हॅशटॅग तदेव लग्नम् लग्नाची आजच्या पिढीतील ‘युनिक’ कहाणी

20 Dec 2024 23:11:00

Hashtag Tadev Lagnam 
 
‘उतावळा नवरा आणि गुडघ्याला बाशिंग’ ही म्हण पूर्ण करणारा आनंद गोखले दिग्दर्शित ‘हॅशटॅग तदेव लग्नम्’ हा चित्रपट. लग्नसंस्था ही आजच्या 21व्या शतकातील तरुण पिढीला काहीशी ‘ओल्ड फॅशन्ड’ वगैरे वाटते. तरीही लग्नाची वयोमानापरत्वे वेगवेगळी कारणं उलगडणारा हा चित्रपट. शिवाय, आजच्या सोशल मीडियाच्या काळात तरुण प्रेक्षकांना आपलंसं करण्यासाठी ‘हॅशटॅग’ हा सर्वात महत्त्वाचा शब्द का आहे, याचं उत्तरही नकळत हा चित्रपट देऊन जातो.
 
शटॅग तदेव लग्नम्’ या चित्रपटाची कथा खरं तर अवघ्या एका दिवसाची. म्हणजे सकाळी सुरू होते आणि रात्री चक्क संपतेही. या कल्पनेमुळे चित्रपट पाहताना प्रेक्षकांना सर्वात आधी सतीश राजवाडे दिग्दर्शित, मुक्ता बर्वे आणि स्वप्नील जोशी यांची प्रमुख भूमिका असणारा ’मुंबई-पुणे-मुंबई’ हा चित्रपटही कदाचित डोळ्यासमोर येईल. ’हॅशटॅग तदेव लग्नम्’ या चित्रपटाच्या कथेतील नायक अथश्री महाजन (सुबोध भावे) आणि नायिका गायत्री देसाई (तेजश्री प्रधान) यांची लग्न करण्यासंबंधी आणि लग्न न करण्यासंबंधी आपापली कारणं असतात. गायत्री हिला खरं तर लग्न करायचे नसते आणि त्यामुळे प्रत्येक वेळी वेगवेगळी कारणं देऊन ती स्वतः स्थळांना नकार देत असते किंवा समोरून नकार यावा, असा प्रसंग मुद्दाम घडवण्यात लोकांना भाग पाडते. याउलट, अथश्री याची वयाची चाळीशी उलटून गेली तरी लग्न करायचे असते. अर्थात, कौटुंबिक जबाबदार्‍यांमुळे स्वतःची अनेक स्वप्ने बाजूला ठेवणार्‍या अथश्रीला यापूर्वी 34 मुलींनी नकार दिलेला असतो. पण, 35वी मुलगी गायत्रीच्या रुपात येते आणि त्याच्या जीवनात कसा बदल होतो आणि दोघांच्याही लग्न करण्याच्या आणि न करण्याच्या कारणांनी कथा कशी आमूलाग्र बदलते, अशा या भन्नाट गोष्टीचा एक एक पदर ’हॅशटॅग तदेव लग्नम्’ या चित्रपटात उलगडत जातो.
 
चित्रपटाचा पूर्वार्ध काहीसा रटाळवाणा वाटतो. प्रमुख पात्रांचा वर्तमानकाळ थोडा कंटाळवाणा वाटत असला, तरी मध्यांतरानंतर लेखक-दिग्दर्शकांनी कथेला दिलेला ‘ट्विस्ट’ आणि पात्रांचा भूतकाळ अतिशय रंजकपणे सादर केला गेला आहे. चित्रपटातील इतर पात्रांना आवश्यक तितके महत्त्व देऊन संपूर्ण कथा प्रमुख पात्रांवर खिळवण्यात दिग्दर्शक आणि लेखकांना यश आले आहे, असे नक्कीच म्हणावे लागेल. मुळात ‘हॅशटॅग तदेव लग्नम्’ चित्रपटाची कथा केवळ लग्न करण्यासंबंधी वयाच्या चाळीशीत लोकांची काय मतं असतात, यावर अवलंबून नसून त्यापलीकडे ‘एकल पालकत्वा’बद्दल भाष्य करणारा हा चित्रपट आहे. आता तो नेमका कसा, यासाठी संपूर्ण चित्रपट पाहावा लागेल. मात्र, कथेची एकूणच नेमकी मांडणी आणि सादरीकरण प्रेक्षकांना हवा तो संदेश देऊन जाते.
 
‘हॅशटॅग तदेव लग्नम्’ चित्रपटात सुबोध भावे आणि तेजश्री प्रधान प्रमुख भूमिकेत आहेत. सुबोध भावे यांनी नेहमीप्रमाणे त्यांच्या चाहत्यांना विशेष ‘सरप्राईज’ देणारी भूमिका सादर केली आहे. एकीकडे त्यांच्या ’संगीत मानापमान’ या चित्रपटाची चर्चा होत असताना, ’हॅशटॅग तदेव लग्नम्’ चित्रपटातील त्यांची भूमिका त्यांच्या अभिनयातील आणखी एक पैलू प्रेक्षकांसमोर मांडून जाते, तर तेजश्री प्रधान हिची भूमिका थोडीशी ओढूनताणून केल्यासारखी जाणवते. अर्थात, तिच्या पात्राचे आचार-विचार प्रत्येक मुलीला आपलेसे वाटले, तरी सुबोध यांच्यासमोर तेजश्रीचा अभिनय थोडासा फिका पडल्यासारखे वाटते. याशिवाय, चित्रपटात केवळ एकच गाणे असून अगदी प्रसंगाला अनुसरून ते कथेत येत असल्यामुळे मनाला भावते. तसेच, चित्रपटात बालकलाकार केया हिचा अभिनय अधिक ऊर्जा देऊन जातो.
 
एकंदरीत 21व्या शतकात लोकांचे लग्नासंबंधीचे विचार आणि त्यापलीकडे जाऊन लग्न करण्या आणि न करण्यासंबंधीची कारणं खरंच काय असतात, याचा अनोखा संदेश देऊन जाणारा ‘हॅशटॉग तदेव लग्नम्’ चित्रपट नक्कीच पाहावा असा...
चित्रपट ः हॅशटॅग तदेव लग्नम्
दिग्दर्शक ः आनंद गोखले
कलाकार ः सुबोध भावे, तेजश्री प्रधान
रेटिंग ः
Powered By Sangraha 9.0