‘सेवा’भावी सर्पमित्र

18 Dec 2024 22:54:03

 सौरभ सुधीर मुळ्ये
 
सरपटणारे प्राणी तसेच वन्यजीवांच्या सुरक्षेकरिता ‘सेवा ट्रस्ट’च्या माध्यमातून कार्यरत डोंबिवलीच्या सौरभ सुधीर मुळ्ये यांच्याविषयी...
 
अलीकडे मानवी वस्तीत साप अनेकदा आढळून येतात. कारण, वाढत्या काँक्रिटीकरणांमुळे सापांना त्यांचा नैसर्गिक अधिवास सोडून बदलत्या परिस्थितीशी जुळवून घ्यावे लागत आहे. उंदीर, घुशींचा वाढता वावर यामुळे सहज अन्न मिळण्याच्या उद्देशाने साप मानवी वस्तीत शिरू पाहतात. अशा वेळी सापांबद्दल असलेले गैरसमज आणि अंधश्रद्धांमुळे मग त्यांची हत्या होते. हे कुठेतरी थांबावे, यासाठी डोंबिवलीच्या सौरभ सुधीर मुळ्ये यांनी पुढाकार घेत सरपटणारे प्राणी तसेच वन्यजीवांच्या सुरक्षेकरिता महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. ’सेवा ट्रस्ट’ नावाची संस्था सुरू करून घरदार व नोकरी सांभाळून ते वन्यजीवांच्या संरक्षणासाठी सन 2008 सालापासून कार्य करत आहेत.
 
दि. 23 नोव्हेंबर 1989 रोजी डोंबिवली येथे सौरभ यांचा जन्म झाला. टिळकनगर विद्यामंदिर शाळेत त्यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण झाले. त्यानंतर रॉयल इंटरनॅशनल महाविद्यालयातून त्यांनी अकरावी व बारावीचे शिक्षण पूर्ण केले. पदवीचे शिक्षण मॉडल कॉलेजमधून घेतले. पुढे पुणे विद्यापीठातून ‘टॅक्सेशन अ‍ॅण्ड अकाऊंट्स’मध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर एका खासगी इन्स्टिट्यूटमधून ‘इम्पोर्ट-एक्सपोर्ट’शी संबंधित डिप्लोमा केला. सोबतच ‘चेंबर ऑफ कॉमर्स’ची परीक्षाही त्यांनी दिली. सध्या ते विक्रोळीच्या ‘एटीसी टायर्स प्रायवेट लिमिटेड ग्रुप ऑफ योकोहामा ऑफ-हायवे टायर्स’ या कंपनीत ‘असिस्टंट मॅनेजर’ म्हणून कार्यरत आहेत.
 
घरी आईवडील, बायको, दोन वर्षांचा मुलगा, मोठा भाऊ, वहिनी, पुतण्या असा परिवार आहे. आईवडील गावाला (कोकणात) येऊन-जाऊन असतात. सौरभ यांना शाळेत असल्यापासून प्राणी-पक्ष्यांची आवड. पांढरे उंदीर, गिनिपीगसारख्या ज्या प्राण्यांना घरात पाळण्याची परवानगी आहे, अशांना त्यांनी काही महिने घरीदेखील आणले. परंतु, घरात कोणाला प्राण्यांची फारशी आवड नसल्याने त्यांना फार काळ घरात ठेवता आले नाही. असे असतानाही त्यांनी आपली प्राण्यांविषयीची आवड कधी सोडली नाही.
 
महाविद्यालयीन वयात एके ठिकाणी कॅम्पिंग करताना तेथील वरिष्ठांसोबत राहून त्यांना हळूहळू अंदाज येत गेला की, सरपटणारे सर्वच प्राणी धोकादायक नसून आपण त्यांना वाचवू शकतो. तेव्हाच त्यांनी सर्पमित्र होऊन वन्यजीवांचे रक्षण करण्याचे ठरवले. कॅम्पिंगसाठी, ट्रेकिंगसाठी काही ग्रुपसोबत असताना डोंबिवलीतील काही स्थानिक सर्पमित्रांशी त्यांचा परिचय झाला. त्यांच्या सहवासात राहून सौरभ हळूहळू साप ओळखायला शिकले. सर्पमित्र म्हणून अधिक चांगले काम कशाप्रकारे करता येईल, याबाबत संपर्कात आलेल्या मनीष पिंपळे, वैभव कुलकर्णी यांसारख्या काही वरिष्ठ मंडळींनी त्यांना कायम मार्गदर्शन केले. त्यानंतर वनविभाग प्रा. कल्याण आणि डोंबिवलीतील अग्मिशमन दल यांच्या संयुक्त विद्यमाने काही उपक्रम डोंबिवलीत राबवण्यास सुरुवात झाली.
 
पाळीव आणि भटक्या प्राण्यांसाठी काम करण्यार्‍या बर्‍याच संस्था आहेत. सौरभ यांनी खास वन्यजीवांसाठी काम करणारी संस्था स्थापन करण्याचा 2018 सालादरम्यान विचार केला. फिल्डवर सापांच्या रेस्क्यूकरिता जाताना अशी काही मुले संपर्कात आली, ज्यांना खरेच या क्षेत्रात काम करायचे होते, परंतु त्यांना योग्य दिशा मिळत नव्हती. मग अशा मुलांना जोडून त्यांना एकत्र करून त्यांना प्रशिक्षण देण्यात आले. त्यानंतर त्यांनी स्वतःची संस्था सुरू करायचे पक्के केले. ’सेवा ट्रस्ट’ असे संस्थेचे नाव निश्चित केले. सध्या संस्थेत 25 सक्रिय कार्यकर्ते आहेत.
 
आज अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात औद्योगिकीकरण तसेच शहरीकरण होत आहे. वाढत्या शहरीकरणामुळे वन्यजीव मिळेल त्या ठिकाणी वास्तव्य करत आहेत. अशा परिस्थितीत या प्राण्यांनीसुद्धा मनुष्याच्या विचारसरणीप्रमाणे स्वतःला जुळवून घेतले आहे. त्यामुळे ते मानवी वस्तीच्या जवळ येऊ लागले आहेत. सापांबद्दल असलेल्या अंधश्रद्धा आणि गैरसमजांमुळे बांधकाम स्थळी मजूर त्यांना मारण्याचा प्रयत्न करतात. या मजुरांमध्ये वन्यजीवांबद्दल जनजागृती करण्याचे काम ‘सेवा ट्रस्ट’ आज करीत आहे. पीपीटीद्वारे किंवा छायाचित्रे माध्यमातून जनजागृती तसेच सर्पदंश झाल्यास काय करावे, याबाबत माहिती दिली जात आहे. तांत्रिक-मांत्रिकांकडे न जाता, डॉक्टरांचा सल्ला घेणे कितपत योग्य आहे, हे त्यांना मग पटवून दिले जाते.
 
‘सेवा ट्रस्ट’मध्ये असेही काही कार्यकर्ते आहेत, जे स्वतः सर्पमित्र आहेतच, परंतु सर्पदंश झाल्याने रुग्णालयामध्ये भरती असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना मानसिक आधार व आवश्यक ती मदत देण्याचे काम करत आहेत. ही संस्था खास करून नागपंचमी, वन्यजीव सप्ताहाच्या निमित्ताने त्यादिवशी जनजागृतीपर विविध उपक्रम राबवत असते. त्यालाही उत्तम प्रतिसाद कायम मिळत आला आहे. बोरिवलीच्या ‘संजय गांधी राष्ट्रीय उद्याना’त माजी प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये यांच्या हस्ते वन्यजीवांसाठी काम करणार्‍या संस्थांना गौरविण्यात आले होते. त्यापैकी ‘सेवा ट्रस्ट’ ही एक संस्था होती. या सन्मानामुळे संस्थेतील कार्यकर्त्यांना विशेष प्रोत्साहन मिळाल्याचे सौरभ सांगतात. सौरभ मुळ्ये यांच्या पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’ परिवारातर्फे अनेक शुभेच्छा!
Powered By Sangraha 9.0