खलिस्तान्यांशी संबंधित १० हजार युआरएल ब्लॉक; केंद्र सरकारची कारवाई

02 Dec 2024 18:40:57

khalistani
 
नवी दिल्ली : केंद्र सरकारने खलिस्तान्यांशी संबंधित १० हजार ५०० हून अधिक युआरएल ब्लॉक केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने समाजमाध्यमे आणि इंटरनेटवर पसरवलेला खलिस्तानी प्रचार रोखण्यासाठी गेल्या ३ वर्षांत ही कारवाई केली आहे.
 
प्राप्त माहितीनुसार, केंद्र सरकारने गेल्या तीन वर्षांत २८ हजार ०७९ युआरएल ब्लॉक केल्या आहेत. यापैकी सर्वाधिक १० हजार ९७६ युआरएल या फेसबुकच्या, १० हजार १३९ युआरएल एक्स – ट्विटरच्या होत्या. याशिवाय २ हजार २११ युट्यूब खाती, २ हजार १९८ इस्टाग्राम तर २२ टेलिग्राम अकाउंट आणि १३८ व्हॉट्सॲप अकाउंटही ब्लॉक करण्यात आले आहेत. यापूर्वी २०२२ मध्ये ६,७७५ समाजमाध्यम खाती ब्लॉक करण्यात आली होती, २०२३ मध्ये ही संख्या १२,४८३ पर्यंत वाढली. त्याच वेळी, २०२४ मध्ये आतापर्यंत ८,८२१ खाती ब्लॉक करण्यात आली आहेत.
 
खलिस्तानी सामग्रीशिवाय, सरकारने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया, एलटीटीई, जम्मू आणि काश्मीरमधील अतिरेकी आणि 'वारीस पंजाब दे' यांसारख्या संघटनांशी संबंधित २,१०० युआरएलदेखील बंद केले आहेत. केंद्रीय गुप्तचर यंत्रणांच्या शिफारशींच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे. नुकतीच माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आणि गृह मंत्रालयाच्या उच्च अधिकाऱ्यांमध्ये या विषयावर चर्चा झाली. या वेळी राष्ट्रीय सुरक्षेच्या विरोधात काम करणारी कोणतीही ऑनलाइन सामग्री त्वरित ब्लॉक केली जाईल, असा निर्णय घेण्यात आला होता.
 
 
Powered By Sangraha 9.0