विहिंपने ३५० हून अधिक खासदारांशी साधला संपर्क; संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान नेमकं काय घडलं?

    19-Dec-2024
Total Views |

VHP Saansad Sampark Abhiyan

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (VHP Saansad Sampark Abhiyan)
विश्व हिंदू परिषदेने संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान चालवल्या जाणाऱ्या वार्षिक संसद संपर्क अभियानात आतापर्यंत ३५० हून अधिक खासदारांशी संपर्क साधला असून हिंदू समाजाशी संबंधित तीन प्रमुख विषयांवर चर्चा केली. याबाबत सविस्तर माहिती विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय महामंत्री बजरंग बागड़ा यांनी नवी दिल्ली येथे गुरुवार, दि. १९ डिसेंबर रोजी झालेल्या पत्रकार परिषदेदरम्यान दिली.

हे वाचलंत का? : धर्मांचा धर्म जो शाश्वत आहे तो 'सनातन हिंदू धर्म'

या मोहिमेदरम्यान देशभरातील विविध राज्यांतील, भाषा आणि संप्रदायांतील कार्यकर्त्यांनी मंदिरांना सरकारी नियंत्रणातून मुक्ती, वक्फ दुरुस्ती विधेयक आणि घटनेच्या अनुच्छेद २९ आणि ३० अन्वये अल्पसंख्याकांना दिलेल्या विशेषाधिकारांचा विस्तार या विषयांवर खासदारांशी चर्चा केली. वास्तविक संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान दरवर्षी विश्व हिंदू परिषद देशभरातील सर्व पक्षांच्या खासदारांशी संपर्क साधण्याचा कार्यक्रम आयोजित करते. याद्वारे विहिंपच्या बहुआयामी कार्य आणि कार्यक्रमांसह हिंदू समाज आणि देशाच्या एकता आणि अखंडतेशी संबंधित २-३ ज्वलंत प्रश्नांवर माहिती दिली जाते. या मोहिमेसाठी देशातील विविध राज्यांतील कार्यकर्ते ३-४ टप्प्यांत दिल्लीत पोहोचतात आणि आपापल्या राज्यातील खासदारांशी संपर्क साधतात.

यावर्षीचे 'वार्षिक संसद संपर्क अभियान' दि. २ ते २० डिसेंबर दरम्यान आयोजित करण्यात आला होता. दि. २ ते ६ डिसेंबर या पहिल्या टप्प्यात केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांनी एकूण ११४ लोकसभा आणि राज्यसभा खासदारांशी संपर्क साधला. दुसऱ्या टप्प्यात दि. ९ ते १३ डिसेंबर दरम्यान छत्तीसगड, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, दिल्ली, हरियाणा, हिमाचल प्रदेश, पंजाब आणि जम्मू काश्मीरमधील कार्यकर्त्यांनी या राज्यांच्या एकूण १३९ खासदारांशी संपर्क साधला. तिसऱ्या आणि अंतिम टप्पा सुरु असून यामध्ये उत्तर प्रदेश, उत्तराखंड, बिहार, झारखंड, आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा, मणिपूर आणि नागालँडमधील कार्यकर्ता संबंधित राज्यांतील खासदारांशी संपर्क साधण्यात व्यस्त आहेत. अभियानाची सांगता दि. २० डिसेंबर रोजी होईल.

वार्षिक संसद संपर्क अभियानात ठरविण्यात आलेले प्रमुख तीन विषय
१. सरकारांच्या ताब्यात असलेली सर्व हिंदू मंदिरे हिंदू समाजाच्या ताब्यात द्यावीत.
२. वक्फ कायदा दुरुस्त करून तर्कसंगत केला पाहिजे. भारत सरकारने प्रस्तावित केलेल्या सुधारणांना पाठिंबा देण्याची खासदारांना विनंती.
३. संविधानातील अनुच्छेद २९ आणि ३० जे अल्पसंख्याक समाजाला त्यांच्या धार्मिक शैक्षणिक संस्था चालवण्याची परवानगी देतात, तशाच सुविधा हिंदू समाजालाही देण्यात याव्यात कारण या अधिकारापासून फक्त हिंदू वंचित आहेत.