अनंत ‘प्रतिभा’शक्ती

    20-Dec-2024   
Total Views |
 
Pratibha Anant Joshi
 
मुंबई मनपात वरिष्ठ पदावर काम करत त्यांनी संसार, नोकरी आणि आपली साहित्यिक आवडही जोपासली. जाणून घेऊया मुंबईतील प्रतिभा अनंत जोशी यांच्याविषयी...
 
प्रतिभा अनंत जोशी यांचा जन्म वांद्रेचा. प्राथमिक शिक्षण गिरगावातील ठाकुरद्वार मनपा शाळेत झाले. वडील खासगी रुग्णालयात कार्यरत होते, तर आई गृहिणी. 1956 साली मॅट्रिकचे शिक्षण त्यांनी शारदा सदन मुलींच्या शाळेमधून पूर्ण केले. शाळेतील स्नेहसंमेलनात नाटकांमध्येही त्या सहभागी होत असत. त्यावेळी गणित, विज्ञान आणि संस्कृतमध्ये प्रतिभा यांना सर्वोत्तम गुण मिळत असल्याने त्यासाठी त्यांना दहा रुपये बक्षीस म्हणून मिळत. विशेष म्हणजे, या पैशांतून त्यांना फक्त पुस्तकेच विकत घ्यावी लागत असत. उत्तम गुण असूनही त्यांना महाविद्यालयीन शिक्षण घेता आले नाही. त्याचे कारण म्हणजे वडिलांची जेमतेम असलेली आर्थिक परिस्थिती.
 
मॅट्रिकनंतर त्यांनी एक वर्षाचा ‘प्रायमरी टीचर्स कोर्स’ केला. यानंतर त्या सहा महिन्यांतच कुलाबा मनपा शाळेत शिक्षिका म्हणून रुजू झाल्या. शिक्षिकेची नोकरी करण्यात फारसा रस नसल्याने त्यांनी मनपात लिपीकपदासाठी अर्ज केला. यानंतर लागलीच त्यांची लिपीक म्हणून नियुक्ती झाली. शिक्षणाची आवड असल्याने त्यांनी पुढे पदवीच्या शिक्षणासाठी ‘एसएनडीटी विद्यापीठा’तून बहिस्थ विद्यार्थी म्हणून प्रवेश घेतला. 1960 साली त्यांनी कला शाखेत पदवी मिळवली. 1963 साली अनंत जोशी यांच्याशी विवाह झाला. पुढे मुलांना त्यांच्या कलांमध्ये प्रोत्साहन देण्यास त्यांनी सुरुवात केली. 1975 साली त्यांनी ‘एमए’चे शिक्षण पूर्ण केले. मुंबई मनपाच्या इंटर वॉर्ड स्पर्धांमध्ये त्यांनी नाटकात सहभाग घेतला. एकदा त्यांना बक्षीसही मिळाले. 1977 साली त्यांनी मनपाच्या ‘हेड क्लार्क’ची परीक्षा दिली. या परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांची लागलीच ‘हेड क्लार्क’पदावर पदोन्नती झाली. त्या काळात ही परीक्षा अत्यंत कठीण समजली जायची. त्यातही ही परीक्षा देणार्‍यांमध्ये महिलांचा सहभाग अतिशय नगण्य असाच होता. 1984 साली प्रतिभा यांचे पती अनंत यांना सौम्य हृदयविकाराचा झटका आला. मुलीचे लग्न झाल्यावर त्यांचे आजारपण आणखी वाढले. पुढे त्यांनी ‘बेस्ट’ची नोकरी सोडली.
 
कारण, त्याठिकाणी पदोन्नती नव्हती. काही वर्षे त्यांनी मुंबई विद्यापीठात काम केले. त्यानंतर काही काळ खासगी नोकरी केली. तिथेही मन न रमल्याने ‘इनकम टॅक्स सेल्स कन्सल्टंट’ म्हणून त्यांनी स्वतंत्र व्यवसाय सुरू केला. ‘पी दक्षिण’मध्ये प्रतिभा ‘हेड क्लार्क’ म्हणून जबाबदारी सांभाळत होत्या. नोकरी करत असतानाही त्यांनी नाटक, लेखन या आवडी सुरूच ठेवल्या. पुढे 1989 साली त्यांची ‘ओएस’पदी पदोन्नती झाली. प्रतिभा यांची मुलगी कथ्थकमध्ये विशारद आहे, तर मुलगा वेस्ट इंडिजमध्ये विद्यापीठात कार्यरत आहे. मुळात प्रतिभा यांच्या कुटुंबात संगीताची विशेष आवड. मुलालाही तबला वादनात आवड होती. ‘बीएससी’नंतर त्याला थेट ‘पीएचडी’ करण्याची संधी मिळाली, कारण त्यांचा पेपर अतिशय उत्कृष्ट होता. नरेंद्र जाधव यांचे बंधू हे प्रतिभा यांचे वॉर्ड ऑफिसर होते. त्यामुळे त्यांचेही सहकार्य प्रतिभा यांना मिळाले. प्रतिभा यांना साहित्याची आवड आहे, हे माहीत असल्याने ते नेहमी साहित्यिक कार्यक्रमांविषयी त्यांना सांगत असे. प्रतिभा यांनी अनेक कादंबर्‍यांचे परीक्षणही केले. 1991 साली प्रतिभा जोशी नोकरीतून सेवानिवृत्त झाल्या. काही काळ त्यांनी ‘संस्कार भारती’चेही काम केले. अनेक कार्यक्रमांमध्ये त्यांनी निवेदक म्हणूनही जबाबदारी सांभाळली. प्रतिभा विविध वृत्तपत्रांना पत्रे पाठवत असत. एखादा लेख तथा लिखाण आवडल्यानंतर त्या आवर्जून पत्र पाठवत असत. मात्र, आता आधुनिक तंत्रज्ञान आणि मोबाईलचा वाढता वापर यांमुळे त्यांना ते शक्य होत नाही. अनेक नाटकांची परीक्षणेही त्यांनी लिहिली.
 
प्रतिभा यांना प्रासंगिक कविता करण्याचाही छंद आहे. लग्न, वाढदिवस, डोहाळे जेवण, बारसे अशा विविध विशेष दिवशी त्या कविता करतात. ‘ओंजळीतील शब्दफुले’ व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून त्यांची काव्यलेखनाची आवड वाढत गेली. हळूहळू त्या मोबाईलवर मराठी टायपिंगही शिकल्या. ‘दादर भगिनी समाज संस्थे’च्या त्या सदस्य झाल्या. यादरम्यान त्यांना अनेकदा वक्तृत्व आणि निबंधांसाठी बक्षिसे मिळाली. पुढे त्यांनी ‘गोरेगाव महिला मंडळा’च्या सचिव म्हणून काम पाहिले. अध्यक्ष म्हणूनही त्यांनी दोन वर्षे काम पाहिले. ‘आनंददायी मंडळा’मध्ये त्या सक्रिय होत्या. लेख आणि कविता असलेले ‘द्विदल’ हे पुस्तक त्यांनी पतीच्या हस्ते प्रकाशित केले. 2010 साली पतीचे निधन झाले. दोन वर्षे ते ऑक्सिजनवर होते. पतीच्या आजारपणावर व त्यादरम्यानच्या प्रसंगांवर त्यांनी ‘अशी झुंज, असा लढा’ हे पुस्तकही लिहिले. लांजा येथील गरजू मुलीला प्रतिभा यांनी स्वतः शिकवले आणि स्वतःच्या पायावर उभे केले. सध्या ‘गोरेगाव महिला मंडळा’च्या सल्लागार म्हणूनही त्या काम पाहात आहेत. 2014 साली त्यांचे ब्रेन ट्युमरचे ऑपरेशन झाले. “महिलांनी शिक्षण झाल्यानंतर आपल्या संसाराला हातभार लागेल, याचा विचार करावा,” असे आवाहन त्या महिलांना करतात. प्रतिभा जोशी यांना त्यांच्या आगामी वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे मनःपूर्वक शुभेच्छा...

पवन बोरस्ते

सध्या दै. मुंबई तरुण भारत वृत्तपत्रामध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. मागील नऊ वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय. स्वा. सावरकरांच्या जन्मभूमीत वास्तव्य. पुणे विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. राजकारण, मराठी साहित्य आणि जनसंपर्क वृद्धीत विशेष रुची.