊन श्रीतेजची खास भेट घेतली. शिवाय त्यांच्या पत्नीने पीडित कुटुंबाला ५ लाखांची मदत केली आहे."
सुकुमार दिग्दर्शित पुष्पा २ चित्रपटात अल्लु अर्जूनसोबत रश्मिका मंदाना आणि फहाद फासिल यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तसेच, या चित्रपटाने आत्तापर्यंत देशभरात ९९२.१६ कोटींची कमाई केली आहे.