नव्या प्रकाशाचा दिवस

Total Views |
 
Christmas
 
ख्रिश्चन धर्मप्रथेप्रमाणे दि. 25 डिसेंबर हा येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस मानला जातो आणि त्याच दिवशी जगभरात नाताळचा सण मोठ्या उत्साहात साजराही केला जातो. पण, 25 डिसेंबर हा जो येशू ख्रिस्तांचा जन्मदिवस साजरा करतात, त्याला कसलाही ऐतिहासिक, शास्त्रीय आधार नाही. तेव्हा अवघ्या काही दिवसांवर असलेल्या नाताळच्या पार्श्वभूमीवर 25 डिसेंबर हा येशूचा जन्मदिवस की सूर्याचा जन्मदिवस, हे समजून घेऊया.
 
बायबल हा ख्रिश्चन लोकांचा पवित्र धर्मग्रंथ आहे, हे सर्वसाधारणपणे आपल्याला माहीत असते. पण, यात नेमके काय आहे, हे आपल्याला क्वचितच माहीत असते. बायबल हा रामायण किंवा महाभारताप्रमाणे एक सलग कथानक सांगणारा ग्रंथ नाही. आपल्या पुराणांमध्ये ज्याप्रमाणे विविध कथानके, आख्याने, उपाख्याने एकत्रितपणे आलेली आहेत, तसाच प्रकार बायबलमध्ये दिसतो. मुळातच त्याचे दोन भाग आहेत - पहिला, ‘ओल्ड टेस्टामेंट’ किंवा ‘जुना करार.’ यात 39 छोटी पुस्तके किंवा आख्याने समाविष्ट आहेत. दुसरा, ‘न्यू टेस्टामेंट’ किंवा ‘नवा करार.’ यात 27 छोटी पुस्तके किंवा आख्याने समाविष्ट आहेत. ‘ओल्ड टेस्टामेंट’मधले पहिलेच आख्यान आहे-जेनेसिस. म्हणजे, या जगाची उत्पत्ती कशी झाली, याचा वृत्तांत. ही सर्व पुस्तके ‘ज्यू’ या नावाने ओळखल्या जाणार्‍या जमातीने त्यांच्या मूळ हिब्रू या भाषेत लिहिलेली आहेत. त्यामुळे ‘ओल्ड टेस्टामेंट’ हा आजही ज्यू धर्मीयांचा ’तोराह’ खालोखाल पवित्र पुराणग्रंथ आहे.
 
ज्यू धर्मीय लोक अब्राहम किंवा मूळ नाव अबराम याला आपला मूळ पुरुष मानतात. अब्राहमपासून दाविद म्हणजे डेव्हिडपर्यंत 14 पिढ्या. दाविद ते यखन्यापर्यंत 14 पिढ्या आणि यखन्यापासून येशूपर्यंत 14 पिढ्या, अशा क्रमाने मूळ पुरुष अब्राहमपासून 42व्या पिढीत येशू हा पुरुष जन्मला.
 
येशूच्या जन्मकथेनेच ‘न्यू टेस्टामेंट’मधले पहिले आख्यान म्हणजे ’मत्तयकृत शुभवर्तमान’ याची सुरुवात होते. मत्तय म्हणजे आपल्या नेहमीच्या भाषेतला मॅथ्यू. मत्तय, मार्क, ल्यूक आणि योहान किंवा जॉन यांची शुभवर्तमानांची पहिली चार प्रकरणे आणि ‘प्रेषितांची कृत्ये’ हे पाचवे प्रकरण यातून येशूचा जन्म आणि त्याचे जीवनचरित्र ही आख्याने येतात. त्यामुळे अर्थातच ‘न्यू टेस्टामेंट’ हा ख्रिश्चन धर्मीयांचा पवित्र धर्मग्रंथ आहे. सध्या म्हणजे गेल्या साधारण 500 वर्षांपासून, जगभरातील राजकीय, आर्थिक, वैज्ञानिक सत्ता ख्रिश्चन धर्मीय देशांच्या हातात एकवटल्यामुळे बायबल हा जणू जगाचा धर्मग्रंथ बनलेला आहे किंवा किमान तो तसा बनावा, अशी ख्रिश्चन धर्माच्या ठेकेदारांची इच्छा आहे.
 
पाश्चिमात्य ख्रिश्चन धर्मीय विद्वानांचा हिंदूंच्या पवित्र धर्मग्रंथांवरचा एक लाडका आक्षेप असतो की, “तुमच्या या ग्रंथांमध्ये काळाचा उल्लेख कुठेही नाही. रामायण कथा केव्हा घडली? महाभारत कथा केव्हा घडली? तुमची 18 पुराणे आणि त्यांची उपपुराणे यातल्या असंख्य कथा केव्हा घडल्या? तुमच्या जातककथा आणि कथासरित्सागरमधल्या हजारो कथा नेमक्या केव्हा घडल्या? कुठेही काळाचा उल्लेख नाही. त्यामुळेच या सगळ्या कविकल्पना आहेत. त्याला शास्त्रीयदृष्ट्या इतिहास म्हणता येणार नाही.”
ठीक आहे. पण, मग बायबलमध्ये तरी काळाचा उल्लेख कुठे आहे? येशूचा पूर्वज अब्राहम कोणत्या वर्षी जन्मला? त्याच्या 14व्या पिढीतला थोर राजा दाविद किंवा डेव्हिड किती साली जन्मला? तेही जाऊ द्या; पण खुद्द येशू कोणत्या वर्षी, किती तारखेला जन्मला? यासंबंधी कसलाही उल्लेख ‘न्यू टेस्टामेंट’च्या 27 पैकी एकाही पुस्तकात नाही. म्हणजेच, आज जगभरातले तमाम ख्रिश्चन धर्मीय दि. 25 डिसेंबर हा जो येशू ख्रिस्तांचा जन्मदिवस साजरा करतात, त्याला कसलाही ऐतिहासिक, शास्त्रीय आधार नाही.
 
‘न्यू टेस्टामेंट’च्या ‘मत्तयकृत शुभवर्तमान’ या पहिल्याच पुस्तकात येशूच्या जन्माची ती सुप्रसिद्ध कथा येते. मरीया नावाची एक मुलगी योसेफ नावाच्या पुरुषाची वाग्दत्त वधू असते. ती पवित्र आत्म्यापासून गर्भवती होते. देवाचा दूत गॅब्रिएल योसेफला सांगतो की, या कुमारी मातेच्या पोटी मानवजातीचा तारणहार जन्माला येणार आहे. पुढे येशूचा जन्म होतो. पूर्वेकडे उगवलेल्या अत्यंत तेजस्वी तार्‍याच्या रोखाने शोध घेत मागी नावाचे तीन विद्वान लोक येतात आणि त्या नवजात बाळाला व कुमारी मातेला सोने, सुगंधी द्रव्ये आदी उपहार अर्पण करतात इत्यादी. ही घटना नेमकी केव्हा घडली? उल्लेख कुठेही नाही. जर आम्ही स्वतःला ‘अत्याधुनिक’, ‘सायंटिफिक’, ‘रॅशनल’ वगैरे म्हणवत असू, तर ही घटना 2024 वर्षांपूर्वी घडलेली असली पाहिजे. कारण, तिथपासून तर आमची सध्याची ‘ख्रिस्ताब्द’ ही कालगणना आम्ही सुरू करतो ना?
 
असो. तर ‘न्यू टेस्टामेंट’मधली कुमारी मातेच्या पोटी येशूचा जन्म ही घटना आपण खरी धरून चालू. पण, तरी ती किती बरे प्राचीन असेल? ‘ओल्ड टेस्टामेंट’ची जुन्यात जुनी हस्तलिखित ग्रीक भाषेतली प्रत उपलब्ध झाली आहे. ती सनपूर्व सुमारे 130 सालची, तर ‘न्यू टेस्टामेंट’ची जुन्यात जुनी उपलब्ध प्रत हिब्रू भाषेतली आहे नि तिचा काळ ख्रिस्ताब्द चौथ्या शतकाच्या मागे काही जात नाही. म्हणजेच बायबलच्या दोन्ही भागांमधली पुस्तके, त्यांचे एकत्रीकरण, त्यांची रचना यांचा काळ दोन ते तीन हजार वर्षांच्या मागे काही जात नाही.
 
ठीक. आता आपण लुक्झॉर या ठिकाणच्या आमुन नामक देवाच्या मंदिरातील काही भित्तिचित्रे पाहू. लुक्झॉर इजिप्तमधले एक प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. इजिप्तच्या सेती, रामसिस, तुतनखामेन, होटेप इत्यादी चमत्कारिक नावांच्या राजांपैकीच आमेनहोटेप हा एक राजा. ख्रिस्तपूर्व 1 हजार, 300 वर्षे हा त्याचा कालखंड. नीट लक्षात घ्या. येशूच्या जन्मापूर्वी 1 हजार, 300 वर्षांआधी हा राजा इजिप्तमध्ये होऊन गेला. त्याने नाईल नदीच्या काठी लुक्झॉर या ठिकाणी बांधलेले देऊळ आजही बर्‍या स्थितीत आहे. त्या देवळाच्या एका भिंतीवर चार चित्रे आहेत. त्यांत प्राचीन इजिप्शियन लोकांचा एक देव ‘होरस’ याची जन्मकथा दाखवली आहे. पहिल्या चित्रात ‘थोय’ नावाचा देव ‘ईसिस’ या कुमारीला सांगतोय की, तुझ्या पोटी ‘होरस’ येणार आहे. दुसर्‍या चित्रात ‘नेफ’ नावाचा देव आणि ‘हाथोर’ नावाची देवी ‘अंख’ नावाचे दैवी चिन्ह ‘ईसिस’च्या तोंडाजवळ धरून दैवी गर्भ तिच्या शरीरात स्थापित करत आहेत. तिसर्‍या चित्रात माता ‘ईसिस’ एका आसनावर बसली आहे आणि एका दाईच्या हातात नवजात बालक आहे. चौथ्या चित्रात बालक सिंहासनावर बसले आहे आणि ‘नेफ’ या देवतेच्या मागे उभे असलेले तीन विद्वान एका हाताने बाळाला आशीर्वाद देत आहेत व एका हाताने उपहारवस्तू देत आहेत.
 
आता दुसरा नमुना पाहा. सर्वच पाश्चिमात्य विद्वानांना ग्रीक सम्राट अलेक्झांडर याचा कोण अभिमान असतो. त्याने म्हणे जग जिंकले आणि आता जिंकायल्या जग उरले नाही म्हणून दुःख करत तो तरुण वयातच मेला. आम्ही युरोपीय लोक त्या जगज्जेत्या अलेक्झांडरचे वंशज आहोत. आम्ही आजही श्रेष्ठ वंशाचे आहोत. आम्हीच जगावर राज्य करणार! कारण, तशी आमची पात्रता आहे! सांगणारे लबाड आणि ते ऐकून त्यावर विश्वास ठेवणारे आम्ही भोट!!
 
असो. तर या अलेक्झांडरचा काळ ख्रिस्तपूर्व 356 वर्षे, ग्रीस किंवा खरे म्हणजे मॅकेडोनियाचा राजा फिलिप आणि राणी ऑलिम्पियस यांचा हा मुलगा. पण, तिथेही ही कुमारी मातेची कथा येतेच. ऑलिम्पियसला म्हणे देव ‘ज्युपिटर’ स्वप्नदृष्टांत देतो आणि सांगतो की, देवांचा राजा जो झ्यूस त्याचे शस्त्र जे थंडरबोल्ट, ते तुझ्या पोटी येणार आहे. (म्हणजे इंद्र आणि त्याचे वज्र). मग कुमारी ऑलिम्पियसला जो मुलगा होतो, तोच अलेक्झांडर!
तात्पर्य, कुमारी स्त्री दैवी कृपेने गर्भवती होणे आणि तिच्या पोटी कुणीतरी थोर व्यक्ती जन्मणे, ही येशूच्या जन्मापूर्वीच एक लोकप्रिय संकल्पना होती. येशूच्या जन्माच्या वर्णनासाठी तीच संकल्पना पुन्हा वापरली गेली.
 
आता मुद्दा राहिला, दि. 25 डिसेंबरचा. येशूच्या जन्मापूर्वीपासूनच इजिप्त, पर्शिया, मेसोपोटेमिया, अनातोलिया आदि पॅलेस्टाईनच्या अवतीभोवतीच्या प्रदेशांमध्ये असे मानले जात असे की, दि. 22 डिसेंबरला म्हणजेच दक्षिणायनाच्या अखेरच्या दिवशी सूर्य मरण पावतो आणि तिसर्‍या दिवशी म्हणजे दि. 25 डिसेंबरला तो नव्याने जन्म घेतो. म्हणून हे सर्व प्रदेश दि. 25 डिसेंबरला सूर्याचा जन्मदिवस म्हणून सण साजरा करत असत. येशूचा नेमका जन्मदिवस माहीत नसल्याने ख्रिश्चन चर्चने तोच दिवस येशूचा जन्मदिवस ठरवून टाकला.
 
हाय काय अन् नाय काय! आमची कालगणना कितीही अशास्त्रीय असली, तरी आम्ही तुम्हालाच मागास, प्रतिगामी, अवैज्ञानिक म्हणत राहणार!
 
 

मल्हार कृष्ण गोखले

वीस वर्षाहून अधिक काळ चालू असलेल्या विश्वसंचार या लोकप्रिय सदरचे लेखक. विपुल प्रमाणात वृत्तपत्रीय लिखाण. आंतरराष्ट्रीय घडामोडीवर खुसखुशीत भाष्य. भारतीय इतिहास संकलन समितीच्या कोकण प्रांताचे सचिव. संस्कृत व समाजशास्त्र विषय घेऊन बी.ए.