पुणे : सरहद, पुणे आणि अखिल भारतीय साहित्य महामंडळातर्फे दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या https://abmssdelhi.org या संकेतस्थळाचे (वेबसाईट) उद्घाटन माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते गुरुवार १९ डिसेंबर रोजी करण्यात आले. दिल्लीत सुमारे 70 वर्षांनंतर होत असलेल्या मराठी साहित्य संमेलनासाठी शुभेच्छा देऊन हे संमेलन अभूतपूर्व ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र साहित्य परिदषेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, डॉ. सतिश देसाई, ॲड. प्रताप परदेशी, शैलेश वाडेकर, अनुज नहार, संतोष देशपांडे, पाटील यांच्या कन्या ज्योती राठोड आदी उपस्थित होते.
संकेतस्थळाची वैशिष्ट्ये :
संकेतस्थळाची निर्मिती करताना त्याची रचना साधी-सोपी आणि आकर्षक करण्यात आली आहे. संमेलनाविषयी अद्ययावत माहिती, प्रतिनिधी नोंदणी, ग्रंथ दालनाची नोंदणी या संकेतस्थळाद्वारे करता येणार आहे. तसेच मराठी भाषा, महाराष्ट्र आणि दिल्लीचे संबंध यावर प्रकाशझोत टाकणारी छायाचित्रे, व्हिडिओ क्लिप्स, पॉडकास्ट, न्यूज क्लिप्स पाहण्याची सोय आहे. विश्वकोश या विशेष विभागातून मराठी साहित्य आणि साहित्यिकांविषयी माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. संकेतस्थळाच्या माध्यमातून जगभरातील कोट्यवधी मराठी लोकांपर्यंत या संमेलनाविषयीची माहिती पोहोचेल. संकेतस्थळाची निर्मिती संतोष देशपांडे यांच्या मीडियाक्युरा या संस्थेने केली असून मराठी बांधकाम व्यावसायिक संघटनेचे विशेष सहकार्य लाभले आहे.