महामेट्रो आणि आशियाई विकास बँक यांच्यात सामंजस्य करार

18 Dec 2024 11:51:58

adb bank meeting


नागपूर, दि. १८ : प्रतिनिधी 
नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याला चालना देण्यासाठी आशियाई विकास बँकेकडून १५२७ कोटी रुपयांचे (२०० मिलियन डॉलर) अर्थसहाय्य मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत विधानभवनातील मंत्रिमंडळ सभागृहात यासंदर्भात मंगळवार, दि.१७ रोजी हा सामंजस्य करार करण्यात आला. या प्रकल्पामुळे नागपूर शहरासह परिसराच्या विकासाला आणखी गती मिळणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर आणि आशियाई विकास बँकेच्या संचालक मिओ ओका यांनी अर्थसहाय्याच्या करारावर सह्या केल्या. नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाच्या टप्पा-२ साठी आशियाई विकास बँक (ADB) आणि युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँक (EIB) यांच्याकडून एकूण ३५८६ कोटी रुपयांचा वित्तपुरवठा करण्यात येणार आहे. त्यापैकी १५२७ कोटी रुपये आशियाई विकास बँकेकडून मिळणार असून त्यासंदर्भातील करार आज करण्यात आला. महामेट्रोला हा वित्तपुरवठा जपानी येन या चलनामध्ये मिळणार आहे. त्यामुळे कर्जावर तुलनेने कमी व्याज द्यावे लागणार आहे. महा मेट्रोला या कर्जाची रक्कम केंद्रीय गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाच्या (MoHUA) माध्यमातून उपलब्ध केली जाणार आहे.

नागपूर मेट्रो रेल प्रकल्प टप्पा-२ हा खापरी ते एमआयडीसी इएसआर दरम्यान १८.५ किलोमीटर, ऑटोमोटिव्ह स्क्वेअर ते कन्हान नदी दरम्यान १३ किलोमीटर, प्रजापती नगर ते ट्रान्सपोर्टनगर दरम्यान ५.६ किलोमीटर आणि लोकमान्यनगर ते हिंगणा दरम्यान ६.७ किलोमीटर असा एकूण ४३.८ किलोमीटरचा असणार आहे. या मेट्रो प्रकल्पाचा लाभ नागपूर परिसरातील १० लाख रहिवाशांना होणार आहे. यावेळी मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, मित्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी, मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव आश्विनी भिडे, सचिव श्रीकर परदेशी, विविध विभागांचे सचिव, आशियाई विकास बँकेचे विविध विषयतज्ज्ञ यांच्यासह महामेट्रोचे संचालक (एसपी) अनिलकुमार कोकाटे, संचालक (वित्त) हरेंद्र पांडे आदी उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0