मुंबई विद्यापीठाच्या अधिसभेवर आमदार निरंजन डावखरे यांची नियुक्ती

17 Dec 2024 16:12:21
Niranjan Davkhare

नागपूर : मुंबई विद्यापीठाच्या ( Mumbai University ) अधिसभेवर (सिनेट) भाजपचे आमदार निरंजन वसंत डावखरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र विधान परिषदेचे प्रतिनिधी म्हणून आमदार डावखरे यांना नामनिर्देशित करण्यात आले आहे.

विधिमंडळातील तरुण चेहरा म्हणून आमदार निरंजन डावखरे यांनी स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. कोकण पदवीधर मतदारसंघातून त्यांची २०१२ मध्ये पहिल्यांदा विधान परिषदेवर निवड झाली होती. त्यानंतर त्यांनी विधान परिषद निवडणुकीत हॅट्रिक नोंदविली. गेल्या १२ वर्षांच्या काळात त्यांनी विधान परिषदेत शैक्षणिक, सामाजिक आणि नागरी समस्यांकडे सातत्याने लक्ष वेधले. तसेच ते सोडविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. राज्यातील शिक्षकांचे प्रश्नही त्यांनी हिरीरीने मांडले. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समस्या मांडल्या असून, `एमपीएससी'साठी बेलापूर येथे स्वतंत्र मुख्यालय मंजूर करुन घेतले. कोकणातील विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण मिळावे, यासाठी त्यांनी सर्व शाळा डिजिटल करण्याचा ध्यास घेतला आहे. त्यानुसार आतापर्यंत कोकणातील शेकडो शाळांना संगणकासह विविध साहित्यपुरवठा करण्यात आला.

मुंबई विद्यापीठाच्या कक्षेत कोकणातील पाच जिल्ह्यातील महाविद्यालये आहेत. त्याचबरोबर काही शहरात विद्यापीठाची उपकेंद्रे आहेत. मुंबई विद्यापीठ प्रशासन आणि महाविद्यालयातील समन्वय, तसेच उपकेंद्रात नवे अभ्यासक्रम आणि प्रशासकीय सुधारणा आदी करण्यामध्ये आमदार निरंजन डावखरे यांची भूमिका महत्वपूर्ण ठरणार आहे.

Powered By Sangraha 9.0