ठाण्याची हवा मध्यम प्रदूषित - प्रदूषण रोखण्याचे पालिकेसमोर आव्हान

19 Dec 2024 18:45:21

polluted
 
ठाणे : मुंबईच्या तुलनेत ठाणे शहरातील हवा मध्यम प्रदुषित असल्याची बाब सर्वेक्षणातून समोर आली आहे. १७ डिसेंबर रोजीच्या एअर क्वालिटी इंडेक्सनुसार ठाणे शहरात सरासरी १२० हवा गुणवत्ता निर्देशांक नोंद झाला आहे. असे असले तरी हवेतील प्रदुषण रोखण्याचे मोठे आव्हान ठाणे महापालिकेसमोर आहे. दरम्यान, मुंबई - ठाण्यापेक्षा पुणे, चिंचवड, नाशिक, नांदेड, कोल्हापुर, अहमदनगर आदी शहरातील हवेची गुणवत्ता रेड झोनमध्ये असल्याने श्वास घेण्यासही त्रासदायक असल्याचे अहवालात नमुद आहे.
 
उत्तम आरोग्यासाठी स्वच्छ व प्रदुषणमुक्त हवेची आवश्यक्ता असते. मात्र, गेल्या काही काळात हवेतील वायू प्रदूषणाची पातळी वाढत असल्याने हा चिंतेचा विषय बनला आहे. ठाणे महापालिकेच्या प्रदुषण नियंत्रण विभागाकडील नोंदीनुसार ठाणे शहरातील एअर क्वालिटी इंडेक्स १ डिसेंबर रोजी सरासरी १४७ होता, तर १७ डिसेंबर रोजी हवा गुणवत्ता निर्देशांक सरासरी १२० असल्याचे समोर आले आहे. डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीच्या काळात १ वर असलेला हवा गुणवत्ता निर्देशांक, पंधरवड्यानंतर (दि.१७ डिसे) १२१ एवढा नोंदवण्यात आला आहे. हा हवा गुणवत्ता निर्देशांक मध्यम प्रदूषित या वर्गवारीमध्ये आहे. एअर क्वालिटी इंडेक्सनुसार ० ते ५० एअर क्वालिटी इंडेक्सची नोंद झाल्यास हवेची गुणवत्ता चांगली असल्याचा निष्कर्ष काढला जातो.५१ ते १०० समाधानकारक, १०१ ते २०० मध्यम गुणवत्ता, २०१-३०० प्रदूषित, ३०१ ते ४०० अत्यंत प्रदूषित आणि ४०१-५०० गंभीर स्वरुपाचे प्रदूषण मानले जाते.
 
चौकट - हवा प्रदूषणाचा निर्देशांक समाधानकारक
 
ठाणे हे तलावांचे शहर असुन शहरात वृक्षसंपदाही मोठ्या प्रमाणावर आहे. मात्र, वाढत्या नागरीकरणामुळे तसेच विविध विकासकामांमुळे आणि धुळ,धुराच्या व्याप्तीने शहरात वायु प्रदुषणाची पातळी काही अंशी वाढली आहे. मात्र हे प्रमाण गेल्या दोन वर्षांपेक्षा तुलनेने कमी आहे. हवा गुणवत्ता निर्देशांक सरासरी १२० पर्यंत कमी झाल्याने ठाण्याची हवा मध्यम प्रदूषित स्तरावर आहे.
 
मनीषा प्रधान, मुख्य पर्यावरण अधिकारी, ठामपा
 
हवा प्रदूषणाच्या तक्रारीसाठी पालिकेची हेल्पलाईन
 
ठाणे महापालिकेने हवा प्रदूषण रोखण्यासाठी विविध उपाययोजना अंमलात आणल्या आहेत. त्याचसोबत, हवा प्रदूषणाच्या तक्रारी नोंदविण्यासाठी ठाणे महापालिकेची हेल्पलाईन (८६५७८८७१०१) सुरू केली आहे. हवेच्या प्रदूषणाबाबत नागरिकांनी या व्हॉट्सॲप क्रमांकावर छायाचित्रासह तक्रार नोंदवावी, असे आवाहन ठाणे महापालिकेने केले आहे.


Powered By Sangraha 9.0