करीमगंज : (Chalo Bangladesh Protest) सनातनी ऐक्य मंच आयोजित ऐतिहासिक ‘चलो बांगलादेश’ आंदोलनाने देशभरात अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. 'चिन्मय प्रभूंची बिनशर्त सुटका' आणि 'बांगलादेशातील हिंदू समाजाच्या सुरक्षिततेची खात्री' या दोन प्रमुख मागण्यांखातर करीमगंज कॉलेज कॅम्पसपासून निघालेल्या बाईक रॅलीची सुतारकांडी बॉर्डर येथे सांगता झाली. यावेळी दोन हजारहून अधिक दुचाकींचा समावेश होता तर मुख्य कार्यक्रमात ६० हजारहून अधिक लोक उपस्थित होते.
हे वाचलंत का? : बांगलादेशात श्याम दास प्रभू यांना विनावॉरंट अटक
या ऐतिहासिक कार्यक्रमात सनातनी ऐक्य मंचचे समन्वयक शंतनू नाईक, सिलचर शंकर मठ व मिशनचे प्रमुख आशित चक्रवर्ती, बालागिरी आश्रमचे विज्ञानानंद महाराज, बैकानंद महाराज आणि शिवब्रत साहा आदी मान्यवर वक्त्यांनी आपल्या उद्बोधनातून उपस्थितांना संबोधित केले. दुपारी दीड वाजता आंदोलक पायी मोर्चा काढत सुतारकांडी बॉर्डर येथे निघाले. तेव्हा बीएसएफ आणि आसाम पोलिसांनी त्यांना सीमेच्या अर्धा किलोमीटर आधी रोखले असले तरी आंदोलकांची जिद्द अटूट असल्याचे पाहायला मिळाले.
चिन्मय प्रभूची अटक हे मानवी हक्कांचे गंभीर उल्लंघन असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे. त्यांच्या तात्काळ सुटकेची मागणी सनातनी ऐक्य मंचाने केली असून ही मागणी पूर्ण न झाल्यास आंदोलन आणखी मोठ्या प्रमाणावर नेण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. त्यासोबतच निवेदनात पुढे असेही म्हटले आहे की, हिंदू अल्पसंख्याकांची लूट, बलात्कार, हत्या आणि विस्थापनाचा सनातनी ऐक्य मंच तीव्र निषेध करत आहे. बांगलादेश सरकारने ही घृणास्पद कृत्ये तात्काळ थांबवावी आणि हिंदू समाजाच्या सुरक्षिततेची खात्री करावी.
बांगलादेशातील हिंदूंचे धार्मिक अधिकार, मंदिरे पाडणे आणि त्यांच्या भूमीतून बेदखल करणे यावर सनातनी एक्य मंचने तीव्र चिंता व्यक्त केली. बांगलादेश सरकारने तातडीने ठोस पावले न उचलल्यास आंदोलन आंतरराष्ट्रीय स्तरावर नेले जाईल, असा इशारा मंचाने यावेळी दिला आहे. कोणत्याही प्रकारच्या जातीय, धार्मिक किंवा सामाजिक दडपशाहीविरुद्ध संपूर्ण जगाने एकजूट दाखवली पाहिजे, असा स्पष्ट संदेश या आंदोलनादरम्यान देण्यात आला. बांगलादेशात हिंदूंची सुरक्षा आणि सन्मान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील, असा निर्धार सनातनी ऐक्य मंचाने केला आहे.