समाजाच्या विकासाचे असेही सुंभरान!

17 Dec 2024 21:38:48
interview with ram javan
 
धनगर समाजाचे वैशिष्ट्यपूर्ण समाजजीवन आहे. हटकर, व्हटकर, कुटेकर, शेंगर, अहिर, कुरुबा, भारवाड, खाटिक, कोकणी धनगर यांसह धनगर समाजाचे जवळपास 14 उपघटक. शंकर, विष्णू, पार्वती, महालक्ष्मी ही त्यांची कुलदैवते. विरोबा, शिदोबा, खंडोबा, म्हसोबा, विठोबा, तुळाई, यमाई, अंबाबाई त्यांचे देव. धनगरी ओव्या गुणगुणायला लावणार्‍या समाजात काळानुसार अनेक बदल झाले. समाजाच्या विकासासाठी अनेक संस्था आणि व्यक्ती, तसेच शासनही कार्यरत आहे. धनगर समाजाच्या सध्याच्या वास्तवासंदर्भात संवाद साधला आहे, तुळजापूर येथील धनगर समाजाचे कार्यकर्ते राम जवान यांच्याशी...

 
धनगर समाज आजही आपली वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती, परंपरा टिकवून आहे. त्याविषयी काय सांगाल?

धनगर समाज हा ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणारा समाज आहे. राज्यात मराठा समाजानंतर धनगर समाज हा लोकसंख्येच्या बाबतीत दुसरा समाज. समाजाचे स्वतंत्र ढोलवाद्य आहे, लोककला आहे आणि नृत्यशैलीही आहे. समाजाला संस्कृतीचा संपन्न मौखिक वारसा आहे. सुंभरान आणि आमचे पुजारी म्हणजे वीर यांचा संपन्न वारसा समाजाला आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मेंढपाळ मेंढीचे आणि लेंडीचेही पूजन करतो. आपल्याला भाकरी मिळवून देणार्‍या मेंढीविषयी समाजाची कृतज्ञता शब्दातीत आहे. आमच्या इथे विवाह पद्धती मात्र आजही आगळीवेगळी आहे. समाजात नियोजित वधू तिच्या वर्‍हाडासह नवर्‍याच्या घरी साधारण तीन-चार दिवस आधी येते. ‘कारन’ म्हणजे लग्नाआधीची पूजा होते. तेव्हा बकर्‍याचा बळी दिला जातो. त्या विधीआधी सकाळी आणि रात्री ‘सुंभरान’ म्हणजे आमच्या विरोबाचे स्मरणगीत गायले जाते. हुतात्मा वीर शिंगरोबाचेही गीत गायले जाते. समाजाला राजा चंद्रगुप्त मौर्य, मल्हारराव होळकर आणि पुण्यश्लोक महाराणी अहिल्यादेवींचा थोर वारसा लाभला आहे.

 
धनगर समाजासमोरील प्रश्न, आव्हाने काय आहेत?
 
उपजीविकेसाठी समाजातील मेंढपाळ समाज आठ महिने गावाबाहेर असतो. जिथे कुणाची शेतीभाती नसेल, अशा ठिकाणी ते तळ ठोकतात. तिथे ना वीज ना पाणी, कसलीच सोय नसते. अशावेळी कुणी आजारी पडले, गरोदर महिलेला बाळ होणार असेल, तर खूप अवघड असते. तसेच अशा ठिकाणी विंचू, साप आणि हिंस्र पशूही अनेकदा हल्ला करतात. गावाबाहेर असताना एखाद्या बालकाचा जन्म झाला, तर त्याच्या जन्माची नोंद कुठे करणार? भटकंती करताना कुणी वारले, तर त्याचे अंतिम संस्कार गावाकडेच करायला जावे लागते. तिथे गावात मृत्यूच्या दाखल्यासंदर्भातही अनेक अडचणी. जिथे जन्म-मृत्यूच्या दाखल्याच्या इतक्या अडचणी आहेत, तिथे जातीच्या दाखल्याची काय कथा असणार? तसेच, अनेकदा समाजविघातक शक्ती जबरदस्तीने पालातील मेंढ्या जबरदस्तीने उचलून नेतात, मेंढपाळासंकट त्यांच्या कुटुंबीयांना मारहाण करतात. हा त्रास अजूनही मेंढपाळ समाजाला सहन करावा लागत आहे.


धनगर समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकारी पातळीवर तसेच सामाजिक स्तरावर तुम्ही केलेल्या प्रयत्नांविषयी सांगा.
 
राज्यात महायुतीचे सरकार आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आहेत. ते मेंढपाळ समाजाच्या समस्या समजून घेत असतात. मागे समाजातील लोकांसाठी ‘घरकुल योजना’ मुलांच्या माध्यमिक आणि उच्च शिक्षणासाठी, स्पर्धा परीक्षा तयारीसाठी, सैन्य भरतीसाठी योजना तसेच कुक्कुटपालन यांसंदर्भात व्यवसायासाठी आणि महिलांना अर्थसाहाय्यासाठी अनेक योजना कार्यान्वित केल्या. आम्ही या सगळ्या संदर्भात समाजात जागृती करतोे. आधीच सांगितल्याप्रमाणे मेंढपाळ समाज गावापासून दूर राहतो. हिंस्र प्राणी तसेच गुंडांचेे हल्ले पाचवीला पूजलेले असतात. तसेच, शेळ्यामेंढ्यांवरही हिंस्र प्राणी हल्ला करण्यासाठी टपलेले असतात. यामुळे मेंढपाळ समाजाला शस्त्र राखण्यासाठी सरकारी परवाना मिळावा, या मागणीसाठी सरकार दरबारी पाठपुरावा करात आहे. तसेच, भटकंती करणार्‍या मेंढपाळाने आपल्या मुलाला भटकंती करताना सोबत न नेता, गावातच शिक्षणासाठी ठेवावे किंवा वसतिगृहात शिकण्यासाठी पाठवावे, यासाठी शेकडो पालांवर जाऊन तिथे मेंढक्यांची आणि इतरांची जागृती केली आहे. मेंढक्या म्हणजे त्या पालाचा म्होरक्या, प्रमुख. या मेंढक्यासोबत संपर्क आणि संवाद प्रस्थापित करत आहे. तसेच, अजिंक्य बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या माध्यमातून या पालावर विविध समस्यांवर जागृती शिबीर, आरोग्य शिबीर आयोजित करतो. सुमारे 100 पालांवर आम्ही सौरऊर्जेने चालणारे दिवे दिले आहेत. मेंढपाळ धार्मिक आहे. सणसुद त्यालाही आवडतात. पण, पालावर सणउत्सव साजरे करण्याला मर्यादा येतात. त्यामुळे दिवाळीला आम्ही पालावर फराळ वितरणाचा कार्यक्रम करतो.


धनगर समाजाच्या चालीरितीसंबंधित स्वयंरोजगाराबद्दल काय सांगाल?

मेंढ्या पाळणे हा आजही मेंढपाळांचा प्रमुख उद्योगव्यवसाय आहे. साधारण दिवाळीच्या सुमारास या मेंढ्यांच्या पाडसांना जन्म देण्याचा काळ असतो. मेंढीच्या दुधाचे दही, लोणी, तूप काढले जाते. मात्र, दुधापासून बनवलेले तूप कधी खायचे, याला नियम आहेत. मेंढीच्या दुधापासून तूप बनवले की त्या तुपाचा दिवा कुलदेवाला लावायचा. त्यानंतर मग तूप खाऊ शकतो. इतकेच काय, प्रत्येक पालावर मेंढ्यांना ठेवण्यासाठी दोन जागा असतात. पहिल्या जागेमध्ये मोठ्या मेंढी-मेंढके ठेवतात. दुसर्‍यामध्ये पाडस ठेवतात. त्यांच्याभोवती चारही दिशांनी राखणदारी करायला कुत्री ठेवतात आणि त्याच्यानंतर पालातले मेंढपाळ स्वतः चारही बाजूंना पथारी टाकून झोपतात. मेंढ्या उचलण्यासाठी हिंस्र पशू आले, तर आधी मेंढपाळांशी सामना व्हावा, यासाठी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आम्ही मेंढ्यांचे पूजन करतो आणि त्यांच्या लेंड्यांचेही पूजन करतो. सर्व मेंढ्यांच्या लेंड्या वर्षभर साठवल्या जातात. मग पूजा केल्यानंतर त्या लेंड्या खत म्हणून स्वतःच्या शेतात वापरल्या जातात किंवा शेतकर्‍यांना विकल्या जातात. तसेच पाडसाला जन्म देऊन एक वर्ष झालेल्या मेंढीचीच लोकर कातली जाते. या लोकरीपासून आठ दिवसांत घोंगडी तयार होते. मेंढीच्या दुधाला आणि दुधापासूनच्या उत्पादनालाही किंमत आहे. मेंढपाळांना जर मेंढी दूध आणि उत्पादनासंदर्भात प्रगत प्रशिक्षण आणि व्यवस्था उपलब्ध करून दिली, तर त्याचे अर्थार्जन वाढणार आहे. तीच गोष्ट लेंडीखताबाबतही आणि घोंगडी बनवण्यासाठीही आहे. मेंढपाळ समाजाने पारंपरिक व्यवसाय आजही जपला आहे. त्याचे संवर्धन होणे गरजेचे आहे.

 
धनगर समाजाच्या प्रगतीसाठी, सर्वांगीण विकासासाठी भविष्यातील उपक्रमांविषयी काय सांगाल?

धनगरातील सर्वच जाती, पोटजाती यांना अनुसूचित जमातीअंतर्गत आरक्षण मिळावे, असे प्रत्येक धनगराला वाटते. तसेच, मलाही वाटते. पण त्याचबरोबर समाज शैक्षणिक, आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावा, यासाठी मी माझ्या पातळीवर कार्य करणार आहे. समाजाला मोठा सांस्कृतिक वारसा आहे. त्याचे संवर्धन करण्याचेही कार्य हाती घेतले आहे. राजा चंद्रगुप्त मौर्य, मल्हारराव होळकर आणि पुण्यश्लोक महाराणी अहिल्यादेवींचे आम्ही वंशज आहोत. त्यांचे वारसदार म्हणून समाज धर्मकर्म संस्कृती जपत प्रगती कसा करेल, या संदर्भात अभ्यास करून त्यानुसार कार्यवाही करणार आहे. ‘काठी न् घोंगडी घेऊन द्या की रं, मला बी जत्रंला येऊन द्या की’ म्हणणार्‍या आमच्या साध्या भोळ्या धनगर समाजाला संस्कृती धर्म जपत आधुनिक जगात यशस्वी व्हायचे आहे. त्यासाठी खारीचा वाटा उचलणार आहे.
(अधिक माहितीसाठी संपर्क : राम जवान 9362747345/9594969638) 
 
 
Powered By Sangraha 9.0