महाराष्ट्राच्या जनतेने दिलेला कौल दळभद्री आहे का? केशव उपाध्येंचा संजय राऊतांना सवाल

02 Dec 2024 12:56:30
 
Keshav Upadhye
 
मुंबई : संजय राऊत महाराष्ट्र विधानसभेच्या निकालाला 'दळभद्री' म्हणत आहेत. म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेने दिलेला कौल दळभद्री आहे का? असा सवाल भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी संजय राऊतांना केला आहे. राऊतांनी केलेल्या टीकेला त्यांनी रविवारी आपल्या 'X' अकाऊंटवरून प्रत्युत्तर दिले.
 
केशव उपाध्ये म्हणाले की, "एकदा स्वतःकडे नीट बघा. महाराष्ट्राच्या राजकारणाची, स्वतःच्या विचारधारेची, पक्षाच्या ऐतिहासिक वारसाची, परंपरेची कशी 'दळभद्री' अवस्था करून ठेवली आहे हे दिसेल. लोकसभा निवडणुकीत वोट जिहादचे महापाप करून मिळवलेल्या विजयानंतर एकदा तरी ईव्हीएम वर शंका उपस्थित केली होती का?" असा सवाल त्यांनी केला.
 
ते पुढे म्हणाले की, "महाराष्ट्राची जनता लोकसभेच्या निकालावरून शहाणी झाली. जातपात विसरून हिंदुत्वासाठी मतदान केले आणि तुमचे मनसुबे उधळून लावले. त्यामुळे तुम्हाला आता ईव्हीएमची खोड सुचत आहे. ईव्हीएम हॅक होणे शक्य नाही. तुमच्यापेक्षा त्या क्षेत्रातील तज्ञ लोकांनी ते सिद्ध केले आहे. अनेक गोष्टींचा विचार करून ईव्हीएमचा निर्णय झाला होता. ईव्हीएमवर होणारी ही काही पहिली दुसरी निवडणूक नाही. त्यामुळे तुमच्या ओरडण्याला ईव्हीएम घोटाळ्यापेक्षा पराभवाच्या दुःखाची किनार जास्त आहे.त्यापेक्षा लोकांमध्ये जा, त्यांच्या समस्या सोडवा, राष्ट्रहित सर्वोच्च ठेवून सरकार चालवण्यासाठी, लोकशाही टिकवण्यासाठी मदत करा," असा सल्लाही केशव उपाध्येंनी राऊतांना दिला आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0