काँग्रेसी नक्षलवाद

    20-Dec-2024
Total Views |

Congress Naxalism
 
काँग्रेसने आपली सत्ता अबाधित राहावी, यासाठी देशभरातील डाव्या-नक्षलवादी संघटनांना पाळले, पोसले आणि मोठेही केले. बुद्धिभेद करणार्‍या डाव्या बुद्धिजीवींच्या हातात देशातील शिक्षण व्यवस्था, विद्यापीठांचा कारभार सोपवून काँग्रेसने अगदी पद्धतशीरपणे भारतीय संस्कृतीवरच घाला आतला. राहुल गांधींची ‘भारत जोडो यात्रा’ देशातील ज्या ज्या भागांतून गेली, त्या भागांत दंगली पेटल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात यामागचे तपशीलवार तथ्यात्मक वात्सव मांडून ‘काँग्रेसी नक्षलवादा’चा बुरखा फाडला आहे.
 
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो यात्रे’वर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात घणाघाती आरोप करत, “या यात्रेत नक्षलवादी संघटनांचा समावेश आहे,” असे म्हटले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी असे म्हटले की, “मी ‘भारत जोडो अभियाना’वर बोललो होतो, तेव्हा माझ्यावर टीका केली गेली. आज पुराव्यासह सांगतो. राहुल गांधींनी सुरू केलेल्या या अभियानात कोण आहे, ते एकदा पाहा. देशात आपण नक्षलवादाविरोधात लढाई पुकारतो. नक्षलवादी काय करतात? त्यांचा भारताच्या संविधानावर, त्यातून तयार झालेल्या कोणत्याही संस्थेवर आणि लोकशाहीवर विश्वास नाही. ते समांतर राजसत्ता निर्माण करण्याची इच्छा असणारा गट आहे. ज्यावेळी देशात नक्षलवादाविरोधात मोठी लढाई सुरू झाली, तेव्हा मोठ्या प्रमाणात नक्षलवादी संपायला लागले. त्यावेळी हा नक्षलवाद शहरांमध्ये सुरू झाला,” असे त्यांनी सभागृहात नमूद केले.
 
राहुल गांधी यांची ‘भारत जोडो यात्रा’ जेव्हा निघाली, तेव्हाही ती वादग्रस्त ठरली होती. देशाच्या ज्या ज्या भागांतून ही यात्रा गेली, त्या त्या भागांत दंगली उसळल्या, सामाजिक स्वास्थ्य ढवळून निघाले, हे कदापि नाकारुन चालणार नाही. सिस्टीममधील आपली माणसे, राहुल गांधी यांनी हाताला धरून बाहेर काढली आणि त्यांना या यात्रेत सहभागी करून घेतले होते. रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचाही यातील सहभाग म्हणून आश्चर्यचकित करणारा ठरला होता. मुख्यमंत्री फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो यात्रे’त नक्षलवादी संघटना सहभागी होत्या, असा थेट आरोप केल्यानंतर, काँग्रेसला अर्थातच मिरची लागली. त्यावेळी सरकारने त्यांच्यावर का कारवाई केली नाही, असा प्रश्न काँग्रेसने म्हणूनच केला आहे.
 
काँग्रेसने आपल्या 65 वर्षांच्या शासनकाळात देशभरात दुसरा कोणताही पक्ष मोठा होऊ नये, म्हणून त्या त्या राज्यांतील प्रादेशिक पक्षांना, संघटनांना बळ दिले. स्थानिकांचे प्रश्न सोडवण्याऐवजी ते पेटते कसे राहतील, याची पुरेपूर काळजी काँग्रेसने घेतली. तेथील अन्य पक्षीयांना संपवण्यासाठी अशा प्रादेशिक पक्षांचा, संघटनांचा काँग्रेसने खुबीने वापर केला. महाराष्ट्रात ठाकरे यांना काँग्रेसनेच बळ दिले. म्हणूनच, इंदिरा गांधी यांनी देशभरात आणीबाणी लागू केली, तेव्हा बाळासाहेबांनी त्याचे समर्थन केले होते. आपल्या मर्जीतील नेत्यांची विविध पदांवर वर्णी लावली. त्यांना अमर्याद अधिकार दिले गेले. यातूनच, नक्षली विचारसरणी देशभरात सर्वत्र पसरवली गेली. त्याचाच एक भाग म्हणून, शैक्षणिक अभ्यासक्रमातून चुकीचा इतिहास विद्यार्थ्यांना शिकवला जाऊ लागला. उमलत्या वयात प्रत्येकाच्या मनात जी क्रांतीची भावना असते, त्या भावनेला खतपाणी घालण्याचे काम अशा संघटनेच्या नेत्यांकडून केले जाऊ लागले. अराजकता माजवण्यासाठी भडकावण्यात आलेला हा युवावर्ग मोलाचे काम करू लागला. अशा वर्गाला एकत्र केले गेले आणि याच गटांना ‘शहरी नक्षलवाद’ असे संबोधले जाते, हे लक्षात ठेवले पाहिजे.
 
संविधानाचे नाव घेत, संविधानाने ज्या ज्या संस्था निर्माण केल्या, त्याबद्दल संशय घेण्याचे काम नक्षली करतात. निवडणूक आयोगाबद्दल देशभरात आज जो संशय घेतला जात आहे, तो याच नक्षलवादाचा भाग. अगदी सर्वोच्च न्यायालयाच्या यांच्या विरोधातील निकालांवरही याच मंडळींनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ‘जेएनयू’मध्ये भारतविरोधी घोषणा देण्यात आल्या. तेथे पोलिसांना येऊ दिले नाही. तेथील विद्यार्थी भारताविरोधात का बोलतात? त्यासाठी त्यांना कोण चिथावणी देते? या देशद्रोही विद्यार्थ्यांना तेथे तहहयात राहण्याची परवानगी कशी मिळते? त्यांना शिकण्यासाठी कोणत्याही अटी-शर्ती नाहीत का? असे अनेक प्रश्न आहेत आणि या प्रश्नांची उत्तरेच नक्षलवाद म्हणजे काय आणि तो कसा जोपासला जातो, हे अधोरेखित करतात. पण, अशाच देशद्रोही टोळक्यातील कन्हैय्याकुमारसारखे लोक आज काँग्रेसमध्ये नेतेपद उपभोगत आहेत, यावरुन काँग्रेसला नक्षलवाद्यांकडून मिळणारे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष साहाय्य वेळोवेळी चव्हाट्यावर आले. एवढेच नव्हे तर शहरी नक्षलवाद्यांसंबंधी विविध प्रकरणांमध्ये अटकेत असलेल्यांप्रतिही काँग्रेसचा कळवळा, सहानुभूती वेळोवेळी दिसून आली आहेच. त्यामुळे काँग्रेसच्या ‘हाता’ला शहरी नक्षलवाद्यांची साथसोबत लाभली आणि सत्ताधार्‍यांविरोधातील रोषाला खतपाणी घालण्यात याच शहरी नक्षलवाद्यांचा काँग्रेसनेही पुरेपूर वापरही करुन घेतला.
 
काँग्रेसने सत्ता कायम राहण्यासाठी आजवर काय काय केले, हे नव्याने सांगण्याची गरज नाही. ‘हिंदू दहशतवाद’ जो अस्तित्वातच नाही, त्यालाही काँग्रेसने चालना दिली. देशभरातील सर्वच यंत्रणा पोखरण्याचे काम आपल्या कार्यकाळात काँग्रेसने केले. 2024 मध्ये केंद्रातील सरकारला खाली खेचण्यासाठीच ‘भारत जोडो’च्या नावाखाली ‘भारत तोडो’चाच कार्यक्रम राहुल यांनी राबवला. जॉर्ज सोरोसने आर्थिक बळ देऊनही अर्थातच देशातील जनतेने हा प्रयत्न हाणून पाडला. कोरेगाव-भीमा प्रकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच उघडकीस आणले आणि त्यामुळेच ‘शहरी नक्षलवाद’ हा पुन्हा ऐरणीवर आला. त्यांनी उल्लेख केलेल्या संघटनांना तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी 2012 मध्ये गुन्हेगारी ठरवले होते, हे महत्त्वाचे आहे. याच संघटना ‘भारत जोडो’त सहभागी झाल्या होत्या आणि ही गंभीर अशीच बाब आहे. ‘व्होट जिहाद’ची जी घटना मालेगाव येथे घडली, त्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. संसदेत सोनिया आणि राहुल यांच्याविरोधात भाजपने त्यांचा संबंध जॉर्ज सोरोसशी असल्याचे म्हटले होते. आता मुख्यमंत्री फडणवीस यांनी थेट राहुल यांनाच आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केले आहे.
 
काँग्रेसी नक्षलवादाचा बुरखाच फडणवीस यांनी फाडला आहे, असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही.केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी “दि. 31 मार्च 2026 पर्यंत नक्षलवादाचे पूर्णपणे उच्चाटन झाले असेल,” असे यापूर्वीच जाहीर केले आहे. “नक्षलवादाच्या नावाखाली देशात रक्ताचा एक थेंबही वाहू देणार नाही,” अशी प्रतिज्ञाच त्यांनी केली आहे. पण, काँग्रेसला देशात सर्वाधिक काळ सत्ता उपभोगूनही, प्रचंड रक्तपातानंतरही नक्षलवादाचे समूळ उच्चाटन का करता आले नाही? या प्रश्नाचे उत्तर राहुल गांधींनी म्हणूनच द्यावे. तेव्हा एकूणच नक्षलवादाच्या मुळावर कुर्‍हाड पडली की आपसुकच या काँग्रेसी नक्षलवादाचाही बिमोड होईल, तो दिवस फार लांब नाही.