ढवळ्या-पवळ्या

19 Dec 2024 21:14:20

Bhaskar Jadhav - Nana Patole
 
ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला; वाण नाही, पण गुण लागला’ अशी स्थिती सध्या काँग्रेस आणि उबाठा गटात दिसते. विरोधी पक्षनेतेपदाची खुर्ची त्यास कारणीभूत. ही खुर्ची मिळवण्यासाठी विरोधातील एकाही पक्षाकडे संख्याबळ नसताना परस्पर दावेदारी सुरू आहे. बहुधा भाजपच्या औदार्य गुणांवर त्यांना ठाम विश्वास असावा. त्यामुळेच की काय, उबाठाचे भास्कर जाधव आणि काँग्रेसच्या नाना पटोलेंना विरोधी पक्षनेते पदाचे डोहाळे लागलेत. या पदासाठी आपणच किती सक्षम आहोत, हे दाखवण्याची स्पर्धा त्या दोघांमध्ये सुरू असल्याचे पदोपदी जाणवते.
 
ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला; वाण नाही, पण गुण लागला’ अशी स्थिती सध्या काँग्रेस आणि उबाठा गटात दिसते. विरोधी पक्षनेतेपदाची खुर्ची त्यास कारणीभूत. ही खुर्ची मिळवण्यासाठी विरोधातील एकाही पक्षाकडे संख्याबळ नसताना परस्पर दावेदारी सुरू आहे. बहुधा भाजपच्या औदार्य गुणांवर त्यांना ठाम विश्वास असावा. त्यामुळेच की काय, उबाठाचे भास्कर जाधव आणि काँग्रेसच्या नाना पटोलेंना विरोधी पक्षनेते पदाचे डोहाळे लागलेत. या पदासाठी आपणच किती सक्षम आहोत, हे दाखवण्याची स्पर्धा त्या दोघांमध्ये सुरू असल्याचे पदोपदी जाणवते. नागपुरात कडाक्याची थंडी असल्याने बहुतांश आमदार सभागृह सुरू होण्याआधी काही मिनिटे विधिमंडळात दाखल होतात. नाना पटोले आणि भास्कर जाधव मात्र त्याला अपवाद. अजित पवारांच्याही आधी ते विधानभवनात पोहोचतात. बरे, नाना तरी अंगात स्वेटर घालतात, पण भास्करराव गुहागरातून आणलेल्या सदरा पायजम्यावरच असतात. एकवेळ थंडीचा त्रास सहन करतील, पण नानांच्या आधी सभागृहात पोहोचतील, हे नक्की. थट्टेचा विषय सोडा, पण भास्कररावांची उजवी बाजू म्हणजे पक्षाच्या गटनेतेपदी त्यांची झालेली निवड. त्यामुळे सत्ताधार्‍यांच्या मनात का नसेना, त्यांना बोलायला अधिकचा वेळ द्यावाच लागतो. नानांचे तसे नाही. काँग्रेसने अद्याप ना गटनेता निवडलाय, ना मुख्य प्रतोद. त्यामुळे मर्यादा येतात. पण, तरी नाना बोलतातच. या कृतीने भास्करराव भलतेच नाराज होतात. कदाचित सत्ताधार्‍यांशी असलेले सलोख्याचे संबंध बघता, नानांनाच विरोधी पक्षनेते करतील की काय, अशी भीतीही भास्कररावांच्या मनात डोकावत असावी. त्यातून मग सुरू होते, ती नौटंकीबाज बतावणी. कोकणातील दशावतार्‍यांनाही जमणार नाही, अशा पद्धतीने हातवारे करून भास्कर जाधव पहिला अंक सुरू करतात. नियमावलीत नसलेल्या नियमांचे दाखले देऊन सत्ताधार्‍यांची कोंडी करण्याचा प्रयत्न करतात. पण, मुख्यमंत्री पदावर आणि विधानसभा अध्यक्षांच्या खुर्चीवर बसलेले दोघेही निष्णात कायदेपंडित असल्याचा विसर त्यांना पडतो आणि ते तोंडावर आपटतात. माजी विधानसभा अध्यक्ष राहिलेल्या पटोलेंचा आणि नियमावलीचा तसा फारसा संबंध नाहीच म्हणा. पण, या काळूबाळूच्या लढाईत सत्ताधारी आणि विरोधकांचाही ’टाईमपास’ होतो, हे निश्चिच!
 
तिरकी चाल
 
तळे राखील तो पाणी चाखील’ ही प्रचलित म्हण सध्याच्या राजकारणाला तंतोतंत लागू पडणारी. राज्याच्या विधानसभा निवडणुकीत भल्या भल्या सरदारांची संस्थाने खालसा झाल्यानंतर उरलेसुरले आपापली संस्थाने वाचवण्यासाठी धडपडत असल्याचे चित्र राज्यभर पाहायला मिळते. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे त्यापैकीच एक. अलीकडच्या काळात त्यांच्या चेहर्‍यावरचा रागरंग पूर्णतः बदललेला दिसतो. ’आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय’ अशी स्थिती पक्षात निर्माण झाल्यामुळे ते बहुधा अस्वस्थ असावेत. शरद पवारांचे चुलत नातू रोहित पवारांनी लोकसभा विजयाचे श्रेय जयंतरावांना घेऊ दिले नाही. कोणा एकामुळे झालेला हा विजय नसून, कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे फळ असल्याचा दावा त्यांनी केला. याउलट विधानसभेतील पराभवाचे खापर एकट्या जयंत पाटलांवर फोडण्यात आले. त्यामुळेच बहुधा ते ’डिस्टर्ब’ असावेत. की दुसरे काही?
 
मुंब्रेकर जितेंद्र आव्हाडांना विधिमंडळ गटनेता आणि नवख्या रोहित पाटीलला मुख्य प्रतोद केल्यामुळे तर ते नाराज नसावेत? कारण, इतकी वर्षे पवारांशी एकनिष्ठ राहिल्यानंतरही जयंतरावांना कायमच दुसर्‍या खुर्चीवर जागा मिळाली. अर्थात, पहिली खुर्ची आधी अजित पवार, नंतर सुप्रिया सुळे आणि आता जितेंद्र आव्हाडांसाठी राखून ठेवण्यात आली. विरोधी पक्षनेता होण्याच्या प्रबळ इच्छेलाही त्यांना मुरड घालावी लागली. पवारांनी आपल्यासाठी भाजपकडे शब्द टाकावा, असे मनोमन वाटत असतानाही ते बोलू शकले नाहीत आणि संख्याबळ पाहता पवारांनी स्वतःहून पुढाकार घेतला नाही. त्यामुळे डुबत्या नौकेत स्वार होऊन पुढची पाच वर्षे जीव वाचवण्यासाठी धडपड करावी, की 237 आमदारांच्या महाकाय जहाजात प्रवेश करावा, असा पेच त्यांच्यासमोर दिसतो.
म्हणूनच की काय, हिवाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून सातत्याने विरोधकांच्या आंदोलनाला गैरहजेरी, मविआचे आमदार पायर्‍यांवर निदर्शने करीत असताना, त्यांच्याकडे दुर्लक्ष करून थेट विधिमंडळात प्रवेश, असे संशयास्पद प्रकार घडू लागले असावेत. त्यामुळे बदलत्या वार्‍यांची दिशा पाहता, जयंतराव पुढच्या काळात मलमली ’कोट’ अंगावर चढवतील, अशीच दाट शक्यता दिसते!
 
Powered By Sangraha 9.0