महामुंबईतील रेल्वे विकासाचे विस्तारणारे जाळे...

17 Dec 2024 22:08:10
mahamumbai railway development network


काही दिवसांपूर्वीच केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने महामुंबईत 300 नवीन लोकल रेल्वेगाड्या सुरु करणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. त्यानिमित्ताने यंदाच्या वर्षी महामुंबई क्षेत्रातील लोकल रेल्वे प्रवाशांसाठी उपलब्ध करुन दिलेल्या सोयीसुविधा आणि आगामी वर्षात अपेक्षित बदल यांचा आढावा घेणारा हा माहितीपूर्ण लेख...
 
2014 सालापासून म्हणजे, भाजप सत्तेवर आल्यापासून रेल्वे खात्याने भारतीय रेल्वे सेवा पूर्वीपेक्षा जास्त सुरक्षित व सुखसोयींनी युक्त बनविली आहे. याचे कारण म्हणजे, भारतीय रेल्वे दरवर्षी सुमारे 685 कोटी प्रवाशांच्या वाहतुकीसह, साधारणपणे एक लाख कोटी किलोमीटर अंतर पार करते. इतर कोणत्याही देशात इतकी प्रवासी वाहतूक रेल्वेच्या माध्यमातून होत नाही, हे विशेष. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आपल्या शेजारी असलेल्या चीनच्या तुलनेत भारतीय रेल्वेची कामगिरी अद्वितीय अशीच आहे. कारण, चीनचे रेल्वेजाळे हे भारतापेक्षा तुलनेने अधिक विस्तारलेले आहे. तरीही चीनमधील रेल्वे प्रवासी वाहतूक भारताच्या जवळजवळ निम्मीच (300 कोटी) आहे. लोकसंख्येच्या तुलनेत चीनमध्ये केवळ 0.58 टक्के, अमेरिकेत केवळ 0.09 टक्के, तर भारतात लोकसंख्येच्या तुलनेत दररोज सुमारे दोन टक्के रेल्वेच्या माध्यमातून प्रवासी वाहतूक होत असते.

सुरक्षिततेच्या बाबतीत सांगायचे झाल्यास, रेल्वे अपघातांसारख्या गंभीर घटनांचे प्रमाण 2000-01 साली 473 इतके होते, तर 2023-24 साली हे प्रमाण केवळ 40 पर्यंत खाली आले आहे. भारतीय रेल्वेने मार्गिकेमध्ये सुधारणा, लेव्हल क्रॉसिंग काढून टाकणे, स्थानकांचे सुशोभीकरण करणे या गोष्टीमुळे गंभीर दुर्घटनांमध्ये घट झाल्याचे दिसून येते.

भारतीय रेल्वेने सुरक्षिततेकरिता आणि प्रवाशांकरिता कोणकोणत्या सुखसोयी उपलब्ध करुन दिल्या आहेत, ते जाणून घेऊया.
 
गाड्यांची टक्कर होऊ नये म्हणून, मुंबई लोकलसाठी ‘कवच 5.0.’ ‘कवच 5.0’ ही अद्ययावत रेल्वे संरक्षण प्रणाली आहे. यात उपनगरीय रेल्वेचाही समावेश करण्यात आला आहे. ‘कवच 4.0’ ही प्रणाली रेल्वे इंजिनमध्ये कार्यान्वित करण्यात येते. मुंबई लोकलमध्ये कार्यान्वित करण्यासाठी उपनगरीय यांत्रिक बदल ‘कवच 5.0’ मध्ये करण्यात आलेले आहेत. ‘मुंबई रेल्वे विकास महामंडळा’च्या प्रकल्पामध्ये ‘एमयुटीपी 3-अ’ 54 हजार, 777 कोटी रुपयांची ‘कम्युनिकेशन बेस्ड ट्रेन कंट्रोल’ (CBTC) प्रणाली विकसित करण्याची जबाबदारी घेतली आहे. सध्या पश्चिम रेल्वेच्या 789 किमी चर्चगेट ते विरार 56 किमी लोकल रेल्वेसह ट्रॅककरिता ही प्रणाली बसविण्याचे काम सध्या सुरू आहे. हे काम 2025 साली पूर्णत्वास येईल.
 
महिला डब्यातील गुन्हेगारीला आळा घालण्यासह प्रवाशांच्या सुरक्षिततेकरिता सीसीटीव्ही बसविणे.
मध्य रेल्वेच्या उपनगरीय गाड्यांमध्ये एकूण 771 महिलांचे डबे आहेत व सर्व डब्यात एकूण 4 हजार, 626 सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. वॉकीटॉकी सुविधाही वापरता येणार आहे.

दोन वर्षांत ज्येष्ठ नागरिकांकरिता लोकलमध्ये स्वतंत्र डबा अपेक्षित आहे. उपनगरीय लोकलमधून प्रवास करताना ज्येष्ठ नागरिकांना त्रासाला पूर्णविराम देण्याच्या उद्देशाने एका मालडब्याचे ज्येष्ठ नागरिकांच्या स्वतंत्र डब्याचे रुपांतर करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. मध्य रेल्वेच्या 155, तर पश्चिम रेल्वेच्या 105 डब्यांचे रुपांतर अशाप्रकारे करण्यात येणार आहे. ज्येष्ठांकरिता राखीव डबा असलेली पहिली लोकल डिसेंबर अखेरपर्यंत सेवेत येण्याची शक्यता आहे.
 
सिग्नल बंद पडण्याचे प्रमाण थांबविण्याकरिता ‘इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग’ प्रणाली लागू केली जाईल. पश्चिम रेल्वे प्रशासन ‘इलेक्ट्रिकल इंटरलॉकिंग’च्या जागी ‘इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग’ प्रणालीमध्ये बदल करून आणणार आहे. सध्या 17 स्थानकांकरिता हे बदल झाले आहेत. एकूण बदल एक हजारांपेक्षा अधिक ठिकाणी करावे लागणार आहेत.

विसरभोळ्या प्रवाशांच्या वस्तू परत करण्याबाबतीतही रेल्वे प्रशासनाने विशेष लक्ष केंद्रित केलेले दिसते. मागील 11 महिन्यांत प्रवासात विसरलेल्या 5.22 कोटी रुपये किमतीच्या एकूण 1 हजार, 491 वस्तू प्रवाशांना परत करण्यात आल्या आहेत.
 
रेल्वेची नव्या वेळापत्रकानुसार विस्तारित सेवा प्रवाशांसाठी उपलब्ध होणार आहे. दादर स्थानकावरील गर्दी कमी होणार आहे. मध्य रेल्वेवरील शेवटची छशिमट(छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल)-कर्जत लोकल मध्यरात्री 12.12 वाजता व छशिमट-कसारा लोकल मध्यरात्री 12.08 वाजता असणार आहे.

पश्चिम रेल्वेची वैशिष्ट्ये : 12 नव्या लोकल, दहा लोकल फेर्‍यांसाठी 12 ऐवजी 15 डब्यांच्या गाड्या, 12 डब्यांच्या सहा लोकलचा विस्तार.

मध्य रेल्वेची वैशिष्ट्येे : 24 लोकलचा परळपर्यंत विस्तार, 11 लोकल छशिमटऐवजी दादरहून सुटणार, सहा लोकल ठाण्याऐवजी कल्याणपर्यंत धावणार.

रेल्वे स्थानकांत सुधारणा - लवकरच 18 स्थानकांत 2026 सालापर्यंत सुधारणा होणार आहे. पश्चिम रेल्वेच्या (एकूण खर्च रु 630.75 कोटी)-खार रोड, कांदिवली, नालासोपारा, वसई रोड, मीरा रोड, सांताक्रुझ, भाईंदर या स्थानकांचे सुशोभीकरण होणार आहे. तसेच, मध्य रेल्वेच्या (एकूण खर्च रु 319.14 कोटी)-घाटकोपर, विक्रोळी, भांडूप, मुलुंड, डोंबिवली, नेरळ, कसारा, जीटीबी नगर, चेंबूर, गोवंडी, मानखुर्द या स्थानकांचे सुशोभीकरण होणार आहे.
या कामामध्ये उन्नत डेक, फलाटांचा विस्तार, नवीन पादचारी पूल, स्कायवॉक, लिफ्ट वा एलिव्हेटर, स्वच्छतागृहे, फलाट सुशोभन आणि 60 हजार चौमी प्रवाशांच्या सोयीकरिता अतिरिक्त मोकळी जागा ठेवली जाणार आहे.

छशिमट 2.0 (एकूण क्षेत्रफळ (4 लाख, 61 हजार, 534 चौमी व एकूण खर्च रु 2 हजार, 450 कोटी)-कार्यालयाची नवी इमारत, दुमजली विश्रामधाम, वस्तूंच्या विक्रीसाठी इमारती, पार्सल इमारती, डेक, पादचारी पूल, स्कायवॉक, प्रवाशांच्या सोईसाठी मोकळ्या जागेची निर्मिती इत्यादी सुविधा उपलब्ध होणार आहेत.
 
नवीन ठाणे स्थानकाच्या उभारणीतील उच्च दाब वाहिनी वगैरे अडथळे दूर करणार आहेत. या स्थानकाचा फायदा मुख्यत: वागळे इस्टेट, घोडबंदर परिसरातील वसाहतींना होईल.

अमृत स्टेशनमुळे रेल्वे स्थानकांचे रुप पालटणार - दादर, पनवेल, दहिसर, कांदिवली, रोहा, पेण या स्थानकांची निवड करण्यात आली आहे.

लोकलचा विस्तार - दोन वर्षांत 12 रेल्वे प्रकल्प (एकूण खर्च रु. 16 हजार, 240 कोटी) प्रवासी संख्या कोरोना काळानंतर 74 लाखांवरून 68 लाखांवर आली आहे.
 
पनवेल-कर्जत उपनगरीय रेल्वे कॉरिडॉरचे काम प्रगतीपथावर सुरू आहे. मातीकाम-दोन दशलक्ष घनमी मातीचे भरण पूर्ण. बोगदे काम-तिन्ही बोगद्यांचे काम प्रगतीपथवर. पूल काम-एकूण 47 पुलांपैकी 29 छोटे व सहा मोठे पूल पूर्ण. रोड ओव्हर ब्रिज-चार पूल पूर्ण आणि मोहापे व किरवली कामे प्रगतीपथावर. एकूण अंदाजे खर्च-रु. 2 हजार, 782 कोटी व 67 टक्के काम पूर्ण. रेल्वेकडून काही गैरकामेही घडलेली आहेत. त्यामुळे गाड्यांना उशीर होत आहे व त्यात कशी सुधारणा करता येईल यांचा विचार रेल्वे करीत आहे.

पावसाळ्यात मध्य रेल्वेच्या गाड्या बिघडण्याचे प्रमाण जास्त असल्याने लोकल उशिरा धावतात. दि. 25 सप्टेंबर रोजी मुंबईत जोरदार पावसामुळे मध्य रेल्वेच्या अनेक गाड्या थांबल्या होत्या, तर पश्चिम रेल्वेच्या गाड्या सुरू असल्या, तरी त्या उशिराने धावत होत्या. हे असे बरेच वर्षे चालू आहे. याला कारण पश्चिम रेल्वे ही थोड्या उंचीवरून धावते, तर मध्य रेल्वेला खालच्या पातळीवरून धावावे लागते व त्या गाड्यांना पाण्याचा मोठा निचरा करणे कठीण जाते. सायन, कुर्ला व विद्याविहार स्थानकामध्ये नेहमी पावसाळ्यात पूर आलेला असतो. तसेच, मध्य रेल्वेच्या भोवती ड्रेनेझची पाणी निचर्‍यासाठीची प्रणाली ही पण, खालच्या स्तरामध्ये असल्यामुळे पाण्याचा पूर येतो. शिवाय ती प्रणाली पाणी साठवते. कारण, तिची पाणी वाहून नेण्याची क्षमता अपुरी आहे. शिवाय मध्य रेल्वेच्या भोवती झोपडपट्ट्यांनी अतिक्रमण केलेले आहे. या झोपडपट्ट्यांमधील वस्ती ड्रेनेझमध्ये घनकचरा फेकतात. त्यामुळे पाणी अडून राहते. पश्चिम रेल्वे ही तुलनात्मक दृष्टीने नवीन आहे व तेथे पाण्याचा निचरा करणार्‍या पायाभूत सेवा जास्त चांगल्या आहेत. पश्चिम रेल्वेने ‘मायक्रो टनेलिंग’ कामे केली आहेत. (रेल्वे-ट्रॅकच्या खाली छोटे पाईप टाकले आहेत.) मध्य रेल्वेची भौगोलिक रचना अशी आहे की, त्या ठिकाणी ड्रेनेजकरिता फार मोठे प्रयास करावे लागणार आहेत.

ठाणे स्थानकात फलाट क्रमांक एक व दोन मध्ये खूप पाणी साचते. तेथे आता ‘मायक्रो टनेलिंग’ सेवा उपलब्ध केली जाणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मुलुंड उपनगरी विभागातील शीव ते कुर्ला मुख्य नाला, विक्रोळी ते कांजूरमार्ग दरम्यान कर्वेनगर नाला व फ्लायओव्हर नाला आणि घाटकोपर ते विक्रोळी दरम्यान गोदरेज नाला येथे आता ‘मायक्रो टनेलिंग’चे काम यशस्वी करण्यात आले आहे. त्यामुळे पाणी साचण्याच्या घटनांवर आळा बसला आहे. डिसेंबर 2025 सालापर्यंत ही सर्व ‘मायक्रो टनेलिंग’ची कामे पूर्ण करण्याचे नियोजन आहे.


रेल्वे स्थानकात दोन रेल्वे गाड्यांची टक्कर
 
मुंबई सेंट्रल विभागाने शून्य अपघाताचे उद्दिष्ट ठेवले आहे. सज्जता व जलद प्रतिसादाकरिता रेल्वेकडून तयारी केली जात आहे. गर्दीच्या ठिकाणी अपघात झाल्यास, रेल्वे गाडीला आग लागल्यास त्वरित बचाव कार्य कसे करावे याकरिता अशा कवायतीत रेल्वेचे 300 हून अधिक कर्मचारी सहभागी झाले आहेत. त्यात एनडीआरएफ, रुग्णवाहिका, अग्निशमनदल, रेल्वे पोलीस, शहर पोलीस इत्यादींनी या कवायतेतून बचावकार्य करून योग्य ते सदेश दिले.

अशा तर्‍हेने रेल्वेचा लोकल विभाग कार्यरत असला तरी नवीन वर्षात यामध्ये लक्षणीय सुधारणांची मुंबईकरांना अपेक्षा आहे.




Powered By Sangraha 9.0