गिसेलचा लढा!

    20-Dec-2024   
Total Views |


pelicot 
 
फ्रान्समध्ये असे काही घडले की अवघे जग हादरले. मात्र, त्याचवेळी गिसेल पेलीकॉट या 71 वर्षांच्या महिलेने सुटकेचा नि:श्वास सोडला. तिच्या पतीला आणि त्याच्यासोबत 50 जणांना न्यायालयाने कठोर शिक्षा सुनावली होती. गिसेलच्या मनावरचे भयंकर ओझे उतरले. जगाला हादरवून सोडणार्‍या या घटनेबद्दल लिहितानाही वाटते की ‘नरेच केला हिन किती नर’ ही उक्तीही शून्य भासेल.
 
फ्रान्समध्ये असे काही घडले की अवघे जग हादरले. मात्र, त्याचवेळी गिसेल पेलीकॉट या 71 वर्षांच्या महिलेने सुटकेचा नि:श्वास सोडला. तिच्या पतीला आणि त्याच्यासोबत 50 जणांना न्यायालयाने कठोर शिक्षा सुनावली होती. गिसेलच्या मनावरचे भयंकर ओझे उतरले. जगाला हादरवून सोडणार्‍या या घटनेबद्दल लिहितानाही वाटते की ‘नरेच केला हिन किती नर’ ही उक्तीही शून्य भासेल.
 
2020 साली फ्रान्समधील एका मॉलमध्ये सुरक्षारक्षकाने पाहिले की, एक पुरुष मॉलमध्ये येणार्‍या जाणार्‍या महिलांच्या स्कर्टचे अत्यंत अश्लील पद्धतीने फोटो काढत होता. फोटो काढणारी व्यक्ती होती 68 वर्षे वयाची डॉमनिक पेलीकॉट. सुरक्षारक्षकाने डॉमनिकला रंगेहात पकडले. त्याचा मोबाईल जप्त केला. त्या मोबाईलमध्ये 300च्या वर असेच अश्लील फोटो. विकृत डॉमनिकला पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आले. पोलिसांची कारवाई सुरू झाली. त्याच्या घराच्या झडतीत ‘अब्युझ’ नावाच्या फोल्डरमध्ये 72 पुरुषांसोबत एकाच महिलेचे 20 हजार अश्लील फोटो, व्हिडिओ होते. हे 72 जण साधारण 22 ते 74 वर्षांचे होते. फोटोंमधली ती महिला होती डॉमनिकची पत्नी गिसेल! पोलिसांना वाटले की, पेलीकॉट पतीपत्नी एकमेकांच्या संमतीने हे सगळे करत असतील. त्यामुळे पोलिसांनी गिसेलला चौकशीला बोलावले. मात्र, गिसेलने डॉमनिकची बाजू घेतली. ती म्हणाली, “डॉमनिकचे माझ्यावर खूप प्रेम आहे. तो 21 आणि मी 19 वर्षांची असताना आम्ही विवाह केला. आम्हाला तीन मुले आणि सात नातवंडेही आहेत.” यावर पोलिसांनी गिसेलला तिचे 72 पुरुषांसोबतचे अश्लील फोटो, व्हिडिओ दाखवले. तेव्हा तिने स्पष्ट सांगितले की, तिला यातले काहीही माहीत नाही.
 
पोलिसांनी डॉमनिकची कसून चौकशी केली. तेव्हा त्याने कबूल केले की, 2011 ते पुढे अनेक वर्षे तो गिसेलच्या जेवणात अमली पदार्थ, झोपेच्या गोळ्या मिसळायचा. ‘विदाऊट नोईंग हर’ या वेबसाईटमार्फत तो गिसेलवर अत्याचार करायला पुरुषांना आमंत्रित करायचा. याच माध्यमातून 72 पुरुषांनी गिसेलवर अत्याचार केले. बेशुद्ध गिसेलला यातले काहीही माहीत नसायचे. दुसरीकडे डॉमनिक तिच्याशी आज्ञाधारक, प्रेमळ, कुटुंंबवत्सल पती असल्याचे नाटक करायचा. पुढे 2020 साली डॉमनिक मॉलमध्ये पकडला गेला आणि त्यातूनच पुढे सगळ्या घटना घडल्या. गिसेलला डॉमनिकचे खरे रुप कळले. त्या भयंकर सत्याने ती अस्वस्थ झाली, दुःखी झाली, संतापली. तिने डॉमनिकविरोधात आणि त्या 72 पुरुषांविरोधात पोलिसांत तक्रार केली. न्यायालयात अनेक वर्षे खटला चालला. या खटल्यामध्ये गिसेलची तिन्ही मुले तिच्यासोबत होती. डॉमनिकची विकृती इतकी की, स्वतःची मुलगी केरोलीन आणि दोन सुना अ‍ॅरारा आणि सेलिन यांचेही त्याने अश्लील फोटो, व्हिडिओ काढले होते. न्यायालयाने डॉमनिकला 20 वर्षांच्या कारावासाची शिक्षा दिली, तर त्या 50 जणांना तीन वर्षे ते 15 वर्षे अशी शिक्षा देण्यात आली. असो. एक दशकभर गिसेलवर असे अत्याचार झाले, त्याचा परिणाम तिच्यावर झाला. ती स्मृतिभ्रंशाच्या आजाराने ग्रस्त झाली. तिचे वजन खूपच कमी झाले आणि केसही झडले. डॉमनिक तिला सांगे की, तुला ब्रेन ट्युमर झाला असावा. पण, न्यायालयात खटला सुरू असताना तिची आरोग्य तपासणी करण्यात आली, तेव्हा कळले की अनेक वर्षे अमली पदार्थ, झोपेच्या गोळ्यांचे सेवन केल्याने आणि अनेक पुरुषांबरोबर लैंगिक संबंध आल्यामुळे तिला विविध आजार झाले होते. गिसेलला न्याय मिळाला, पण तिच्यावर अत्याचार करणार्‍या 72 पैकी 50 व्यक्तींची ओळख पटली. त्यांनी कुणीही बलात्काराचा गुन्हा कबूल केला नाही. त्यातील काहींनी न्यायालयात सांगितले की, गिसेलच्या पतीनेच त्यांना बोलावले. त्यामुळे त्यांना वाटले की गिसेलची सहमती आहे, तर काही लोक म्हणाले की, तिला जबरदस्ती पकडून आणले नव्हते, तसेच ती विरोधही करत नव्हती. म्हणजेच हा बलात्कार नाही. भयंकर! या घटनेनंतर फ्रान्सच्या महिला गिसेलच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरल्या. त्या म्हणत होत्या, “अशा अनेक गिसेल अवतीभोवती असतील, पण त्या अज्ञात आहेत. त्या गप्प आहेत. अत्याचार सहन करत आहेत.” या पार्श्वभूमीवर गिसेलच्या हिमतीला दाद द्यायला हवी. 71व्या वर्षी तिला भूतकाळातले ते भयंकर सत्य कळले आणि ती न्यायासाठी लढली. विकृततेविरोधात उभी ठाकली.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.