वस्त्र किमयागार शुभदा

02 Dec 2024 11:33:23

shubhada
 
 
आपल्यातील कलागुणांना वाव देत त्याच्या जोरावर स्वतःचा व्यवसाय थाटणार्‍या शुभदा डोळसे-देवकरच्या यशस्वी प्रवासावर नजर टाकणारा हा लेख...
 
आज विविध लग्न सोहळ्यांमध्ये, सणासुदीला मालिकांमधील, चित्रपटांमधील हुबेहूब पोशाख घालण्याचा ट्रेन्ड आहे. इतकेच नाही, तर लग्न सोहळ्यांमध्ये वधू आणि वर हे ऐतिहासिक संदर्भ असणारे आणि भारतीय संस्कृतीशी निगडित वस्त्रे, अलंकार यांना बाजारपेठेत मागणी मोठी आहे. हीच मागणी ओळखत अहिल्यानगरमधील तरुणी शुभदा डोळसे-देवकरने ‘शुभाज् फॅशन स्टुडिओ’च्या माध्यमातून, उत्कृष्ट वस्त्रनिर्मिती करत नगरकरांच्या मनावर भुरळ घातली आहे.
 
शुभदा तिच्या उत्कृष्ट डिझाईन केलेले वस्त्रालंकार, शहरात खुप प्रसिद्ध आहेत. प्रत्येक सण, उत्सव, सोहळे हे तिने केलेल्या कपड्यांशिवाय अपूर्णच असे म्हटले, तर वावगे ठरणार नाही. अशा या शुभदाला फॅशन डिझायनिंग या कलाक्षेत्राचे बाळकडू मिळाले ते वडीलांकडूनच. शुभदा ही शहरातील प्रसिद्ध खडू शिल्पकार अशोक डोळसे यांची ज्येष्ठ कन्या. कलाशिक्षक म्हणून कार्यरत असणारे अशोक डोळसे, सर्वच ‘रिअ‍ॅलिस्टिक’ कलाप्रकारात काम करतात. कलाशिक्षक म्हणून काम करत असताना डोळसे दाम्पत्य, विद्यार्थ्यांनी केवळ शाळेतील एका तासापुरते चित्रकला या विषयाकडे न पाहता, अधिकाधिक कलासंपन्न व्हावे याकरिता कलाशिबिरे, छंदवर्ग व कार्यशाळा यांचे आयोजन करण्याचे काम करतात. ‘अशोका आर्ट गॅलरी’च्या माध्यमातून गेली काही वर्षे ते शहरात, एक कलात्मक वातावरण निर्मितीस हातभार लावत आहे.
 
त्यामुळे घरातच इतके कलासंपन्न वातावरण असल्याने, शुभदा लहापणापासूनच मन लावून आपल्या वडिलांकडे असणारे कलागुण बारकाईने टिपते आहे. इतकेच नाही, तर त्यांचा हा वारसा सार्थपणे जपतेही आहे. त्याचेच प्रतिबिंब म्हणजे व्यावसायिक प्रशिक्षण संपवून काही महिने उलटताच, शुभदाने ‘शुभाज् फॅशन स्टुडिओ’ या नावाने स्वतःचे डिझायनर वस्त्रदालन सुरु केले. इतक्या लहान वयातच व्यावसायिक क्षेत्रात उतरत तिने, आपल्या उत्कृष्ट कारागिरीतून अल्पावधीतच शहरातच नव्हे, तर फिल्म इंडस्ट्रीमध्ये आपले नाव कमावले. शुभदाने कला विषयातून बी.ए.ची पदवी पूर्ण केली. तत्पूर्वी तिने बारावी पास होताच, नगर शहरातील ‘आयएफडीटी’ या महाविद्यालयामधून फॅशन डिझायनिंगचे प्रोफेशनल शिक्षण पूर्ण केले आहे.
 
महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यावर शुभदा वडिलांच्या कामात हातभार लावत असतानाच, छोटी मोठी काम घेऊन ती अत्यंत कलात्मकरित्या ग्राहकांना आवडेल अशी वेळेत पूर्ण करून देत असे. टी-शर्ट पेन्टिंग, साडी डिझायनिंग अशी कामे ती करत होती. आई-वडील दोघेही कलाकार असल्याने, शुभदाला हे काम करताना त्यांचे संपूर्ण मार्गदर्शन मिळत होते. पेन्टिंग करत असताना, त्यात अनेक प्रकारची क्षेत्र निवडता येतात. मात्र, शुभदाला फॅब्रिकमध्ये आवड असल्याने, तिने फॅशन डिझायनिंग हे क्षेत्र निवडल्याचे ती सांगते. सुरुवातीला घरातच स्वतःचा स्टुडिओ सुरु करत, शुभदाने टी-शर्ट पेन्टिंग, यांनतर शिवणकाम आणि मुख्य ड्रेस डिझायनिंग अशी टप्प्याटप्य्याने तिने कामाला सुरुवात केली. मागील सात ते आठ वर्षांपासून, अविरतपणे शुभदा या क्षेत्रात काम करते आहे. दि. ९ जानेवारी २०२२ साली स्वप्नपूर्ती करत, शुभदाने स्वतःच्या मालकीचा ‘शुभाज् फॅशन स्टुडिओ’ शहराच्या मध्यवर्ती भागात थाटला.
 
मागील आठ वर्षांत या क्षेत्रात जम बसवत असतानाच, शुभदाने ‘झी मराठी’ वाहिनीवर सुरु असणार्‍या मालिकांसाठीदेखील ड्रेस डिझायनिंग केले आहे. नगरमध्ये ‘झी मराठी’ वाहिनीवरील विविध मालिकांचे चित्रीकरण होते. अनेकदा नगरच्या ग्रामीण भागात लघुचित्रपट, चित्रपटांचे चित्रीकरण होते. अशावेळी या मालिकांमधील प्रमुख कलाकार आणि विविध सोहळ्यासाठी शुभदा ड्रेस डिझायनिंग करते. काही वर्षांपूर्वीच तिने ‘चला हवा येऊ द्या’ या मालिकेत सहभागी होणार्‍या मोनिका बागुल, माधुरी देशमुख या अभिनेत्रींसाठीही ड्रेस डिझाईन केला होता. नगर शहरात शुभदाने सुरु केलेला व्यवसाय आता, शहराच्या सीमा ओलांडून विस्तारतो आहे.
 
गेल्यावर्षी २०२३ साली शुभदाचा विशाल देवकर यांच्याशी विवाह संपन्न झाला. आई-वडिलांकडे अत्यंत मोकळ्या वातावरणात आपले कलाप्रेम जपत असताना, त्याचे व्यवसायात रूपांतर केल्याने शुभदाची जबाबदारी वाढली होती. मात्र, विशाल देवकर हेदेखील स्वतः इंटेरिअर डिझायनर आणि व्यावसायिक असल्याने, आई-वडिलांइतकाच पाठिंबा तिला सासरीसुद्धा मिळत असल्याचे शुभदा आवर्जून सांगते. आमचे दोघांचेही क्षेत्र एक असल्यामुळे आमच्या क्षेत्रातील आव्हाने, व्यावसायिक गरजा याबाबत दोघेही अत्यंत सकारात्मक असतो. अनेकदा माझ्या ऑर्डर असल्याने रात्री उशिरापर्यंत स्टुडिओमध्ये थांबावे लागते. अशावेळी माझे देवकर कुटुंब पूर्णतः माझ्या पाठीशी उभे असल्याचेही शुभदा सांगते.
 
लग्न झाल्यावर आपल्याला आपली आवड जपता येत नाही अशी अनेक महिलांची ओरड असते. मात्र, अशावेळी शुभदाचे आयुष्य हे वर्क आणि फॅमिली लाईफ समतोल कसा साधावा याचे उत्तम उदाहरण आहे. स्वतःची ओळख निर्माण करू इच्छिणार्‍या महिलांना संदेश देताना शुभदा सांगते, “प्रत्येक मुलीचे, महिलेचे स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे स्वप्न असते. मात्र ते पूर्ण करण्यासाठी आपण काय प्रयत्न करतो हेदेखील अत्यंत महत्त्वाचे आहे. आपल्या आवडीचे क्षेत्र निवडा आणि त्यामध्येच मेहनत करून प्रामाणिकपणे काम करा. यश नक्की मिळेल!” शुभदाचा प्रवास अनेक महिलांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे. तिला भविष्यातील कामगिरीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून अनेकानेक शुभेच्छा!
 
 
Powered By Sangraha 9.0