नव्या वर्षात चिनाब रेल्वे पुलावरून धावणार वंदे भारत

उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे लिंक जानेवारी २०२५मध्ये कार्यान्वित होणार

    18-Dec-2024
Total Views |

chinab railway bridge



श्रीनगर, दि.१८ : प्रतिनिधी 
उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे लिंक (USBRL) प्रकल्पाचा अंतिम जोडणारा भाग असलेल्या रियासी-बनिहाल रेल्वे ट्रॅकच्या अंतिम पाहणीला सुरुवात झाली आहे. रेल्वे सुरक्षा आयुक्त यांनी सोमवार, दि. १६ डिसेंबर पासून या रेल्वे लाईनवर अंतिम पाहणीला सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे जानेवारी २०२५पर्यंत सुरू होणे अपेक्षित असताना ही तपासणी ट्रॅक कार्यान्वित करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. या मार्गवर वंदे भारत ट्रेन सेवा चालविली जाणार आहे.

सीएआरएस दिनेश चंद देसवाल यांच्या नेतृत्वाखाली दोन दिवसीय तपासणी ही तांत्रिक सुरक्षा मंजुरी प्रक्रियेचा एक भाग आहे. देसवाल हे रेल्वे सुरक्षा तज्ञांच्या पथकासह प्रकल्पाच्या पायाभूत सुविधांची कसून तपासणी करत आहेत. रियासी-बनिहाल ट्रॅकची अंतिम तपासणी जानेवारी २०२५च्या पहिल्या आठवड्यात होणार आहे, ज्यामुळे युएसबीआरएल प्रकल्प पूर्णपणे कार्यान्वित होण्याचा मार्ग मोकळा होईल. या वर्षी जूनमध्ये कटरा-बनिहाल या मार्गावर अंतिम चाचणी घेण्यात आली, सांगलदान आणि रियासी रेल्वे स्थानकांदरम्यान एक ट्रेन यशस्वीरित्या धावली. मंगळवार, दि.१७ आणि १८ या दोन दिवसीय तपासणीत कोडी-कटरा लिंकवर लक्ष केंद्रित केले जाईल, ज्यात अंजी खाडवरील आयकॉनिक केबल ब्रिजचा समावेश आहे.

लॉजिस्टिक मध्ये क्रांती घडवून आणण्यास वचनबद्ध

या प्रकल्पातील सर्वात उल्लेखनीय वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे चिनाब नदीवरील रेल्वे पूल, जो पॅरिसमधील आयफेल टॉवरपेक्षा उंच ३५९ मीटरचा जगातील सर्वात उंच रेल्वे पूल आहे. १,४८६ कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या या पुलासाठी ३०,००० टन स्टीलचा वापर करण्यात आला, जो अभियांत्रिकी उत्कृष्टतेचा पराक्रम दर्शवितो. या प्रकल्पामुळे काश्मीर खोऱ्याच्या अर्थव्यवस्थेला, विशेषतः फलोत्पादन क्षेत्राला लक्षणीय चालना मिळेल अशी अपेक्षा आहे. सफरचंद आणि इतर उत्पादनांसाठी देशभरातील बाजारपेठांमध्ये परवडणारी वाहतूक प्रदान करून, प्रकल्प या प्रदेशासाठी लॉजिस्टिकमध्ये क्रांती घडवून आणण्याचे वचन देतो.

उधमपूर ते कटरा २५ किलोमीटरचे अंतर यशस्वीरित्या पूर्ण

हा प्रकल्प कार्यान्वित झाल्यावर वंदे भारत ट्रेन सेवा दिल्ली या राजधानीला श्रीनगरशी जोडेल, यामुळे प्रवासाचा वेळ अंदाजे १२ तासांपर्यंत कमी होईल. २७२ किमी लांबीच्या उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे लिंकचे उद्दिष्ट काश्मीर खोऱ्याला ब्रॉड-गेज रेल्वे मार्गाने उर्वरित देशाशी जोडण्याचे आहे. काश्मीरला अखंड आणि त्रासमुक्त कनेक्टिव्हिटी प्रदान करण्यासाठी या प्रकल्पाचे महत्त्व लक्षात घेऊन, २००२मध्ये तो "राष्ट्रीय प्रकल्प" म्हणून घोषित करण्यात आला. या रेल्वे लिंक प्रकल्पाला उधमपूर-कटरा, कटरा-बनिहाल, बनिहाल-काझीगुंड आणि काझीगुंड-बारामुल्ला या चार विभागांमध्ये विभागले गेले आहे. पहिला टप्पा, उधमपूर ते कटरा हे २५ किलोमीटरचे अंतर यशस्वीरित्या पूर्ण झाले आणि हा मार्ग जुलै २०१४ मध्ये कार्यान्वित झाला.