मानसिक तणावावर ‘संगीत’मय उपाय

17 Dec 2024 22:04:10
mamata tayade


मानसिक ताणतणाव आटोक्यात आणण्यासाठी ‘अमोक्सा’ हे अनोखे म्युझिक अ‍ॅप’ विकसित करणार्‍या ममता तायडे यांच्याविषयी...
 
करोना काळानंतर खरंच आयुष्यातील काही वर्षे किती वेगाने निघून गेली, याचा अंदाज कुणालाच आला नाही. ही अतिशय कटू मात्र सत्य परिस्थिती. टाळेबंदीमुळे लोकांच्या मानसिकतेवर खोलवर परिणाम झाला. मानसिक तणावही वाढत गेला. नानाविध आजारांना आमंत्रण मिळाले. एकवेळ शारीरिक आजारांवर औषध असते, पण मानसिक तणाव कमी करण्यासाठी कुठले औषध असते का? या प्रश्नाचे अगदी वेगळ्याच मार्गाने उत्तर ममता तायडे यांनी शोधले आहे.

ममता विष्णू तायडे यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण अकोल्यातील एका खेडेगावात झाले. त्यानंतर पुढील महाविद्यालयीन शिक्षणासाठी ममता यांनी नागपुरात पाऊल ठेवले आणि तेथून ‘इव्हेंट मॅनेजमेंट’ या क्षेत्रात त्यांनी डिप्लोमा पूर्ण केला. याच क्षेत्रात पुढे 13 वर्षे नोकरी केल्यानंतर आलेल्या स्वानुभवातून ममता यांनी एक नवा प्रयोग करण्याचा विचार केला. विशेषत: कोरोना काळात लोकांच्या मानसिकतेवर झालेला परिणाम आणि त्यानंतर त्यांच्या स्वभाव आणि शारीरिकतेवर झालेले परिणाम, याविषयी गांभीर्याने विचार करत उपाय करावा, या विचारांतून ममता यांनी ‘स्त्रीसूत्रम मीडिया प्रायव्हेट लिमिटेड’ या स्वत:च्या कंपनीअंतर्गत ‘अमोक्सा म्युझिक’ हे अ‍ॅप विकसित केले. सामान्यपणे कुठलीही व्यक्ती ताण कमी करण्यासाठी वेगवेगळे उपाय अंगीकारते. पण, सर्वांत महत्त्वाची गोष्ट जी प्रत्येक मनुष्याला ताणतणाव कमी करण्यासाठी मदत करते, ती म्हणजे संगीत. कोणतीही कला ही आनंद आणि उत्साह प्रदान करणारी. त्यातही आपल्या आवडीचे संगीत जर का ऐकण्याची संधी मिळाली, तर नव्या जोमाने काम करण्याची ऊर्जा प्राप्त होते. ममता यांनी याच मानसिकतेवर अधिक संशोधन करुन ‘अमोक्सा’ या अ‍ॅपची निर्मिती केली.
 
ममता यांच्या आई पंचफुला किसन कावणे या ‘स्त्रीसूत्रम मीडिया प्रायव्हेट लिमिटेड’ कंपनीच्या संस्थापक असून, ममता तायडे या मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. मुळात ‘अमोक्सा’ या म्युझिक अ‍ॅपची संकल्पना ममता यांना सुचण्याचे प्रमुख कारण म्हणजे त्यांच्या मातोश्री. त्यांच्या आईंना बर्‍याच वर्षांपूर्वी कर्करोगाचे निदान झाले. त्यावर वैद्यकीय उपचार सुरु असताना त्यांच्या मानसिकतेत, स्वभावात फार बदल झाले होते. त्यावेळी संगीताची एक मशीन असती आणि ते ऐकून मनाला शांती मिळाली असती, असे वाक्य त्यांच्या आई नकळत बोलून गेल्या. मात्र, ममता यांनी त्याचा सखोल अभ्यास करुन ‘अमोक्सा’ हे म्युझिक अ‍ॅप तयार केले. पुण्यातील ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ रिसर्च पार्क फाऊंडेशन’ यांच्यासोबत जोडले जात विविध वैद्यकीय रुग्णालयांत या अ‍ॅपचा परिणाम लोकांवर कसा होतो, याचे सर्वेक्षण ममता यांनी केले. त्यानंतर मिळालेला सकारात्मक प्रतिसाद रुग्णांच्या सुधारलेल्या तब्येतीवरुन दिसून येत होता. त्यामुळे गंभीर शारीरिक आणि मानसिक आजारातून बरे होण्यासाठी किंवा मानसिक स्थैर्यासाठी संगीत आपल्याला मदत करु शकते आणि त्यातही केवळ भारतीय संगीत आपले मन प्रफुल्लित ठेवू शकते, असे संशोधनाअंती निष्पन्न झाले.
 
‘स्त्रीसूत्रम मीडिया कंपनी’चा मुख्य उद्देश म्हणजे, मानसिक आणि भावनिक आरोग्याला प्रोत्साहन देणे. शिवाय गाण्यांचे सूर थेट आत्म्याला भिडले, तर स्वास्थ्यही निरोगी राहते, असा यामागचा विचार. त्यामुळे मानसिक तणावापासून शक्य तितके दूर राहण्यासाठी ‘अमोक्सा’ म्युझिक अ‍ॅप मदत करु शकेल, हा वैयक्तिक अनुभव लोकांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य ममता तायडे करत आहेत. तसेच ममता यांनी त्यांचे निसर्गाप्रतीचे प्रेम आणि जबाबदारी याचेही भान जपले आहे. नैसर्गिकदृष्ट्या तयार केल्या जाणार्‍या वस्तूंचे मार्केटिंग कसे करावे, नैसर्गिक सामग्रींचा वापर करुन खाद्यपदार्थ किंवा अन्य पदार्थ अधिक टिकाऊ कसे तयार करावे, याचे प्रशिक्षणदेखील ममता देतात. निसर्ग ही प्रत्येक सजीवाला मिळालेली देण असून, आपण त्याचा सदुपयोग किती विविध मार्गांनी करु शकतो, याबद्दल जनजागृतीचे मोलाचे कार्यदेखील ममता गेले अनेक वर्ष करीत आहेत. ‘अमोक्सा’ म्युझिक अ‍ॅपच्या मदतीने संगीताचा उपयोग करुन मानसिक आरोग्य राखणे आणि भावनिक असंतुलन नियंत्रणात ठेवणे, हा ममता यांचा मूळ हेतू. तसेच, विविध रुग्णालयांशी सहकार्य आणि समन्वयातून हे अ‍ॅप अविरतपणे सुरु आहे. एकूणच संगीत चिकित्सेचे प्रमुख उद्दिष्ट रुग्णांना आजारावर मात करण्यासाठी बळ देणे हेच आहे.
 
ममता यांच्या या कार्यात त्यांच्या आई ज्या स्वत: कर्करोगाशी लढा देत होत्या, त्यांनी केवळ स्वत:चा विचार न करता, आपल्यासारख्या अन्य रुग्णांच्या मानसिकतेचा विचार केला. त्यात तंत्रज्ञान आणि विज्ञानाच्या साहाय्याने काही आमूलाग्र बदल करु शकतो का, म्हणूनही उपाय सूचविले. पुढे ममता यांनी मानसिक आरोग्यासाठी असे अ‍ॅप ही काळाची गरज आहे, हे समजून ‘अमोक्सा’ म्युझिक अ‍ॅप विकसित केले. तसेच, संगीत हे असे माध्यम आहे, जे प्रत्येक वयोगटातील व्यक्ती ऐकत असतात. त्यामुळे या ‘अमोक्सा’ म्युझिक अ‍ॅपबद्दल आणि मानसिक ताणतणावाबाबत जगजागृतीसाठी ममता लवकरच काही म्युझिक अल्बम, शॉर्ट स्टोरीज या माध्यमातूनही लोकांपर्यंत माहिती पोहोचवणार आहेत. दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे ममता यांना त्यांच्या पुढच्या वाटचालीस शुभेच्छा!


Powered By Sangraha 9.0