धर्मांचा धर्म जो शाश्वत आहे तो 'सनातन हिंदू धर्म'

19 Dec 2024 17:21:58

Sarsanghachalak Dr Mohanji Bhagwat

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Sarsanghachalak on Sanatan Dharma)
"सर्व धर्मांचा जो एक धर्म आहे, जो शाश्वत आहे, तो सनातन हिंदू धर्म आहे. जगाचाही तोच धर्म आहे, मात्र जग त्याला विसरले. या चिरंतन व सनातन धर्मातील आचार्य ज्या सेवाधर्माचे पालन करतात, तो सेवा धर्म म्हणजेच मानवधर्म." असे गौरवोद्गार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॅा. मोहनजी भागवत यांनी काढले.

हिंदू आध्यात्मिक सेवा संस्थेच्या वतीने पुण्यातील शिक्षण प्रसारक मंडळीच्या महाविद्यालयाच्या मैदानात हिंदू सेवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचा शुभारंभ गुरुवार, दि. १९ डिसेंबर रोजी सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. येत्या २२ डिसेंबर पर्यंत हा महोत्सव सुरु राहणार आहे. महाराष्ट्रातील अनेक देवस्थाने, सामाजिक, धार्मिक संस्था, मठ मंदिरांच्या सेवाकार्याचा त्यात सहभाग आहे.

हे वाचलंत का? : सामान्यांना असामान्य घडवणारे संघटन म्हणजे 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघ' : डॉ. नीलम गोऱ्हे

उपस्थितांना संबोधत सरसंघचालक पुढे म्हणाले, "सेवा करताना प्रसिद्धी पासून दूर राहण्याचा आपला स्वभाव असतो. दिखाव्यासाठी सेवा न करता ती निरंतर करत राहणारे सेवेची कामना करतात. सेवेचा धर्म सांभाळताना अतिवादी न होता त्याचा मध्यम मार्ग आपण देशकाल परिस्थितीनुसार स्वीकारायला हवा. मानवधर्म हाच विश्वाचा धर्म असून तो सेवेतून प्रकट व्हायला हवा. आपण विश्वशांतीसाठी घोषणा देतो मात्र अल्पसंख्यांकांची इतरत्र काय परिस्थिती आहे हे लक्षात घेणे गरजेचे आहे. तीन हजार वर्षापेक्षा अधिक परंपरा असलेले शस्त्र, वाचन, इतिहास, स्वभाव आपले आहे. ते पाहणे आणि अंगीकारणे, पुढील पिढ्यांना त्यातून प्रेरणा देणे यासाठी असे हिंदू सेवा महोत्सवासारखे उपक्रम आहेत."


Sarsanghachalak and Govinddev Giriji Maharaj

पोट भरण्यासाठी आवश्यक ते केलेच पाहिजे पण गृहस्थाश्रमापलीकडे जे जे मिळाले आहे ते आपण सेवा रूपाने दुप्पट द्यायला हवे. जग आपले प्रतिपालक आहे, ती उपभोगाची वस्तू नाही. ही भावना असेल तर परिवार, समाज, गाव, देश, राष्ट्र यांची मुक्त सेवा करण्याची प्रेरणा आणि अनुकरण आपण करावे. यासाठी अशा महोत्सवातून सेवाव्रत घेऊन चालूया, असा संदेशही सरसंघचालकांनी यावेळी दिला.

कार्यक्रमादरम्यान व्यासपीठीवर अयोध्येतील श्रीराम मंदिराचे कोषाध्यक्ष महंत स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज, शिक्षण प्रसारक मंडळीचे अध्यक्ष ॲड. एस.के. जैन, उपाध्यक्ष श्रीकृष्ण चितळे, हिंदू सेवा महोत्सवाचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, ज्योतिषतज्ज्ञ लाभेश मुनीजी महाराज, इस्कॉनचे गौरंग दास प्रभू, हिंदू आध्यात्मिक सेवा संस्थेचे राष्ट्रीय संयोजक गुणवंत कोठारी आदि मान्यवर उपस्थित होते. कृष्णकुमार गोयल यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. सुनंदा राठी आणि संजय भोसले यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी मूक बधीर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विविध कलाकृती सादर केल्या.

सेवा ही पूजा...
भूमी, समाज, परंपरा यातून राष्ट्र बनते. पुण्याच्या भूमीची सेवा छ. शिवाजी महाराजांनी केली असून राजमाता जिजाऊ यांनी पुण्यभूमीत गणेशाची स्थापना केली. सर्व संस्कारांचे शिखर सेवा असून सेवा ही पूजा आहे. दानाचा अर्थ माझ्याजवळ जे आहे त्यातील दान हे शेअरिंग असून उपकार नाही. नव्या पिढीत भाव जागरणाचे काम या हिंदू सेवा महोत्सवातून होणार आहे.
- स्वामी गोविंददेव गिरिजी महाराज

हिंदू, जैन, बौद्ध, शीख सर्व एक आहेत
हिंदू सनातन धर्माअंतर्गत परोपकार, आचारविचार आणि साक्षात्कार हे तीन मुद्दे येतात. ते एकमेकांशी एकरूप झाले की आत्मसाक्षात्कारातून आपण त्यावर प्रभुत्व मिळवू शकतो. हिंदू, जैन, बौद्ध, शीख यातील कोणीच वेगळे नाही, सर्व एकच आहेत.
- गौरंग दास प्रभू, इस्कॉन


Powered By Sangraha 9.0