आयुर्वेदाच्या प्रसारासाठी

02 Dec 2024 23:06:29

 Dr. Madhura Kulkarni
आयुर्वेदाच्या तज्ज्ञ आयुर्वेद चिकित्सक, नि:स्वार्थी सामाजिक कार्यकर्ता म्हणून सुपरिचित असलेल्या डॉ. मधुरा कुलकर्णी यांच्या विचारकार्याचा संक्षिप्त मागोवा घेणारा हा लेख.
प्रसारासाठी...
आयुर्वेदाचे शिक्षण घेणार्‍यांनी भविष्यात आयुर्वेद या क्षेत्रात काम करायला हवे. आयुर्वेद हे शास्त्र संपन्न आहे, त्या क्षेत्रात कार्यरत राहणे प्रचार-प्रसार करणे ही आपली जबाबदारी आहे.” नरेंद्र मोदी त्यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री होते. एका आयुर्वेद परिषदेमध्ये ते म्हणाले. त्यांचे हे वाक्य डॉ. मधुरा कुलकर्णी यांच्या मनात खोलवर रूजले.
 
आज डॉ. मधुरा कुलकर्णी आयुर्वेदातील तज्ज्ञ म्हणून सुपरिचित आहेत. त्या ‘आयुर्वेद वाचस्पती’ पदवीप्राप्त (एमएडी) आहेत. त्याचसोबत त्यांनी ‘डिप्लोमा इन योगा अ‍ॅण्ड फिलॉसॉफी’चे शिक्षण घेतले आहे. त्या ‘आरोग्य भारती’च्या राष्ट्रीय कार्यकारी सदस्या आहेत. त्या ‘आरोग्य धाम आयुर्वेद रूग्णालया’च्या संचालक आहेत, ‘नॅशनल इंटिग्रेशन मेडिकल असोसिएशन’ ठाणेच्या महिला अध्यक्ष आहेत. आरोग्यसेवेसाठी आणि आयुर्वेद तज्ज्ञतेसाठी त्यांना ‘बेस्ट फिमेल डॉक्टर्स वैद्य खडीवाले पुरस्कार’, ‘दुर्गा पुरस्कार’ असे अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. तज्ज्ञ डॉक्टर्स, नि:स्वार्थी सामाजिक कार्यकर्ता तसेच ‘अल्ट्रा मॅरोथॅनोर’ म्हणूनही त्यांचा नावलौकिक आहे. ‘सुप्रजा संस्कार’ याविषयी त्यांचे उल्लेखनीय कार्य आहे. ‘बीजकोषग्रंथी’(पीसीओडी) याविषयी समाजात जागृती व्हावी, यासाठी त्या अनेक उपक्रम राबवत असतात. त्यांचे पती डॉ. उदय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शन आणि सहकार्याने त्यांनी देशभरातल्या आयुर्वेदिक डॉक्टरांचे संघटन केले. मात्र, काही वर्षांपूर्वी आयुर्वेद चिकित्सा उपचार हे आरोग्य विमामध्ये अंतर्भूत नव्हते. आयुर्वेद चिकित्सा आणि उपचार हे आरोग्य विमामध्ये अंतर्भूत असावे, यासाठी डॉ. मधुरा यांनी पती उदय यांच्यासोबत महत्त्वाचे कार्य केले. डॉ. मधुरा कुलकर्णी यांनी आयुर्वेदासंदर्भात संशोधन प्रबंधही लिहिले आहेत. या सगळ्या कार्यात त्यांनी त्यांची समाजशीलता कायम राखली.
 
डॉ. मधुरा कुलकर्णी यांच्या जीवनाचा मागोवा घेऊ. पद्माकर आणि रजनी कुलकर्णी हे मूळचे नंदुरबारचे. पण, कामानिमित्त मुंबईतील बोरिवलीमध्ये स्थायिक झाले. त्यांना तीन मुली असून, त्यापैकी एक मधुरा. पद्माकर हे चित्रपटसृष्टीत काम करायचे. चित्रपटासाठी कायदेशीर मार्गदर्शन सहकार्य करायचे, तर रजनी या गृहिणी. मात्र, डॉ. पांडुरंग शास्त्री आठवलेंच्या ‘स्वाध्याय’तर्फे त्या संस्कारवर्ग घ्यायच्या. पद्माकर हे 1942 सालच्या ‘चले जाव’ चळवळीत सक्रिय सहभागी होते. त्या चळवळीत त्यांच्या पायाला गोळीही लागली होती. त्यांची रा. स्व. संघाच्या विचारांवर निष्ठा, तर रजनी या राष्ट्र सेवा समितीच्या शाखेत जायच्या. स्वत:सोबत मुलींनाही घेऊन जायच्या. परिसरात कुठेही चांगले व्याख्यान, परिसंवाद, नाटक असले की, त्या मुलींना सोबत नेत. कुटुंब आर्थिक संपन्न नव्हते. पण, संस्काराने संपन्न होते. ‘तुम्हाला मुलगा नाही. कसे होणार हो तुमचे?’ असे अनेक जण आईबाबांना म्हणत. त्यावेळी आईबाबा म्हणत, “आमच्या मुली कुणापेक्षाही कमी नाहीत.” कुलकर्णी दाम्पत्याने मुलींच्या संगोपनात कुठलीही कमतरता ठेवली नाही. पुढे मधुरा यांना ‘बीएएमएस’साठी प्रवेश घ्यायचा होता. प्रवेशशुल्क जास्त होते. रजनीबाईंनी त्यावेळी त्यांचे दागिने गहाण ठेवले. त्या म्हणाल्या “माझ्या लेकीच माझा दागिना आहेत.” आपले आईबाबा आपल्या भविष्यासाठी इतका विचार करतात, हे पाहून मधुरा यांनी ठरवले की, आपण त्यांचा विश्वास सार्थ करायचा. त्यामुळेच की काय त्यांना ‘बीएएमएस’ आणि ‘एमडी’ दोन्हीच्या अंतिम परीक्षेच्या निकालात सुवर्णपदक प्राप्त झाले. काही कालाने त्यांचा विवाह डॉ. उदय कुलकर्णी यांच्याशी झाला. दोघांनी मिळून आयुर्वेद क्षेत्रासाठी खूप काम केले. याच काळात ‘जनकल्याण समिती’च्या प्रविण मुकादम यांच्यामुळे त्यांचा संपर्क ‘आरोग्य भारती संघटने’शी झाला. संघटनेच्या माध्यमातून त्यांनी अनेक उपक्रम हाती घेतले.
 
पुढे एका मोठ्या अपघातामध्ये त्यांना जबर दुखापात झाली. तेव्हा एकाच महिन्यात त्यांनी सगळी काम पूर्ववत सुरू केली. ही आत्मशक्ती आणि जिद्दी आशावाद त्यांच्यात कुठून आला? तर मधुरा या शाळेत असतानाची घटना. शाळेत परीक्षा होती. मात्र, त्याचवेळी अपघात झाला आणि उजव्या हाताला प्लास्टर लागले. परीक्षा कशी देणार? त्यावेळी त्यांचे बाबा म्हणाले, “उजव्या हाताला प्लास्टर आहे ना? तुझा मेंदू, डोळे आणि डावा हात सक्षम आहे. परीक्षेचा पेपर डाव्या हाताने लिही. तुला हे कळेल की तू डाव्या हातानेही लिहू शकतेस का ते?” खरोखरच मधुरा यांनी त्यावेळी डाव्या हाताने पेपर लिहला आणि त्या परीक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्णही झाल्या.कोरोना काळात त्या सलग तीन वर्षे ठाणे महानगरपालिकेसोबत काम करत होत्या. या काळात उपेक्षित असलेल्या समाजाचे जगणे त्यांनी पाहिले. माणूस इतकाही हतबल असतो? महिलांच्या आरोग्याच्या छोट्या छोट्या समस्या जीवघेण्या होताना त्यांनी पाहिल्या. त्यानंतर त्यांनी महिलांसाठी आरोग्यसेवेचे कार्य हाती घेतले. समुपदेशन, मार्गदर्शन आणि संपूर्ण सहकार्य अशा स्तरावर त्यांचे कार्य चालते. “आयुर्वेदासंदर्भात समाजातील सर्वच स्तरावर प्रचार-प्रसार तसेच महिला आरोग्यसंदर्भात त्यातही ‘पीसीओडी’संदर्भात जागृती होण्यासाठी आयुष्यभर कार्य करायचे आहे,” असे डॉ. मधुरा म्हणतात आणि म्हटल्याप्रमाणे त्या ते कार्य करतात. डॉ. मधुरा कुलकर्णी यांच्यासारख्या व्यक्ती या आरोग्य क्षेत्रातील दीपस्तंभच आहेत.
Powered By Sangraha 9.0