कर्नाटकात तरुण आयपीएस अधिकाऱ्याचा अपघातात दुर्देवी मृत्यू!

02 Dec 2024 17:35:52

ips
 
बंगळूर : (IPS Officer Harsh Vardhan) पोलीस अकादमीमधले प्रशिक्षण संपवून आपल्‍या कर्तव्‍यावर रुजू होण्‍याकरिता जात असणाऱ्या तरुण आयपीएस अधिकाऱ्याचा वाहन अपघातात दुर्देवी मृत्यू झाल्याची दु:खद घटना कर्नाटकातील हसन जिल्ह्यात घडली आहे. हर्ष वर्धन असे २६ वर्षीय मृत आयपीएस अधिकाऱ्याचे नाव आहे. हर्ष वर्धन हे कर्नाटक केडरचे २०२३ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असून ते मध्य प्रदेशचे मूळ रहिवासी होते. पहिल्या पोस्टिंगनंतर पदभार स्वीकारण्यासाठी जात असतानाच त्यांचा रविवारी १ डिसेंबर रोजी अपघाती मृत्यू झाला आहे.
 
नेमकं काय घडलं?
 
हसनपासून सुमारे १० किलोमीटर अंतरावर असणार्‍या किटणेजवळ रविवारी सायंकाळी पोलिसांच्या वाहनाचा टायर फुटल्यामुळे हा अपघात झाला. टायर फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन रस्त्याच्या कडेला असलेल्या एका घरावर व झाडावर आदळले. या अपघातात हर्ष वर्धन यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हर्ष वर्धन यांनी नुकतेच म्हैसूर येथील पोलीस अकादमीमध्ये चार आठवड्यांचे प्रशिक्षण पूर्ण केले होते. प्रशिक्षण पूर्ण झाल्याने ते सोमवारी होलेनरसीपूर येथे प्रोबेशनरी सहाय्यक पोलीस अधीक्षक म्हणून रुजू होणार होते.
 
दुर्घटनेवर कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला शोक
 
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी हर्ष वर्धन यांच्या कुटुंबाप्रती शोक व्यक्त करत, "हसन-म्हैसूर महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात आयपीएस अधिकारी हर्ष वर्धन यांच्या मृत्यूबद्दल ऐकून दुःख झाले. कार्यभार स्वीकारण्यासाठी जात असताना असा हा अपघात झाला, ही अत्यंत खेदाची बाब आहे. त्यांच्या वर्षानुवर्षे केलेल्या कष्टाचे फळ मिळाले, तेव्हा असे घडायला नको होते. हर्ष वर्धन यांच्या आत्म्याला शांती लाभो, अशी मी देवाकडे प्रार्थना करतो." असे ते म्हणाले आहेत. माजी मुख्यमंत्री सदानंद गौडा यांनीही या दुर्घटनेवर शोक व्यक्त केला आहे. एका समर्पित तरुण अधिकाऱ्याला देश मुकला असल्याचे त्यांनी म्हटले आहे
 
 
Powered By Sangraha 9.0