विरोधकांचे अशोभनीय वर्तन

    20-Dec-2024
Total Views |

Indecent behavior
 
विरोधकांना आजकाल काही झाले आहे की मुद्दाम ते असे विचित्र वागतात, असा सर्वसामान्यांना प्रश्न पडणे स्वाभाविकच. मात्र, आपण राज्यात आणि देशात लोकप्रतिनिधींवर विश्वास ठेवून निवडून दिल्यानंतर आता लोक तटस्थपणे या निवडून दिलेल्या लोकांच्या वर्तनावर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. विशेषतः विरोधकांकडून तर जो काही धिंगाणा घातला जात आहे, त्याचे नक्कीच संतप्त पडसाद जनतेच्या मनात उमटत आहेत, यात शंका नसावी. कारण, विकासासाठी काम करणारे लोक सत्तेत असल्याने ते कदापि अशा तर्‍हेचे अशोभनीय आणि राज्याच्या, देशाच्या प्रतिमेला तडा जाईल, असे वर्तन करणे शक्य नाही, असा ठाम विश्वास जनतेत आहे.
 
विरोधकांना आजकाल काही झाले आहे की मुद्दाम ते असे विचित्र वागतात, असा सर्वसामान्यांना प्रश्न पडणे स्वाभाविकच. मात्र, आपण राज्यात आणि देशात लोकप्रतिनिधींवर विश्वास ठेवून निवडून दिल्यानंतर आता लोक तटस्थपणे या निवडून दिलेल्या लोकांच्या वर्तनावर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. विशेषतः विरोधकांकडून तर जो काही धिंगाणा घातला जात आहे, त्याचे नक्कीच संतप्त पडसाद जनतेच्या मनात उमटत आहेत, यात शंका नसावी. कारण, विकासासाठी काम करणारे लोक सत्तेत असल्याने ते कदापि अशा तर्‍हेचे अशोभनीय आणि राज्याच्या, देशाच्या प्रतिमेला तडा जाईल, असे वर्तन करणे शक्य नाही, असा ठाम विश्वास जनतेत आहे. जो काही मुजोरपणा विरोधक राजधानी दिल्ली आणि महाराष्ट्रात करीत आहेत, तो निंदनीय असाच. त्यामुळे जनतेच्या विश्वासाला तडा जाणार नाही, अशा सुसंस्कृत वर्तनाची जबाबदारी दोन्ही सरकारांवर आली आहे आणि ही जबाबदारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकार पार पाडीत असल्याचेही जनता बघते आहेच. म्हणूनच काही मूठभर नतद्रष्टांचा समूह आजकाल कोणत्याही छोट्या आणि महत्त्व नसलेल्या गोष्टींचे जे उदात्तीकरण करतो, त्यामागे ही संपूर्ण जनता आहे, असे समजण्याचे मुळीच कारण नाही. याला विरोधक खतपाणी घालतात, हे लोकांना समजते, हेदेखील लक्षात घेतले पाहिजे. जे खोटे ‘नॅरेटिव्ह’ पसरविले जात आहेत, ते खरोखरच किती खोटे आहेत आणि होते, हे मुख्यमंत्री देवेंद्र यांनी सभागृहात सोदाहरण सांगितल्यावर या विरोधकांची तोंडे बंद झाली आहेत. काही नेत्यांच्या अज्ञानीपणाचादेखील त्यांनी समाचार घेतल्याने या विरोधकांना आता तोंड दाखवायलादेखील जागा राहिली नाही, अशी परिस्थिती यामुळे निर्माण झाली आहे. त्यामुळे या सर्वांना पुरून उरून आम्ही विकासाची कामे कशी गतीने पुढे नेणार आहोत आणि जनतेच्या विश्वासाला पात्र ठरणार आहोत, याची एक झलक या छोट्या अधिवेशनातील सत्ताधारी आणि विरोधकांच्या वर्तनाने बघायला मिळाली. अर्थात यात सत्ताधारीच उत्तीर्ण झाले, हे सांगायला नको.
सकस विचारांची पेरणी
 
पुण्यात आजकाल विविध महोत्सवांना उधाण आले आहे. येथील पुस्तक महोत्सव तर देशपातळीवर लोकप्रिय होऊ लागला, हे वाचकांची विक्रमी गर्दी सिद्ध करीत आहे. याशिवाय, ‘हिंदू सेवा महोत्सव’, नेहमीसारखा ‘सवाई गंधर्व महोत्सव’, ‘अधिकारी साहित्य संमेलन’, ‘दैवज्ञ समाजोन्नती परिषद’, ‘बालरंगभूमी संमेलन’, तीन हजार विद्यार्थ्यांचे सामूहिक ‘वंदे मातरम्’ आदी कार्यक्रमांची रेलचेल आणि त्याला मिळत असलेला प्रतिसाद हा पुण्यातील सुज्ञांच्या चांगुलपणाचे प्रमाण आहे, यात शंका नाही. ही केवळ उदाहरणे आहेत. विशेष म्हणजे, या सर्व कार्यक्रमात समाजातील लहान बालकांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांचा प्रतिसाद अतिशय महत्त्वाचा म्हटला पाहिजे. कारण, हे उत्सव केवळ मनोरंजन म्हणून आयोजित केले जात नाहीत किंवा ते एखाद्या तद्दन चित्रपट, मोबाईलवरील रील्सप्रमाणे कुचकामी नसतात. यातून उत्तम समाजनिर्मितीची बीजे रोवली जात असतात, एकात्मतेचे दर्शन घडत असते, भविष्यातील चांगल्या कामांची पायाभरणी होत असते, सकस विचारांची पेरणी होत असते आणि उद्याच्या उज्ज्वल भवितव्याला कालानुरुप असे आवश्यक असणारे मनुष्यबळ मिळत असते. ज्यांची स्वतःसाठी, समाजासाठी काही उत्तम करण्याची स्वप्ने असतात, त्यांच्या कौशल्यविकासाला अशाच कार्यक्रमांतून बळ मिळत असते.
 
पुण्यासारख्या विद्येचे माहेरघर असलेल्या या शहरात आजची आधुनिक काळातील पिढीदेखील आपल्या संस्कृतीचे जतन करीत असे काही आत्मसात करण्यासाठी उत्साहित होत आहे, प्रेरित होत आहे, हे यानिमित्ताने अधोरेखित करणे क्रमप्राप्त. नुकत्याच निवडणुकादेखील पार पडल्या आहेत. त्यामुळे पुणे परिसरात सुरू झालेला विकास आणि प्रगतीची कार्ये आता वेग घेतील, असा विश्वास लोकांमध्ये निर्माण झाला आहे. या विश्वासामुळेच जनतेने पुन्हा महायुतीच्या झोळीत मतांचे दान टाकले आणि पुण्यातील सर्वाधिक जागांवर विजय मिळवून दिला आहे. विशेष म्हणजे, निवडून आल्यानंतर हे लोकप्रतिनिधीदेखील कामाला लागले असल्याचे दिसत आहे. एकूणच, आगामी काळात कौशल्य विकसित करणारे नेतृत्व आणि परिपक्व समाज अन्य शहरांपुढे येथून आदर्श निर्माण करेल, यांत संदेह नाही!
 
अतुल तांदळीकर