गेट वे ऑफ इंडिया बोट दुर्घटनेत १३ जणांना जलसमाधी

18 Dec 2024 22:37:03

boat


मुंबई, दि.१८ : प्रतिनिधी 
मुंबईत गेट ऑफ इंडियाजवळच्या समुद्रात नौदलाच्या स्पीड बोटीची प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी फेरीला धडक बसल्याने मोठा अपघात झाला. या धडकेत प्रवासी बोट समुद्रात बुडाल्याने १३ जणांना जलसमाधी मिळाली आहे. या घटनेत १०९ जणांना वाचवण्यात आले आहे. सात ते आठ प्रवाशी अजून बेपत्ता आहे. नौदलाच्या १४ हेलिकॉप्टरच्या माध्यमातून बचावकार्य सुरु आहे. या घटनेत प्रवासी क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांना घेऊन निघालेल्या बोटीच्या मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकारने पाच लाखांची मदत जाहीर केली आहे. या घटनेची चौकशी मुंबई पोलीस आणि नौदल करणार आहे.

दरम्यान, मुंबईत गेट ऑफ इंडिया पाहण्यासाठी रोज हजारो पर्यटक येत असतात. त्यातील काही पर्यटक गेट ऑफ इंडिया पहिल्यानंतर एलिफंटा येथील गुफा पाहण्यासाठी जात असतात. एलिफंटाला जाण्यासाठी पर्यटकांना बोटीने प्रवास करावा लागतो. बुधवारी दुपारी पर्यटकांनी भरलेल्या दोन बोटी एलिफंटाच्या दिशेने निघाल्या होत्या. त्यापैकी एका बोटीला नौदलाच्या स्पीड बोटीने जोरदार टक्कर दिली. त्यानंतर बोट उलटली. उलटलेल्या बोटीचे नाव 'नीलकमल' असे आहे. या बोटीमध्ये ११० प्रवासी होते. उरण, कारंजा परिसरात बोट उलटल्याची माहिती पोलिसांनी दिली. माहिती मिळताच, नेव्ही, जेएनपीटी, कोस्टगार्ड, पोलिसांच्या आणि स्थानिक माछीमारांच्या बोटीच्या साहाय्याने बचावकार्य सुरू करण्यात आले. दुर्घटनेची माहिती मिळताच या परिसरातील इतर बोटीही घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी बचावकार्य सुरु केले.

स्वातंत्र्यपूर्व काळातील बोट दुर्घटनेच्या आठवणी...

मुंबईहून रेवसकडे जाण्यास निघालेली 'रामदास' बोट १७ जुलै १९४७ रोजी मुंबई बंदरापासून अवघ्या नऊ मैलांवर असलेल्या 'काशा'च्या खडकाजवळ सोसाट्याच्या वाऱ्यामुळे व प्रचंड लाटांच्या तडाख्यामुळे पलटी होऊन समुद्रात बुडाली. या दुर्घनेत या बोटीने प्रवास करणारे सहा ते सातशे प्रवाशी समुद्रात बुडून मरण पावले होते. या दुर्घटनेच्या २० वर्षे आधी ११ नोव्हेंबर १९२७ रोजी एस.एस.जयंती ही बोट जंजिरा येथे बुडाली आणि एस.एस. तुकाराम नावाच्या दोन प्रवासी बोटी बुडाल्या होत्या.

नौदलाने दिली माहिती

१८ डिसेंबर २०२४ रोजी सुमारे दुपारी चार वाजता नौदलाच्या बोटीची इंजिन चाचणी करण्यात येत होती. त्यावेळी नौदलाच्या बोटीचे नियंत्रण सुटले आणि नीलकमल या प्रवासी बोटीला ती बोट धडकली. तटरक्षक दल आणि पोलिसांच्या समन्वयाने नौदलाने तातडीने शोध आणि बचाव कार्य सुरू केले. चार नौदल हेलिकॉप्टर, ११ नौदल क्राफ्ट, एक तटरक्षक नौका आणि तीन सागरी पोलिस नौका बचावकार्य केले.

कोणत्या रुग्णालयात किती रुग्ण

जेएनपीटी हॉस्पिटल - ५६

नेव्ही डॉकयार्ड हॉस्पिटल - २१

अश्विनी हॉस्पिटल - १

सेंट जॉर्ज हॉस्पिटल - ९

करंजे हॉस्पिटल - १२

एन डी के रुग्णालय, मोरा - १०
Powered By Sangraha 9.0