बीकेसी संकुल -वांद्रे वसाहत मेट्रो स्थानकावर बेस्ट बससेवा

मंगळवारपासून वातानुकूलित बस सेवा सुरू

    18-Dec-2024
Total Views |

best

मुंबई, दि. १८ : प्रतिनिधी 
मुंबई मेट्रो ३ ‘कुलाबा-वांद्रे-सीप्झ’ या मार्गिकेवरील पहिल्या टप्प्यातील आरे-बीकेसीदरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी बेस्टने वांद्रे पूर्व रेल्वे स्थानक ते वांद्रे वसाहत मेट्रो स्थानकांदरम्यान वातानुकूलित बस सेवा सुरू केली आहे. भूमिगत मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा मेट्रो स्थानक ते इच्छितस्थळ प्रवास सुलभ करण्यासाठी मुंबई मेट्रो रेल काॅर्पोरेशन (एमएमआरसी) आणि बेस्ट प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत.
त्यानुसार, सुरुवातीला जेव्हीएलआर मेट्रो स्थानकावर बेस्टचे थांबे दिल्यानंतर आता बेस्टने वांद्रे पूर्व रेल्वे स्थानक ते वांद्रे वसाहत मेट्रो स्थानकांदरम्यान वातानुकूलित बस सेवा सुरू केली आहे. मंगळवार, दि.१७ रोजी बस क्रमांक ए-३१४ ची बस सेवा सुरू करण्यात आली आहे. आरे-बीकेसी भुयारी मेट्रो सेवा सुरू होऊन दोन महिने पूर्ण झाले. अनेक स्थानकांपासून बेस्ट सेवा सुरु करण्यात यावी यासाठी बेस्ट प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू असून या पाठपुराव्याला यश येत आहे. काही दिवसांपूर्वीच जेव्हीएलआर मेट्रो स्थानकाबाहेर बेस्ट बस क्रमांक ३०७, ४२५, ४२८, ४१६, ५२२ सह अन्य काही बस सेवांसाठी थांबे देऊन प्रवाशांना दिलासा देण्यात आला आहे. तर आता मंगळवार, दि.१७ पासून वांद्रे पूर्व रेल्वे स्थानक ते वांद्रे वसाहत मेट्रो स्थानक दरम्यान वातानुकूलित बस सेवा सुरू करण्यात आली आहे.
आणिक आगारातील बेस्ट बस क्रमांक ए-३१४ वातानुकूलित बस सकाळी ७.३० ते रात्री ८ या वेळेत आठवड्याचे सातही दिवस धावणार आहे. वातानुकूलित मिडी प्रकाराची ही बस असणार असून वांद्रे पूर्व रेल्वे स्थानक, अनंत काणेकर मार्ग, भास्कर न्यायालय, सर अलियावर जंग महामार्ग, कलानगर, खान अब्दुल गफार खान मार्ग, भारत नगर जंक्शन, इंडियन ऑईल, बीकेसी कनेक्टर जंक्शन, स्वावलंबन भवन, जिओ गार्डनर, मुंबई क्रिकेट असोसिएशन, सीए इन्स्टिट्यूट, कौटील्य भवन, डायमंड मार्केट , खान अब्दुल गफार खान, हिंदुस्थान पेट्रोलियम अधिकारी वसाहत, वाल्मिकी नगर, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर नगर आणि वांद्रे वसाहत मेट्रो स्थानक असा या बसचा मार्ग असणार आहे.
-----
या बसमार्गची वैशिष्ट्ये

१. बसगाड्यांची संख्या व प्रकार :२-२-२ (वातानुकूलित मिडी)

२. बस आगार
: आणिक आगार

३. प्रस्थानांतर
: ३०, ४० मिनिटे

४. प्रवासकाळ
: २८, ३८ मिनिटे

५. प्रस्थानस्थान :
             पहिली बस (वेळ)      शेवटची बस (वेळ)

(अ) वांद्रे (पूर्व) बसस्थानक:  सकाळी ७.३०               रात्री ७.२५

(ब) उत्तर भारतीय संघ :           सकाळी ८.००              रात्री ८.०५

६. बसमार्गाची लांबी
: ६.५ कि. मी.