मुंबई (विशेष प्रतिनिधी) - देवरुखचे धनेश पक्षी अभ्यासक प्रतीक मोरे यांची नियुक्ती 'इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्वेशन ऑफ नेचर' म्हणजेच 'आययूसीएन'च्या ‘हाॅर्नबिल स्पेशालिस्ट ग्रुप’च्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे (iucn hornbill specialist group). 'सह्याद्री संकल्प सोसायटी’च्या माध्यमातून मोरे हे कोकणात धनेश पक्ष्याविषयी लोकचळवळीद्वारे धनेश संवर्धनाचे काम करत आहेत (iucn hornbill specialist group). मोरे यांच्या नियुक्तीमुळे कोकणात धनेश पक्ष्यांविषयी सुरू असलेल्या कामाची आंतरराष्ट्रीय पटलावर दखल घेण्यात आली आहे. (iucn hornbill specialist group)
'सह्याद्री संकल्प सोसायटी’च्या माध्यमातून कोकणात सध्या धनेश पक्षी संवर्धनाचे काम सुरू आहे. प्रतीक मोरे हे मूळचे देवरुखचे आहेत. गेल्या काही वर्षांपासून कोकणातील निरनिराळ्या वन्यजीवांच्या संवर्धनाचे काम ते करत आहेत. सडे संवर्धनासाठी देखील ते प्रयत्नशील आहेत. शिवाय सड्यांवर फुलणाऱ्या संकटग्रस्त वनस्पतींबाबत देखील ते अभ्यास करत आहेत.या सर्व कामासाठी त्यांना २०२२ साली दै. ‘मुंबई तरुण भारत’ने ‘स्पिसीज अॅण्ड हॅबिटॅट्स वाॅरियर्स अवाॅर्ड’ देऊन गौरविले होते. गेल्या दोन वर्षांत मोरे यांनी 'सह्याद्री संकल्प सोसायटी’च्या माध्यमातून कोकणात धनेश पक्ष्यांविषयी लोकचळवळ उभी केली आहे. धनेश संवर्धन, संशोधन आणि जनजागृतीसाठी ते काम करत आहेत. या कामाची दखल घेऊन 'आययूसीएन'ने त्यांची नियुक्ती 'हाॅर्नबिल स्पेशालिस्ट ग्रुप'च्या सदस्यपदी केली आहे.
हाॅर्नबिल स्पेशालिस्ट गुप्रविषयी...
जैवविविधता राखण्यासाठी जागतिक पातळीवर काम करणा-या संस्थातील प्रमुख म्हणजे इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्व्हेशन ऑफ नेचर (IUCN). अनेक देश आणि सामाजिक संस्था याच्या सदस्य आहेत. नैसर्गिक अधिवास, त्यातील विविध प्रजाती आणि त्यांचा मानवासाठी होत असलेला वापर याचा अभ्यास करून, सद्यस्थिती जाणून घेऊन त्यांचे संरक्षण व संवर्धन करणे हे IUCN चे प्रमुख काम आहे. याच IUCN चा भाग म्हणजे स्पीसीज सर्व्हायव्हल कमिशन - SSC. सजीव सृष्टीचे अभ्यासक आणि संरक्षक संशोधक यांचे वेगवेगळे गट या SSC मध्ये आहेत. हत्ती, बेडूक, मासे, कवके, यावर काम करणारे गट आहेत. एखाद्या देशातील, किंवा भागातील प्रजातींवर काम करणारे गटही आहेत. प्रत्येक गटाचे काम हे स्वतंत्र असले तरीही एका ठरलेल्या आराखडयानुसार चालू असते. IUCN च्या कामामध्ये लागणारी प्रजातींबद्दलची माहिती, त्या कुठे आणि कशा स्थितीत आहेत, त्यांना असलेले धोके कुठले आणि त्यांचे संरक्षण करायला काय उपाय करायला लागेल ही माहिती ssc चे गट पुरवतात. या माहितीच्या आधारावर अनेक महत्वाचे निर्णय घेतले जातात. हत्तींच्या शिकारीला परवानगी द्यावी अथवा नाही, पर्यावरण बदलामुळे कुठल्या बेडूक प्रजाती नामशेष होत चालल्या आहेत, धोकादायक तणे कुठली अशा प्रश्नांची शास्त्रीय उत्तरे या गटांच्या संशोधनातून मिळतात. ‘हाॅर्नबिल स्पेशालिस्ट ग्रुप’ हा देखी एसएससी गटाचा भाग असून यामाध्यमातून धनेश पक्षी संवर्धनाविषयी महत्त्वाचे निर्णय घेण्यात येतात.