इतिहासप्रेमींसाठी पर्वणी

    20-Dec-2024
Total Views |
 
history
 
 
मुंबईतील विलेपार्ले येथील ‘पार्ले टिळक विद्यालय असोसिएशन’च्या साठ्ये महाविद्यालयात प्राचीन आणि दुर्मीळ वस्तूंचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. रविवार दि. 22 डिसेंबरपर्यंत सकाळी 9 ते सायंकाळी 6 या वेळेत हे प्रदर्शन खुले आहे. इतिहासाचे अभ्यासक आणि इतिहासप्रेमींसाठी पर्वणी असणार्‍या या प्रदर्शनाचा धांडोळा घेणारा हा लेख...
 
या प्रदर्शनाला पहिल्या दिवसापासूनच खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. अनेक शाळेतील शिक्षकांनी हे प्रदर्शन पाहण्यासाठी विद्यार्थ्यांच्या अभ्यास सहली आयोजित केल्या होत्या. इतिहास अभ्यासक व इतिहासप्रेमींनीसुद्धा या प्रदर्शनाला मोठ्या संख्येने भेट दिली आहे. ज्यांनी अजून पाहिले नाही, त्यांनी आवर्जून पाहावे, असे हे साठ्ये महाविद्यालयातील ‘प्राचीन आणि दुर्मीळ वस्तूंचे प्रदर्शन’ आहे. इतिहासप्रेमींसाठी तर ही पर्वणीच म्हणावी लागेल.
 
मुंबईतील साठ्ये महाविद्यालय हे सातत्याने नाविन्यपूर्ण उपक्रम राबवित असते. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तावाढीसोबतच त्यांच्यातील अन्य कलागुणांचाही विकास व्हावा, हाच या वैविध्यपूर्ण उपक्रमांमागचा हेतू असतो. या महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेले हे प्राचीन आणि दुर्मीळ वस्तूंचे प्रदर्शनसुद्धा याच उपक्रमांचा एक भाग.
 
या प्रदर्शनाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य असे की, हे प्रदर्शन फक्त साठ्ये महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी मर्यादित नसून, इतर महाविद्यालये, शाळा, इतिहास अभ्यासक आणि इतिहासाविषयी प्रेम असणार्‍या प्रत्येकासाठी हे प्रदर्शन खुले आहे. साठ्ये महाविद्यालयातील प्राचीन भारतीय संस्कृती व पुरातत्त्व विभाग, बौद्धविद्या विभाग, प्राणिशास्त्र विभाग, पुरातत्त्व विभाग, तसेच मुंबई विद्यापीठ, पर्यटन मंत्रालय, भारत सरकार, ‘लब्धी विक्रम जनसेवा ट्रस्ट, अहमदाबाद’, ‘इन टू द पास्ट हेरिटेज’, ‘मराठी देशा फाऊंडेशन’, ‘पुरासंस्कृती’ आणि ‘अश्वमेध प्रतिष्ठान’ यांच्या संयुक्त विद्यमाने या चार दिवसीय पुरातत्त्व भव्य प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
 
आधुनिक भारतीय पुरातत्वशास्त्राचे जनक व भारतीय पुरातत्वशास्त्राचे शिल्पकार ‘पद्मभूषण’ डॉ. ह. धी. सांकालिया यांची जयंती नुकतीच दि. 10 डिसेंबर रोजी पार पडली. पुरातत्व संशोधन आणि सर्वेक्षणात त्यांनी मोलाचे योगदान दिले. उत्खननात सापडलेल्या वस्तू या इतिहासजमा झालेला भूतकाळ नसून, वर्तमानाचा खोलवर दडलेला तो पाया असतो, हा नवा दृष्टिकोन त्यांनी अभ्यासकांना दिला. देशाच्या पुरातत्वीय संशोधनाच्या प्रगतीत त्यांचे कार्य आणि भूमिका खूप महत्त्वाची ठरली. त्यांच्या जयंतीचे औचित्य साधून या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 19 डिसेंबरपासून हे प्रदर्शन प्रेक्षकांसाठी खुले झाले.
 
प्राचीन शिल्पे, रामायण आणि महाभारताची हस्तलिखिते, तत्कालीन लोकांच्या दैनंदिन वापरातील वस्तू, देवी-देवतांच्या मूतीर्र्, जुन्या काळातील नाणी, शिलालेख, काही हत्यारे-अवजारे प्राचीन स्वयंपाकाची भांडी, विविध धातूंच्या वस्तू आणि इतर काही दुर्मीळ पुराजैवशास्त्रीय नमुने अशा प्राचीन काळातील अनेक दुर्मीळ आणि मौल्यवान वस्तू या प्रदर्शनात मांडण्यात आल्या आहेत. विविध शतकांतील, विविध राजवटींच्या काळातील, धातूंच्या विविध प्रकारच्या लिपी कोरल्या गेलेल्या आणि काळानुरुप बदलत गेलेल्या इतिहासाची साक्ष देणार्‍या या वस्तू आहेत. अगदी दहाव्या शतकापासून ते ब्रिटिश काळापर्यंतच्या वस्तू या प्रदर्शनात पाहायला मिळतील. या वस्तूंपैकी काही वस्तू साठ्ये महाविद्यालयाच्या संग्रहालयातील आहेत, तसेच काही वस्तू मुंबई विद्यापीठाच्या संग्रहालयातील आहेत, तर काही वस्तू ‘अश्वमेध प्रतिष्ठान’ आणि ‘लब्धी विक्रम जनसेवा ट्रस्ट, अहमदाबाद’ यांसारख्या इतिहास आणि पुरातत्वीय संशोधनासाठी काम करणार्‍या संस्थांनी या प्रदर्शनात मांडण्यासाठी दिलेल्या आहेत. काही इतिहास अभ्यासकांनी स्वतः संशोधन आणि सर्वेक्षण करून संग्रहित केलेल्या वस्तूही या प्रदर्शनाशी शोभा वाढवणार्‍या.वस्तूनिहाय वर्गीकरण करून साठ्ये महाविद्यालयातील विविध वर्गांमध्ये या वस्तू प्रदर्शनासाठी ठेवण्यात आल्या आहेत.
 
इतिहास आणि पुरातत्वासोबतच कला, साहित्य, समाजशास्त्र, धातुशास्त्र, लिपीकला, नाणीशास्त्र, मूर्तिकला आणि स्थापत्यशास्त्र अशा अनेक विषयांच्यादृष्टीने हे प्रदर्शन खूप महत्त्वाचे म्हणता येईल. धान्य दळायचे किंवा भरडायचे जाते प्रत्येक काळात जरी दगडापासूनच बनवले गेलेले असले, तरी कालानुरुप ते बनवण्याच्या पद्धतीत मात्र बदल होत गेला, हे या प्रदर्शनामधील जात्यांचे विविध अवशेष बघताना लक्षात येते. प्रत्येक जात्याचा वेगळा आकार, ते घडवण्याची वेगळी पद्धत, त्यावर केले गेलेले कोरीवकाम याविषयी निरीक्षणे फक्त इतिहासाच्याच नाही, तर धातुशास्त्र किंवा कलेच्या अभ्यासकांनीसुद्धा टिपण्यासारखी आहेत. या प्रदर्शनात मांडण्यात आलेली प्राचीन वीरगळांची छायाचित्रे आणि त्यावर कोरलेल्या लिपींचे काही दस्तऐवज तर खर्‍या अर्थाने पाहण्याजोगे आहेत. राजाचे वीरगळ, व्यापार्‍यांचे वीरगळ, स्त्रियांचे वीरगळ, दंडनीहाय वीरगळ, आत्मबलिदान निदर्शक वीरगळ, गढेगळ अशा विविध प्रकारच्या वीरगळांची माहिती या प्रदर्शनात मिळते. तत्कालीन समाजजीवन समजून घेण्यासाठी हे वीरगळ खूप महत्त्वाचे ठरतात.
 
उत्खननात सापडलेल्या देवी-देवतांच्या मूर्तींचाही समावेश या प्रदर्शनात आहे. त्या त्या काळातील लोकांच्या धारणा, त्यांच्या श्रद्धा, शिवाय कालानुरुप प्रगत होत गेलेल्या मूर्तिकलेच्या साक्षीदार या प्रदर्शनातील मूर्त्या आहेत. संसाधनांची फारशी उपलब्धताही नसणार्‍या त्या काळातील सुबक आणि सुंदर घडवलेल्या या मूर्ती पाहणार्‍यालाही थक्क करतात. शिवाय, या मूर्तींचा अभ्यास करून अभ्यासकांनी वर्तवलेल्या शक्यतांवरून त्या त्या काळातील लोकांच्या धारणा, श्रद्धा समजून घेण्यास मदत होते. बदलत्या काळात आणि बदलत्या राजवटींसोबत बदलत गेलेली नाणी पाहून त्या काळातील धातुशास्त्राचा आणि नाणीशास्त्राचा अंदाज लावता येतो. ब्राह्मी लिपी, मोडी लिपी यांसारख्या नामशेष होत चाललेल्या लिपींची लिखाणाची पद्धत जवळून पाहण्याची संधी या प्रदर्शनात मिळते. या प्रदर्शनातील प्रत्येक दालनातील प्रत्येक वस्तू पाहण्याजोगी आहे. त्या त्या वस्तूच्या आकारावरून, प्रकारावरून, शैलीवरून किंवा त्यावर कोरल्या गेलेल्या लिपीवरून-चित्रांवरून त्या त्या काळातील आर्थिक, सामाजिक, राजकीय परिस्थिती समजून घेता येते. परकीय आक्रमणांचा इतिहासावर झालेला चांगला-वाईट परिणामसुद्धा या प्रदर्शनातील वस्तूंच्या रुपात पाहायला मिळतो. विद्यार्थी आणि इतिहासप्रेमींसाठी संधी
 
विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाविषयी प्रेम आणि उत्सुकता निर्माण व्हावी, यासाठी या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. या प्रदर्शनाच्या निमित्ताने त्यांना या प्राचीन वस्तू पाहता येतील. त्यांचा काळ, त्यामागचा इतिहास समजून घेता येईल. या प्राचीन आणि दुर्मीळ वस्तूंच्या प्रदर्शनात नाणी, शिलालेख, हस्तलिखिते अशा अनेक गोष्टी आहेत. त्यामुळे विविध बाजूंनी इतिहास समजून घेण्याची संधी विद्यार्थ्यांना या प्रदर्शनात मिळेल. विद्यार्थ्यांसोबतच इतरही इतिहासप्रेमींना या वस्तू पाहण्याची संधी मिळावी, यासाठी आम्ही हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. 
 
राधा सबनीस, साहाय्यक प्राध्यापक, साठ्ये महाविद्यालय
 
इतिहासाविषयी आदर निर्माण व्हावा
 
नालासोपारा हे महत्त्वाच्या ऐतिहासिक स्थळांपैकी एक. पण, तरुण पिढीला त्याबद्दल फारशी माहिती नाही. तिथे राहणार्‍या बर्‍याच स्थानिकांनादेखील त्याबद्दल फारशी माहिती नाही. अशा अनेक ऐतिहासिक दृष्टीने महत्त्वाची ठिकाणे, वस्तू आणि वास्तू ज्याबद्दल लोकांना फारशी माहिती नाही, त्या या प्रदर्शनात ठेवण्यात आल्या आहेत. या प्रदर्शनाचा उद्देश हाच आहे की, यानिमित्ताने लोकांना या प्राचीन वस्तू पाहता याव्या, त्यांची माहिती घेता यावी. आपल्या संस्कृतीविषयी आणि इतिहासाविषयी त्यांच्या मनात उत्सुकता आणि आदर निर्माण व्हावा.
 
 
सिद्धार्थ काळे, पुरातत्व अभ्यासक आणि ‘लब्धी विक्रम जनसेवा ट्रस्ट’चे सदस्य

दिपाली कानसे