मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (VHP Dantakumbh in Mahakumbh) उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथे जानेवारी महिन्यात महाकुंभ आयोजित करण्यात आला आहे. देश-विदेशातून मोठ्या संख्येने भाविक याठिकाणी उपस्थित राहणार आहेत. विश्व हिंदू परिषद अशा महाकुंभांमध्ये निरनिराळे उपक्रम राबवत असते. यंदा होणाऱ्या महाकुंभामध्ये त्यांनी दंतकुंभाचे आयोजन केले आहे. विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय संघटन महामंत्री मिलिंद परांडे यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली.
ते म्हणाले, महाकुंभदरम्यान विहिंपची मार्गदर्शक मंडळ बैठक, संत संमेलन आणि अखिल भारतीय बैठकीसोबतच इतर अनेक कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात येणार आहे. जानेवारी महिन्यात होणाऱ्या महाकुंभात पहिल्यांदाच दंतकुंभाचे आयोजन करण्यात येत आहे. दंत कुंभमध्ये भाविकांवर मोफत दंत उपचार करण्यात येणार असून त्यांना दातांच्या आजारांबाबतही प्रबोधन करण्यात येणार आहे. देशातील सर्व नामवंत दंतवैद्य भक्तांना मोफत दंत उपचार देणार आहेत. त्यावेळी त्यांना आवश्यक औषधे आणि समुपदेशन दिले जाईल आणि दातांच्या आजारांपासून बचाव आणि उपचारांबाबतही त्यांना जागरूक केले जाईल. हा दंत कुंभ १३ जानेवारी म्हणजेच महाकुंभाच्या पहिल्या दिवसापासून सुरू होऊन तो २८ फेब्रुवारीपर्यंत चालेल.