‘मुंबई बंदर प्राधिकरण’, ‘द हेरिटेज प्रोजेक्ट’ आणि ‘मुंबई पोर्ट सस्टेनेबिलिटी फाऊंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने, मुंबई बंदराच्या मार्गदर्शित सहलीद्वारे भारताचा समृद्ध सागरी वारसा जाणून घेण्याची संधी मुंबईकरांसाठी नुकतीच खुली करण्यात आली होती. यानिमित्ताने जाणून घेऊया ‘मुंबई बंदरा’च्या समृद्ध सागरी वारशाविषयी काही रंजक माहिती...
सुमारे साडेसात हजार किमीचा समुद्रकिनारा लाभलेल्या आपल्या देशाकडे नेहमीच एक महान सागरी राष्ट्र म्हणून पाहिले जाते. इतिहासाची पाने चाळली असता, भारताचा सागरी मार्गाने जगातील अनेक देशांशी व्यापार होता. या व्यापाराबरोबरच धर्म, संस्कृती, भाषा आणि पाककृती यांचीही देवाणघेवाण होत होती. भारताच्या समृद्ध सागरी वारशाबद्दल बोलताना, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राष्ट्र संरक्षणार्थ नौदलाची उभारणी करणार्या दूरदृष्टीचे कौतुक करावे तितके कमीच. छत्रपती शिवाजी महाराजांना भारतीय नौदलाचे जनक म्हणून गौरवले जाते. कारण, त्यांनी आणि त्यांच्या मराठा नौदलाने स्वतःच्या पराक्रमावर युरोपियन शक्ती, पोर्तुगीज आणि ब्रिटिशांना सागरी सीमांवर रोखले, तर याच संदर्भात शिवाजी महाराजांचा वारसा पुढे नेणार्या सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या दूरदृष्टीलाही आपण आदरांजली वाहिली पाहिजे, आपल्या महासागरांचे रक्षण करण्यासाठी त्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले.
भारताची संस्कृती पाहिल्यास नागरी वस्त्यांचा विकास हा ग्रामीण भागात नदी किनारी आणि शहरी भागात बंदरांभोवती विस्तारणारा आहे. बंदरांच्या विकासानंतर मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी म्हणून उदयास आली. मुंबईच्या विकासात महत्त्वाचा घटक म्हणजे मुंबई बंदर! याच मुंबई बंदराची सफर आम्ही केली.
मुंबई बंदर आणि शहराचं नातं
मुंबई शहराच्या विकासात मुंबईतील बंदरांची भूमिका महत्त्वपूर्ण राहिलेली आहे. त्यापैकी मुंबई बंदराचा एक गौरवशाली इतिहास आहे. 1873 मध्ये स्थापन झालेल्या या बंदराने नुकतीच स्थापनेची 150 वर्षे पूर्ण केली आहेत. अरबी समुद्राच्या काठी वसलेले, मुंबई हे या सागराशी घट्ट नाळ जोडलेले शहर आहे. मुंबई बंदराचे बांधकाम हे एक मोठा उपक्रम होता. दलदलीच्या प्रदेशाचे त्या काळातील सर्वात मोठ्या जहाजांना सामावून घेणार्या विस्तीर्ण बंदरात रूपांतर झाले. भारताच्या सागरी व्यापाराच्या समृद्ध इतिहासात मुंबई बंदराचे महत्त्वाचे स्थान आहे. मुंबई बंदराने या शहराची आर्थिक केंद्र ही ओळख साकारण्यात आणि या शहराला गजबजलेल्या मेगासिटीत रूपांतर करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
मुंबई बंदराची स्थापना
‘बॉम्बे पोर्ट ट्रस्ट कायदा,1873’ अंतर्गत ‘बॉम्बे पोर्ट ट्रस्ट’ची स्थापना करण्यात आली. मुंबई बंदराच्या कारभारासाठी सध्याच्या वैधानिक स्वायत्त विश्वस्त मंडळाची स्थापना करण्यात आली. या विश्वस्त मंडळाची पहिली बैठक दि. 3 जुलै 1873 रोजी झाली. ‘मुंबई पोर्ट ट्रस्ट’ हे कोलकाता नंतरचे दुसरे सर्वात जुने मोठे पोर्ट ट्रस्ट आहे, ज्यात बंदराचे प्रशासन आणि व्यवस्थापन विविध बंदर वापरकर्त्यांचे प्रतिनिधी असलेल्या विश्वस्त मंडळाच्या अंतर्गत आणले गेले.
बंदराची उभारणी
1869 मध्ये सुएझ कालवा तयार झाल्यावर मुंबईच्या सागरी व्यापारात क्रांती झाली. त्याने आयात-निर्यात व्यापाराची संपूर्ण परिस्थिती पूर्व किनार्यावरून पश्चिमेकडे हलवली आणि मुंबई बंदर भारताचे प्रमुख प्रवेशद्वार बनले. 1875 मध्ये भारतात मुंबई येथे बांधण्यात आलेले पहिली गोदी (वेट डॉक) म्हणजे ससून डॉक होते आणि त्यानंतर 1880 आणि 1888 मध्ये अनुक्रमे प्रिन्सेस आणि व्हिक्टोरिया डॉक्स बांधण्यात आले. तथापि, इंदिरा डॉकमधील ऑफशोअर कंटेनर टर्मिनलच्या संबंधात कंटेनरसाठी तात्पुरते स्टॅकिंग यार्ड करण्यासाठी सल्लागार क्षेत्राचे रूपांतर करण्यासाठी प्रिन्सेस आणि व्हिक्टोरिया डॉक भरले गेले आहेत. ‘अलेक्झांड्रा डॉक’चे जानेवारी 1972 मध्ये ‘इंदिरा डॉक’ असे नामकरण करण्यात आले. मुंबईच्या गोदीपैकी सर्वात आधुनिक गोदी 1904-1914 मध्ये बांधण्यात आली. पेट्रोलियम उत्पादने आणि द्रव रसायने हाताळण्यासाठी, पिर पाव येथे 1923 मध्ये एक जेट्टी बांधण्यात आली. जवाहरद्वीप येथे तीन धक्क्यांसह आधुनिक तेल टर्मिनल 1952-1956 मध्ये बांधण्यात आले.
अभ्यागतांसाठी आकर्षण ठरणारी ‘इंदिरा गोदी’
या सहलीत पहिली भेट ही ड्राय डॉक याठिकाणी दिली. याठिकाणी तीन जहाजे एका रांगेत दुरुस्तीसाठी उभी होती. मुंबई बंदरावर ‘इंदिरा डॉक’ नावाची एक बंदिस्त ओली गोदी आहे, ज्याचे एकूण क्षेत्रफळ 24.04 हेक्टर आहे आणि सुमारे चार हजार मीटरचा समुद्रकिनारा आहे. ‘इंदिरा डॉक’मध्ये 228.6 मीटर लांब आणि 30.5 मीटर रुंद प्रवेशद्वार लॉक आहे, ज्यामुळे जहाजे भरतीच्या कोणत्याही स्थितीत डॉकमध्ये प्रवेश करू शकतात किंवा बाहेर जाऊ शकतात. बेसिनच्या आत 21 धक्के आणि बंदराच्या भिंतीलगत पाच धक्के आहेत, त्यांची खोली अनुक्रमे 9.14 मीटर आणि 7.5 मीटर आहे. विद्युत पंपांद्वारे पाणी उपसून बेसिनमधील बर्थची खोली 1.20 मीटरने वाढवता येते. ‘इंदिरा डॉक’च्या आत एक सुकी गोदी (ड्राय डॉक) आहे, ज्याचे नाव ‘ह्यूजेस ड्राय डॉक’ असून त्याची लांबी 304 मीटर आहे. याठिकाणी मुंबईत आलेल्या जहाजांची देखभाल-दुरुस्ती केली जाते. बंदराला भेट द्यायला येणार्या अभ्यागतांना या गोदीवर जहाज कसे आणले जाते, याची माहिती एका व्हिडीओ क्लिपच्या आधारे देण्यात अली.
दुतर्फा लागलेल्या इंपोर्टेड कार
‘इंदिरा डॉक’ सोडून आमची बस पुढे निघाली. या सहलीत मुंबई बंदराच्या कार्यपद्धतीची माहिती घेत असतानाच तुमचं मन वेधतात त्या रस्त्याच्या दुतर्फा नजर जाईल तिथपर्यंत लावण्यात आलेल्या इंपोर्टेड आकर्षक कार! सहलीची बस मुंबई बंदरात आत शिरत असताना सहज खिडकीच्या बाहेर नजर गेली आणि रंगबेरंगी डाव्या बाजूला ड्रायव्हिंग सीट असणार्या इंपोर्टेड कार दिसल्या. एका बाजूला नजर जाईल तेवढे पाणी आणि एका बाजूला नजर जाईल तिथपर्यंत या कार पार्क केलेल्या दिसतात. माहिती घेतली असता यातील काही कार भारताबाहेरून मागणी झालेल्या आणि भारत डिलिव्हरी केल्या जाणार्या कार होत्या, तर काही कार या भारताबाहेर निर्यात केल्या जाणार होत्या.
1944ची दुर्घटना आणि सोन्याचा पाऊस
इतका समृद्ध इतिहास असणारे हे बंदर, मात्र या बंदराने अनेक मोठ्या आपत्तींचाही सामना केला. त्यात 80 वर्षांपूर्वी घडलेली दुर्घटना ’बॉम्बे डॉक एक्स्प्लोशन्स’ म्हणून ओळखली जाते. याच पार्श्वभूमीवर 14 एप्रिलपासून सुरू होणारा पुढील एक आठवडा राष्ट्रीय स्तरावर ‘अग्निशमन सेवा सप्ताह’ म्हणून पाळला जातो.
दि. 14 एप्रिल 1944चा दिवस. प्राणघातक दारूगोळा वाहून नेणारे ‘एसएस फोर्ट स्टिकिन’ हे ब्रिटिश जहाज या स्फोटांसाठी जबाबदार होते. या जहाजावर पहिला स्फोट 4.06 वाजता झाला, त्यानंतर दुसरा मोठा स्फोट 4.41 वाजता झाला. स्फोटांची नोंद केवळ कुलाबा वेधशाळेतच नाही, तर देशाच्या इतर भागांतील सिस्मोग्राफद्वारेही नोंदवली गेली. सात हजार टनपेक्षा जास्त मालवाहू दारुगोळा, जहाजे आणि विमानांचे सुटे सामान घेऊन निघाले होते. याशिवाय त्यात सोन्याच्या बारही होत्या. जहाज कराचीमध्ये मार्गात थांबले आणि तिथे या जहाजात कापसाच्या गाठी, तेल, राळ, स्क्रॅप लोह आणि सल्फर भरले गेले. एकतर जळून जाईल किंवा उडेल अशा सर्वच गोष्टी हे जहाज वाहून घेऊन जात होते. 14 एप्रिलच्या सकाळी, जहाज अजूनही व्हिक्टोरिया डॉकवर उतरण्याच्या प्रतीक्षेत होते.
दुपारी 2च्या सुमारास जहाजातील कर्मचार्यांना आग लागल्याची सूचना देण्यात आली. हा स्फोट इतका भीषण होता की, या दोन्ही स्फोटांनी जहाजाचे अर्धे तुकडे झाले आणि 12 किलोमीटर दूरपर्यंतच्या घरांच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या. सोन्याचे बार हवेत उडाले, कोणाच्या घराच्या छपरातून, तर कोणाच्या भिंतींमध्ये हे सोन्याचे बार जाऊन पडले. मात्र, हे सोन्याचे बार कुलाबा आणि परिसरातील सर्वच नागरिकांनी मुंबई पोर्टला परत केले. ही आग आटोक्यात आणण्यासाठी तीन दिवस लागले. आग आटोक्यात आल्यावर पाच लाख टन मलबा हटवण्यासठी आणि गोदी पुन्हा पूर्ववत करण्यासाठी आठ हजार लोकांनी सात महिने अविरत काम केले. या घटनेतील अधिकृत मृतांची संख्या 740 होती. त्यापैकी 476 लष्करी कर्मचारी होते. 1,800 लोक जखमी झाले आणि 27 जहाजे बुडाली, अशी माहिती मिळते. अतुलनीय साहस आणि शौर्य दाखवत, या शूर अग्निशमन जवानांनी धगधगत्या ज्वाला आटोक्यात आणण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला. आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले, मात्र, या प्रयत्नात अग्निशमन दलातील 66 जवानांना बलिदान द्यावे लागले. त्यांच्या शौर्याचा गौरव करण्यासाठीच हा दिवस देशभरात ‘अग्निशमन शौर्य सप्ताह’ म्हणून पाळला जातो. या आगीत प्राण गमावलेल्या अग्निशमन दल, नौदल आणि मुंबई पोर्टच्या कर्मचार्यांचे एक स्मृतिस्थळ मुंबई पोर्ट परिसरात उभारण्यात आले आहे. या स्मृतींना उजाळा देत ही सहल पुढे प्रवासी टर्मिनलच्या दिशेने मार्गस्थ झाली.
क्षणभर विसावा घेणारी आकर्षक जहाज
अॅमस्टरडॅमहून आलेल्या जहाजावर उंचावर भारताचा तिरंगा या समुद्री हवेत शानमध्ये फडकत होता. पूर्णतः लाकडी बनावटीचे आणि पडद्यांच्या साहाय्याने चालणारे ते भव्य जहाज या मुंबई बंदरावर विसावा घेत होते. मुंबई पोर्टवर जगभरातून येणारी जहाजे क्षणभर विसावा घेण्यासाठी थांबतात. यातील अनेक प्रवासी जहाजे ही परदेशी पाहुण्यांना भारतात आणतात. अनेक जहाज भारतमार्गे इतर देशांच्या प्रवासासाठी निघालेली असतात. या सहलीदरम्यान अॅमस्टरडॅमहून जगाच्या सफरीवर निघालेले जहाज भेट द्यायला आलेल्या मुंबईकरांचे आकर्षण ठरले. काही आठवड्यांपूर्वी याचठिकाणी इटलीहून असेच एक लक्झरियस जहाज मुंबई बंदरावर थांबले होते. प्रवासी वाहतुकीसाठी निघालेली देखील अनेक जहाज मुंबई बंदरावरील टर्मिनलवर थांबे घेतात.
मुंबईचाच नव्हे तर भारताचा समृद्ध सागरी वारसा सांगणारे हे ठिकाण! मात्र, आज याठिकाणी अनेक इमारती जर्जर अवस्थेत असल्याचे दिसून येते. वर्षानुवर्षे अनेक आपत्ती, वादळे सोसलेल्या या इमारती आजही थोड्याफार पडझड अवस्थेत असल्यातरी त्या जीर्णोद्धारातून पुन्हा या बंदराचा सौंदर्य वाढवतील यात मुळीच शंका नाही. या दौर्यात कधीकाळी बंदरावर दूरवर वेळेचा अचूक ठोका देणारं क्लॉक टॉवर आणि त्याच्याच बरोबर खाली लावण्यात आलेली मोठी घंटा कधीकाळी या बंदराचे प्रवेशद्वार असेल. असा हा समृद्ध सागरी वारसा मुंबईच नाहीतर जगाला आकर्षित करणारा आहे, हे नक्की!